Tuesday, 28 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक: 28.03.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 March 2023

Time : 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ मार्च २०२ दुपारी १.०० वा.

****

अदानी घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याची मागणी तसंच राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग अकराव्या दिवशी बाधित झालं. लोकसभेत तालिका अध्यक्ष मिथुन रेड्डी यांनी कामकाज पुकारताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या आसनासमोर येत घोषणाबाजी केली, तसंच अध्यक्षांकडे कागद भिरकावले. त्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत, सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

राज्यसभेतही विरोधकांच्या गदारोळातच सभापती जगदीप धनखड यांनी कामकाजाला सुरवात केली. वित्त विधेयकात राज्यसभेनं सुचवलेली सुधारणा लोकसभेनं मान्य करून तिचा वित्त विधेयकात समावेश केल्याची माहिती राज्यसभा सचिवांनी सदनाला दिली. त्यानंतरही गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं.

****

भारतीय जनता पक्ष सहा एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान सामाजिक न्याय सप्ताह साजरा करणार आहे. नवी दिल्लीत आज भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही माहिती दिली. १५ मे ते १५ जून या कालावधीत सर्व पक्षाच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघात सरकारच्या कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी या बैठकीत दिल्याचं मेघवाल यांनी सांगितलं.

****

भारताच्या G-20 अध्यक्षपदाअंतर्गत, व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाची पहिली बैठक आजपासून मुंबईत सुरु झाली. बैठकीच्या सुरुवातीच्या सत्रात वाणिज्य आणि उद्योग विभागाचे सचिव सुनील बर्थवाल यांनी संबोधित केलं. या बैठकीत आज ‘ट्रेड फायनान्स’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. या बैठकीचं औपचारिक उद्घाटन उद्या वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते होणार आहे.

****

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला नागपूर पोलिसांनी बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून ताब्यात घेतलं आहे. पुजारी यानं गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात दोन वेळा फोन करुन दहा कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती. त्याने यापूर्वी १४ जानेवारी रोजी तीन फोन करुन, डी गँगचा सदस्य असल्याचं सांगत १०० कोटींची मागणी केली होती. या प्रकरणात नागपूर इथं जीवे मारण्याची धमकी तसंच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

****

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संबंध नाही, तसंच सावरकर यांना माफीवीर म्हणणंही योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल नवी दिल्लीत विरोधकांच्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र, राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून या बैठकीला कोणीही उपस्थित नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

राजकारणासाठी सावरकरांच्या नावाचा वापर करणं योग्य नसल्याचं, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सावरकरांबाबत उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह असली तरी ते स्वत: मुख्यमंत्री असताना, सावरकरांवर अश्लिल भाषेत टीका होऊन देखील त्यांनी काहीही कारवाई केली नसल्याकडे रणजीत सावरकर यांनी लक्ष वेधलं.

****

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त मुंबईत चैत्यभूमी इथं करण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल या संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. जयंती दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या पोस्टरचं अनावरण यावेळी करण्यात आलं.

****

महाराष्ट्रात वर्षभरानंतर पुन्हा एकदा कोविड संसर्ग वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मुंबईतल्या काही खासगी रूग्णालयांनी कोविड 19 चे स्वतंत्र विभाग पुन्हा सुरू केले असून, दर दिवशी काही बाधित रूग्णांना दाखल करून घेतलं जात आहे. कोविड रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर काही रुग्णालयांमध्ये मास्क वापरणं तसंच चाचण्यांसंदर्भातले नियम लागू केले आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि प्राध्यापक ठाकरे गौरव संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा देशपातळीवरील दुसरा गणितरत्न पुरस्कार कोलकाता इथल्या भारतीय सांख्यिकी संस्थेच्या प्राध्यापक नीना गुप्ता यांना आज प्रदान करण्यात आला. एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी हा पुरस्कार प्रदान केला. गुप्ता यांनी मागील सात दशकांपासून अनुत्तरीत असलेला 'झरिस्की कॅन्सलेशन प्रॉब्लेम' पूर्णतः सोडवण्यात यश मिळवलं आहे.

****

No comments: