Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 29 March
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
: २९
मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक बातम्या
·
सामान्य
नागरीकांना भेटण्यासाठी वेळ राखून ठेवण्याची सर्व मंत्री तसंच अधिकाऱ्यांना राज्याच्या
सामान्य प्रशासन विभागाची सूचना
·
कायम
खाते क्रमांक आणि आधार क्रमांक एकमेकांना जजोडण्याच्या मुदतीत तीस जूनपर्यंत वाढ
·
मानहानीच्या
प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांना
दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश
·
आचारसंहितेचा
भंग करण्याच्या कारणावरून विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी
निलंबित
·
केंद्रीय
भविष्य निर्वाह निधीच्या व्याज दरात वाढ
आणि
·
लातूरचा
सोनबा लवटे एकशे दहा किलो वजनी गटात ‘कुमार महाराष्ट्र केसरी’
सविस्तर बातम्या
सामान्य
नागरीकांना भेटण्याची वेळ राखून ठेवण्याची सूचना राज्य शासनाच्या समान्य प्रशासन विभागाने
सर्व मंत्री आणि अधिकार्यांना केली आहे. आपल्या कामाची दाद मागण्यासाठी मंत्रालयात
आलेल्या तीन जणांनी सोमवारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, या घटनेच्या पार्श्वभूमीवर
सामान्य प्रशासन विभागानं काल याबाबतचं परिपत्रक जारी केलं. सर्व मंत्र्यांनी मंत्रालयात
सामान्य नागरीकांना भेटण्याच्या वेळेसंदर्भात आपापल्या दालनाबाहेर एका फलकावर लिहावं,
मंत्रालयीन अधिकार्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी तीन ते चार ही वेळ जनतेच्या
भेटीसाठी राखून ठेवावी, या कालावधीत विभागाच्या बैठका घेऊ नये, विभागीय पातळीवर शासकीय
कार्यालयातल्या अधिकार्यांनी जनतेसाठी आठवड्यातून किमान दोन दिवस निश्चित करुन वेळ
राखून ठेवावी आणि लोकांच्या भेटीवर परिणाम होणार नाही अशा पद्धतीने दोरे आयोजित करावे,
अशा सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.
****
केंद्रीय
प्रत्यक्ष कर मंडळानं कायम खाते क्रमांक -पॅन आणि आधार क्रमांक जोडण्याची मुदत या वर्षीच्या
तीस जूनपर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत येत्या एकतीस मार्चला संपत होती. या वर्षीच्या
तीस जूनपर्यंत पॅन आधार क्रमांकाशी न जोडणाऱ्या करदात्यांचे पॅन क्रमांक निष्क्रीय
केले जाणार असून, अशा पॅनवर कोणताही कर परतावा दिला जाणार नाही. निष्क्रीय झालेलं पॅन
कार्ड तीस दिवसात एक हजार रुपये शुल्क भरून सक्रीय करता येईल, असं मंडळानं सांगितलं
आहे.
****
अदानी
समुहातल्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याच्या मागणीसाठी,
तसंच राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधासाठी, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी
केलेल्या गदारोळामुळे, संसदेचं कामकाज काल सलग अकराव्या दिवशी बाधित झालं. सकाळी लोकसभेत
तालिका अध्यक्ष मिथुन रेड्डी यांनी कामकाज पुकारताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी त्यांच्या
आसनासमोर येत घोषणाबाजी केली, तसंच अध्यक्षांकडे कागद भिरकावले. त्यावर अध्यक्षांनी
नाराजी व्यक्त करत, सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. दोन वाजता कामकाज
सुरू झाल्यानंतर विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी
स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेतही
याच मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळातच सभापती जगदीप धनखड यांनी कामकाजाला
सुरवात केली. वित्त विधेयकात राज्यसभेनं सुचवलेली सुधारणा लोकसभेनं मान्य करून, तिचा
वित्त विधेयकात समावेश केल्याची माहिती, राज्यसभा सचिवांनी दिली. महिलांच्या जागतिक
मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निखत झरीन, लवलीना बोर्गोहेन, नितू घंसास
आणि सविती बुरा, या खेळाडूंनी सुवर्ण पदकं जिंकल्याबद्दल राज्यसभेनं त्यांचं अभिनंदन
केलं. त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात
आलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी करत
गदारोळ केला. उपसभापतींनी येत्या एकतीस तारखेला राज्यसभेचं काम होणार नसल्याची माहिती
दिली. त्यानंतर राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
दिल्ली
उच्च न्यायालयानं मानहानीच्या एका प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय
राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांना काल न्यायालयात पुढच्या सुनावणीस हजर राहण्यास सांगितलं
आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार कोटी रुपये देऊन निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचं
चिन्ह विकत घेतल्याचा आरोप या तिघांनी त्यांच्या वक्तव्यांमधून केला होता. यानंतर शिंदे
गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याप्रकरणी मानहानीची तक्रार
केली होती, ती न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. राऊत आणि ठाकरे पितापुत्रांनी केलेली
मानहानीकारक वक्तव्यं अजूनही मंचावर ठेवणाऱ्या समाज माध्यमांनाही न्यायालयानं नोटीस
बजावली असून, ही वक्तव्यं अजूनपर्यंत हटवली का नाहीत, याचा खुलासा विचारला आहे. या
प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या सतरा एप्रिलला होणार असून, न्यायालयानं ठाकरे पितापुत्र
आणि खासदार राऊत यांना, त्यावेळी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेशही दिले
आहेत.
****
वकील
आचारसंहितेचा भंग करण्याच्या कारणावरून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलनं विधिज्ञ
गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली आहे. एसटी कर्मचारी
आंदोलनात वकिलांचा गणवेश परिधान करून सहभाग घेणं, आणि एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेणं,
हे वकिलांच्या आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं सांगत, बार कौन्सिलनं सदावर्ते यांच्यावर
शिस्तभंगाची कारवाई सुरू केली होती.
****
भारतीय
जनता पक्ष आणि शिवसेनेच्या वतीनं राज्यभरात काढण्यात येणाऱ्या सावरकर गौरव यात्रेच्या
माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात येईल, असं भाजपचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत
बोलत होते. येत्या तीस तारखेपासून सुरू होणारी ही यात्रा सहा एप्रिलपर्यंत पूर्ण राज्यभरात
फिरणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
****
काँग्रेस
नेते राहुल गांधी यांनी सावरकरांची माफी मागावी, अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत
यांनी केली आहे. काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले...
Byte…
राहुल गांधीनी स्वातंत्र्यवीर
सावरकरांची माफी मागितली पाहिजे. कसलाही इतिहास माहिती नाही. कसलाही इतिहास वाचलेला
नाही. असं असतांना अशा पद्धतीची वक्तव्य करणं हे पूर्ण भारत देशाचा अपमान करण्यासारखं
आहे.
****
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अयोग्य भाषेत
टीका केल्याप्रकरणी आमदार संजय शिरसाट यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा,
अशा तक्रारीचं पत्र, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी नगर पोलीस
ठाण्यात दिलं आहे. सव्वीस मार्चला झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिरसाट यांनी
अशी टीका केल्याचं, समाज माध्यमांमधून समोर आल्यानंतर दानवे यांनी हे पत्र दिलं आहे.
सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान,
सुषमा अंधारे यांचा बोलविता धनी वेगळाच असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे. ते काल
छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. अंधारे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांबद्दल केलेल्या वक्तव्यांकडे त्यांनी लक्ष वेधलं.
****
नेरुळ
इथल्या डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल डी लिट
पदवी प्रदान केली. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना ही पदवी देऊन
गौरवण्यात आलं. या सोहळ्यात लोकमत ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा यांनाही राज्यपालांच्या
हस्ते डी लिट पदवी प्रदान करण्यात आली.
****
वाणिज्य
आणि उद्योग मंत्रालयानं काल मुंबईत, जी-20 सदस्य देशांमध्ये व्यापार आणि वित्तीय सहकार्य,
या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. जी-20 व्यापार आणि गुंतवणूकविषयक कार्यगटाच्या
पहिल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही परिषद घेण्यात आली. केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील
बर्थवाल यांनी आपल्या बीजभाषणात, व्यापार आणि वित्तीय क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्या
तसंच संभाव्य उपाय यावर चर्चा करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मत व्यक्त केलं. रचनात्मक
संवाद आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि जगभरातले शैक्षणिक
तज्ज्ञ या परिषदेला उपस्थित होते. विकासातली व्यापाराची मोठी भूमिका आणि त्यासाठी एकात्मिक
व्यापारी वित्तपुरवठा, या मुद्द्यांवर यावेळी सदस्यांनी सहमती दर्शवली. येत्या काही
वर्षात कागदविरहीत आंतरराष्ट्रीय व्यापाराचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सगळ्या देशांनी
आवश्यक ते कायदे करावेत, असं मतही उपस्थितांनी यावेळी व्यक्त केलं.
****
केंद्रीय
भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या विश्वस्त मंडळानं आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी कर्मचारी
भविष्य निर्वाह निधीवरच्या व्याजाच्या दरात वाढ करत, तो आठ पूर्णांक एक वरून, आठ पूर्णांक
१५ शतांश टक्के करण्याची शिफारस केली आहे. अर्थ मंत्रालयानं या शिफारशीला मंजुरी दिल्यानंतर
वाढलेला व्याज दर सरकारी राजपत्रात अधिसूचित करण्यात येईल, आणि त्यानंतर कर्मचारी भविष्य
निर्वाह निधी संघटना, या वाढलेल्या व्याजाचा लाभ सदस्यांच्या खात्यांमध्ये जमा करेल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवरचा हा आतापर्यंतचा सर्वात जास्त व्याज दर आहे.
****
केंद्रीय
भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी
उर्फ जयेश कांता याला नागपूर पोलिसांनी बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून काल ताब्यात
घेतलं. पुजारी यानं गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात दोन वेळा फोन करुन दहा कोटी
रुपये खंडणीची मागणी केली होती. त्याने यापूर्वी १४ जानेवारी रोजी तीन फोन करुन, डी
गँगचा सदस्य असल्याचं सांगत १०० कोटींची मागणी केली होती. या प्रकरणात नागपूर इथं जीवे
मारण्याची धमकी तसंच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
****
आष्टी
- अहमदनगर या मार्गावर सुरू झालेली डेमू रेल्वे गाडी पुण्यापर्यंत नेण्याचा प्रस्ताव
सल्लागार समितीत मांडणार असल्याचं, अखिल प्रवासी सेवा सुविधा समितीचे सदस्य खासदार
डॉ राजेंद्र फडके यांनी सांगितलं आहे. या समितीने काल सोलापूर रेल्वे विभागांतर्गत
अहमदनगर रेल्वे स्थानकाची पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. रेल्वे स्थानकावरील उपाहारगृह,
प्रवाशांची बैठक व्यवस्था, पेयजल सुविधा आदीची पाहणी करत या समितीनं नागरिकांच्या सूचना
जाणून घेतल्या.
****
नाशिक
जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातलं सशुल्क दर्शन बंद करण्याचा आदेश, भारतीय पुरातत्त्व
सर्वेक्षण खात्याच्या छत्रपती संभाजीनगर विभागानं, या मंदिराच्या विश्वस्त मंडळाला
दिला आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं हे मंदिर केंद्रीय संरक्षित स्मारक आहे.
कायद्यानुसार अशा संरक्षित स्मारकांमध्ये पैसे न घेण्याचा नियम असल्यामुळे हा आदेश
दिल्याचं पुरातत्व सर्वेक्षण खात्यानं स्पष्ट केलं आहे. या मंदिर परिसरात असलेल्या
दानपेट्या तत्काळ काढून टाकण्याचा आदेशही यात देण्यात आला आहे.
****
ज्येष्ठ
कवी अशोक नायगावकर यांना यावर्षीचा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक, हा राज्यस्तरीय
पुरस्कार जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र, असं या पुरस्काराचं
स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची सोलापूर शाखा आणि सोलापूरच्या प्रिसिजन फाउंडेशनच्या
वतीनं देण्यात येणारा हा पुरस्कार येत्या दोन
एप्रिलला सोलापूर इथं समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात एक एप्रिलपासून सर्व कार्यालय आणि विभागांनी झीरो पेंडेंसीचा अवलंब करून
प्रलंबित असलेली सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या
आहेत. धाराशिव इथं काल विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सूरत -चेन्नई प्रकल्पाबाबत आढावा घेताना सावंत यांनी,
भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी सर्व तालुक्यांमध्ये दिव्यांगासाठी
शिबीर घेऊन त्यांना उपचारासोबत दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्रही देण्याचं नियोजन करावं,
असं त्यांनी सांगितलं. जिल्ह्याच्या विकासासाठी असलेला निधी योग्य पद्धतीत खर्च करण्याबाबतही
पालकमंत्र्यांनी सूचित केलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड, वैजापूर आणि लासुर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत
२१ जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयानं ही माहिती दिली. सोमवारपासून
अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, दोन दिवसात ६२२ अर्ज विक्री झाले.
****
कोल्हापूर
जिल्ह्यात इचलकरंजी इथं झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये लातूरच्या सोनबा लवटे यानं एकशे
दहा किलो वजनी गटात ‘कुमार महाराष्ट्र केसरी’
हा किताब पटकावला आहे. त्यानं लातूर जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलं
होतं. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी लवटे याचं अभिनंदन केलं असून, त्याला
भविष्यात होणाऱ्या स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठ आणि प्राध्यापक ठाकरे गौरव संस्था यांच्या
संयुक्त विद्यमानं दिला जाणारा देशपातळीवरील दुसरा गणितरत्न पुरस्कार कोलकाता इथल्या
भारतीय सांख्यिकी संस्थेच्या प्राध्यापक नीना गुप्ता यांना काल प्रदान करण्यात आला.
एमजीएमचे अध्यक्ष कमलकिशोर कदम यांनी हा पुरस्कार प्रदान केला. गुप्ता यांनी मागील
सात दशकांपासून अनुत्तरीत असलेला 'झरिस्की कॅन्सलेशन प्रॉब्लेम' पूर्णतः सोडवण्यात
यश मिळवलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातला सोयगाव तालुका दुर्गम असला तरी याठिकाणी जनसुविधा आणि विकास
कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असं पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
सोयगाव इथं काल लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. मागेल त्या
शेतकऱ्यांना विहीर, शेततळं आणि गरज तिथं पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्याचा निर्णय राज्य
शासनानं घेतलेला असून, शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन भुमरे यांनी यावेळी
केलं. सोयगाव तालुक्यासाठी सिंचन आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री अब्दुल
सत्तार यांनी यावेळी दिली.
****
महावितरणच्या
कृषी वीज धोरणाअंतर्गत वीजबिलात तीस टक्के माफीची मुदत येत्या एकतीस तारखेला संपत असल्यामुळे
शेतकऱ्यांनी कृषीपंपांचं वीजबिल भरून टाकावं, असं आवाहन महावितरणनं केलं आहे. कृषी
धोरणात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज आणि विलंब आकारात माफी, तर सुधारीत थकबाकीतही
३० टक्के सूट देण्यात आली असून, शेतकऱ्यांना सुधारीत थकबाकीच्या केवळ सत्तर टक्के रक्कम
आणि सप्टेंबर २०२० पासूनचं चालू बिल भरायचं आहे. या सवलतीचा लाभ घेऊन छत्रपती संभाजीनगर
जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त व्हावं, असं महावितरणनं म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment