Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 March
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
: २७
मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक बातम्या
·
अवयव
दान हे जीवन देण्याचं सशक्त माध्यम-मन की बात मधून पंतप्रधानांचं संबोधन
·
श्वसन
विकारांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना
·
शेतकऱ्यांना
चांगले दिवस यावे, यासाठी काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
·
देशाची
हुकूमशाहीकडे वाटचाल-माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका
·
मराठवाड्यातल्या
२०५ ग्रंथालयांची शासन मान्यता रद्द
·
लातूर
इथं पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात
·
स्विस
खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय जोडी अजिंक्य
·
जागतिक
महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताला आणखी दोन सुवर्णपदकं
आणि
·
मुंबई
इंडियन्सने पटकावलं पहिल्या महिला प्रिमियर लीगचं विजेतेपद
सविस्तर बातम्या
अवयव
दान हे एखाद्याला जीवन देण्याचं एक सशक्त माध्यम असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या `मन की बात` मालिकेतल्या नव्व्याण्णवाव्या
भागातून देशवासियांशी संवाद साधत होते. अवयव प्रत्यारोपणासंदर्भात राज्यांच्या अधिवासाची
अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे आता रुग्ण देशाच्या कोणत्याही
राज्यात जाऊन, अवयव मिळवण्यासाठी नोंदणी करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. पुण्यामधल्या
एम एस आर-ऑलिव्ह गृहसंकुलात पाण्याची मोटर, लिफ्ट आणि विजेचे दिवे सौर उर्जेवर चालवले
जातात, याबद्दल त्यांनी कौतुक केलं. यातून दरमहा अंदाजे चाळीस हजार रुपयांची बचत होत
असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. एप्रिलच्या महिन्यात आपण महात्मा ज्योतिबा फुले
आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत. या दोन्ही महापुरुषांनी समाजातले
भेदभाव दूर करण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिलं, या शब्दांत पंतप्रधानांनी त्यांचं स्मरण
केलं. सध्या काही ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकानं
सुरक्षेची तशीच स्वच्छतेचीही काळजी घ्यावी, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड, इन्फ्लूएन्झा, गंभीर श्वसन
रोग यावर बारकाईनं लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. कोविड आणि इन्फ्लुएंझा या दोन्ही आजारांमध्ये
संसर्गाची माध्यमं, अधिक लोकसंख्येला संसर्गाची असणारी जोखीम, चिकित्साविषयक लक्षणं
याबाबत समानता आहे. गर्दीची आणि कोंदट ठिकाणं टाळणं, खोकताना आणि शिंकताना तोंडावर
रुमाल ठेवणं, सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं, हात वारंवार धुणं यासारख्या
साध्या उपायांनीसुद्धा हे आजार टाळता येऊ शकतात, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
शेतकऱ्यांना
चांगले दिवस आले पाहिजे, या महत्त्वाच्या अजेंड्यासाठी हे सरकार काम करत असल्याची ग्वाही,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिर्डी इथल्या ‘महापशुधन एक्स्पो-२०२३ चा
काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी हा आपला
केंद्रबिंदू असून, शेतकरी आदर्श मानूनच शासन काम करत असल्याचं, त्यांनी सांगितलं. पशुधन
लम्पीमुक्त करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांनी विभागाचं
कौतुक केलं. शिर्डी इथं थीम पार्क उभारण्यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधीची
कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
देशाची
हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असून, २०२४ मध्ये हेच सरकार सत्तेवर आलं, तर ती शेवटची निवडणूक
असेल, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मालेगाव इथं जाहीर
सभेत बोलत होते. लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेससोबत एकत्र आलो आहोत, मात्र सावरकरांचा
अपमान सहन करणार नाही, असं त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्पष्ट सांगितलं
ते म्हणाले…
Byte…
मी राहूल गांधीना सांगतोय
की, आपण एकत्र आलो आहोत जरुर, या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आलो आहोत. पण आता जर
वेळ चुकली, तर आपला देश हुकुमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, हे माझं स्पष्ट मत आहे.
ही लढाई जी आहे. ती लोकशाहीची लढाई आहे. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही सहन नाही
करणार. अजिबात करणार नाही. सावरकर आमचं दैवत आहे, त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही.
सावकरांनी जे काही केलेलं आहे, ते सर्वसामान्याचं एड्या गबाळ्याचं काम नाही.
शेतकऱ्यांच्या
बांधावर जायला मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याची टीका ठाकरे यांनी केली. नैसर्गिक संकटात
महाविकास आघाडीने तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई दिल्याचं सांगताना, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर
टीका केली.
Byte…
मी दिवाळीच्या वेळेला पाहिलं
होतं, तुम्ही पण पाहिलं असेल टी व्ही वरती मुख्यमंत्री रमले शेतीत. यांच्या शेतीमध्ये
दोन दोन हेलिपॅड. मुख्यमंत्री हेलिकॉप्टर ने शेतात जातो. माझा शेतकरी रात्री अपरात्री
वीज आल्यानंतर शेतात जातो कधी साप चावतो कधी विंचू डसतो. इथं वीजेचा पत्ता नाही. शेतमालाला
भाव नाही. घरची लग्नकार्य अडकलेली आहेत. आणि मुख्यमंत्री स्वतःच्या शेतात रमतात. पण
या शेतकऱ्यांच्या बांधावरती यायला तुम्हाला वेळ नाही?
सत्ता
मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेत असल्याची टीका ठाकरे
यांनी केली. निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षनावाच्या निर्णयावरूनही ठाकरे
यांनी टीका केली, आपल्या पक्षाला आपण शिवसेनाच म्हणणार याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
दरम्यान,
उद्धव ठाकरे यांची येत्या दोन एप्रिलला छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहे. या सभेसाठी
काल महविकास आघाडीचा मेळावा झाला, त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी ही माहिती दिली.
****
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांची पुढच्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेचा
काल पदाधिकारी मेळावा घेण्यात आला, त्यात पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी ही माहिती
दिली.
****
केंद्र
आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी प्रगती करावी, असं आवाहन
केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. काल जालना इथं जिल्हा कृषी
महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या पिकाचं अधिक
उत्पादन होतं, याचा अभ्यास करुन केंद्र शासनानं त्या पिकाच्या वाढीसाठी आणि अन्न प्रक्रिया
उद्योगांना प्रोत्साहन मिळावं यासाठी जिल्हानिहाय पिकांची निवड केली आहे. जालना जिल्ह्यात
मोसंबीचं जास्त उत्पादन होतं, मोसंबीवर आधारित प्रक्रिया उद्योग करण्यासाठी अनुदानही
उलपब्ध करुन देण्यात येणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं. येत्या ३० मार्चपर्यंत चालणाऱ्या
या कृषी महोत्सवात शासकीय दालन, शेतीशी संबंधित कंपन्यांचे स्टॉल्स, बचत गटाचे स्टॉल्स,
खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे स्टॉल्स, यांचा समावेश आहे.
दरम्यान,
दानवे आणि पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत काल जिल्ह्यात आनंदाचा शिधा वाटपाला
सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातल्या तीन लाख ४५ हजार ६६२ कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरित
केला जाणार आहे.
****
शेतकऱ्यांना
मदत करण्यापेक्षा राज्य सरकार जाहिरातबाजी करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते
अजित पवार यांनी केली आहे. जालना जिल्ह्यात तीर्थपुरी इथल्या अंकुशराव टोपे सागर सहकारी
साखर कारखान्याच्या ६० हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचं उद्घाटन काल
पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. अवकाळी पाऊस, गरपीट यासारख्या संकटामुळे
शेतकरी अडचणीत सापडला असून, सरकार मदतीचं फक्त आश्वासन देत आहे, मात्र प्रत्यक्षात
मदत करतच नाही, असा आरोप पवार यांनी केला.
****
भारत
राष्ट्र समिती पक्षाने महाराष्ट्रात तांत्रिक मान्यता घेतली असून, तेलंगणाच्या धर्तीवर
महाराष्ट्रात विकासकामे केली जातील, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री, बीआरएसचे अध्यक्ष के
चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथं जाहीर सभेत
बोलत होते. बीआरएस महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपासून पाय घट्ट रोवेल, असा
विश्वासही चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केला.
****
अग्निवीरांच्या
पहिल्या तुकडीचं प्रशिक्षणोत्तर पथसंचलन उद्या मुंबईत आय एन एस चिल्का इथं होणार आहे.
सुमारे दोन हजार ६०० अग्निवीरांनी चिल्का इथं सुरु असलेलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण
केलं. या अग्निवीरांमधे २७३ महिला अग्निवीरांचाही समावेश आहे. नौदलप्रमुख अॅडमिरल आर.
हरी कुमार या समारंभाचे मुख्य अतिथी असतील. यशस्वी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढच्या
सागरी प्रशिक्षणासाठी किनाऱ्यावर असलेल्या युद्धनौकांवर तैनात केलं जाणार आहे.
****
राहुल
गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधात काल काँग्रेस पक्षाच्या वतीनं
देशभर संकल्प सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. मुंबईत काँग्रेसतर्फे केलेल्या या आंदोलनात
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, भाई जगताप यात सहभागी झाले होते.
नागपूर इथंही संविधान चौकात काँग्रेस पक्षातर्फे धरणं आंदोलन करण्यात आलं.
लातूर
इथं जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी चौकात सत्याग्रह करण्यात आला. या
सत्याग्रहात आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्यासह जिल्हाभरातील काँगेस कार्यकर्ते
सहभागी झाले होते.
****
मराठवाड्यातल्या
२०५ ग्रंथालयांची शासन मान्यता रद्द करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथले सहाय्यक
ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी काल ही माहिती दिली. ते छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा
ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या वतीनं
राज्यातल्या अकार्यक्षम ग्रंथालयांना नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र या ग्रंथालयांनी
खुलासे सादर न केल्यानं ग्रंथालय संचालनालयानं ही कारवाई केली आहे. या ग्रंथालयांमध्ये
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या २०, जालना २९, नांदेड आणि बीड प्रत्येकी ३८, धाराशीव
१९, परभणी १६, लातूर ३० तर हिंगोली जिल्ह्यातल्या १५ ग्रंथालयांचा समावेश आहे. जिल्हा
ग्रंथालयांना ६० टक्के वाढीव अनुदानाची रक्कम येत्या चार ते पाच दिवसात मिळणार असल्याचंही
हुसे यांनी सांगितलं.
****
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने परिघाबाहेरचे कलावंत
घडवल्याचे गौरवोद्घार प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काढले आहेत. जागतिक रंगभूमी
दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं विद्यापीठाच्या नाट्य महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर
ते बोलत होते.
Byte…
संधी मिळाली तर खूप लोकं
काहीही करू शकतात, सगळ्यात टॅलेंट आहे. आपल्या सीमा ठरल्या आहेत, पण त्या परिघाबाहेर
पण टॅलेंट असतं. मला नॅशनल अवॉर्ड मिळाले डिरेक्टर म्हणून. असंही शक्य आहे. तर माझं
मत आहे की, पुणे, मुंबई सोडून औरंगाबाद जगाच्या कानाकोपऱ्यात चंद्रपूर कुठल्याही कोपऱ्यात
महाराष्ट्राच्या जगाच्या भारताच्या टॅलेंट भरलेलं आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे,
नवीन चेहरे आले पाहिजे.
दाक्षिणात्य
रसिकांच्या तुलनेत कलेवरची आपली श्रद्धा कुठेतरी कमी पडते, याचा विचार मराठी माणसांनी
करावा, असं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी यावेळी केलं. मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीला
अनेक मोठे कलावंत देणाऱ्या नाट्यशास्त्र विभागाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, या
वर्षात संस्मरणीय कार्यक्रम घेऊन विभागानं राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्तरावर कलावंत
घडवावेत, अशी अपेक्षा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी व्यक्त केली.
****
लातूर
इथं काल पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली. ज्येष्ठ दिग्दर्शक
जब्बार पटेल यावेळी उपस्थित होते. लातूर परिसरातल्या गुणवत्तेला कला क्षेत्रातही वाव
मिळावा म्हणून हा महोत्सव महत्त्वाचा असल्याचा विश्वास जब्बार पटेल यांनी व्यक्त केला.
स्वीडिश दिग्दर्शक तारीक सालेह यांचा 'बॉय फ्रॉम हेवन' हा चित्रपट दाखवून या महोत्सवाचा
प्रारंभ करण्यात आला. कविता दातीर आणि अमित सोनावणे दिग्दर्शित 'गिरकी', मयूर करंबळीकर
दिग्दर्शित 'डायरी ऑफ विनायक पंडित' आणि अनिल साळवे दिग्दर्शित 'ग्लोबल आडगाव'हे तीन
मराठी चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.
****
बॅडमिंटनपटू
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं स्विस खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या
पुरुष दुहेरीचं सुवर्ण पदक पटकवलं आहे. त्यांनी काल बासेल इथं अंतिम सामन्यात चिनच्या
रेंन झियांग यू आणि टॅन क्विंग यांचा २१-१९, २४-२२ असा सरळ गेम्समध्ये सहज पराभव केला.
****
जागतिक
महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत चार सुवर्णपदकं जिंकत भारतानं या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं
आहे. काल भारताच्या निखत जरीन आणि लवलिना बोर्गोहेन यांनी सुवर्णपदक पटकावलं. निखतने
५० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात. व्हिएतनामच्या गुयेन थी टॅम हिचा पराभव केला,
तर लवलिनानं ७५ किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या केटलिन पार्कर हिचा पराभव केला. या
स्पर्धेत भारताच्या नीतू घंसास आणि स्वीटी बुरा या दोघींनीही सुवर्ण पदक पटकावलं आहे.
****
मुंबई
इंडियन्स संघाने पहिल्या महिला प्रिमियर लीग स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. नवी मुंबईत
काल झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात खेळाडू राखून
पराभव केला. प्रथम फलंदाजी करत दिल्लीच्या संघाने दिलेलं १३२ धावांचं लक्ष्य मुंबई
इंडियन्सने १९व्या षटकात तीन खेळाडू गमावत पूर्ण केलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन आशा स्वयंसेवकाची सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कारासाठी
निवड करण्यात झाली आहे. सर्वोत्कृष्ट अशा सेविका पुरस्कार, सिल्लोड तालुक्यात उंडणगाव
प्राथमिक केंद्रात कार्यरत सरला दौलत वाघ यांना, द्वितीय पुरस्कार संगीता त्रिंबक घुले
यांना, तर तृतीय उत्कृष्ट आशा पुरस्कार, दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत
मिरा रूपचंद तीरच्छे यांना जाहीर झाला आहे. अनुक्रमे २५, १५ आणि ५ हजार रुपये या पुरस्कारांचं
स्वरुप आहे. या आशा स्वयंसेविकांप्रमाणे इतर स्वयंसेविकांनीही काम करावं, असं आवाहन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केलं आहे.
****
ग्रामीण
भागातल्या सर्व कुटुंबांना २०२४ पर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन
योजनेंतर्गत, लातूर जिल्ह्यात ९३५ गावात ८९९ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या
आहेत. ५७२ कोटी २७ लाख रुपयांच्या या सर्व कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून,
आतापर्यंत ६४ कामे पूर्ण झाली आहेत.
****
चालू
आठवड्यात आकाशात एक अद्भुत खगोलीय घटना पहायला मिळणार आहे. बुध, शुक्र, गुरू, मंगळ
आणि युरेनस हे पाच ग्रह सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर एकाच वेळी पाहता येणार आहेत.
उद्या मंगळवारी सायंकाळी हे दृश्य अधिक छान दिसेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment