Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 25 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
· विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप.
· आपलं सरकार हे कायद्याने स्थापन झालेलं
बहुमताचं सरकार-मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार.
· राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द
करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान.
आणि
· कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हिंगोली
जिल्ह्यात भिरडा इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी.
****
विधानसभेचं कामकाज आज संस्थगित झालं. या
अधिवेशनात विधानसभेच्या एकूण १८ बैठका झाल्या, यामध्ये १६५ तास ५० मिनिटं
कामकाज होऊन १७ विधेयकं संमत झाली, सरकारकडून ५५ तारांकित प्रश्नांची उत्तरं
दिली गेली, तर १४५ लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाल्याची माहिती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
दिली. पुढील पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून मुंबईत होणार आहे.
****
आपलं सरकार हे कायद्याने स्थापन झालेलं
बहुमताचं सरकार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. आपण घेतलेला निर्णय
लोकभावनेतून घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले -
आम्ही घेतलेली ही भूमिका आहे ही सर्वसामान्यांची भूमिका आहे. मला खूप लोकं चांगले
भेटतात. विविध क्षेत्रांमध्ये ज्यांची किर्ती आहे, ते मला नेहमी सांगतात, ज्या ज्या
कार्यक्रमामध्ये मी जातो, तिकडे सांगतात फार एकनाथराव तुम्ही धाडसी काम केलं. ते राज्याच्या
हिताचं काम होतं. आणि योग्य वेळी केलं. परंतू जे केलं ते आम्ही छातीठोकपणे केलंय. या
सर्वसामान्य लोकांच्या मनातलं काम केलं. या शिवसेना भाजप युतीच्या मतदारांचं मॅनडेट
होतं ते आम्ही काम केलं. हिंदुत्वाची बेईमानी केली त्यांच्या विरोधात आम्ही काम केलं.
****
विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या
चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. या चर्चेदरम्यान छत्रपती
संभाजीनगर इथं प्रधानमंत्री आवास योजनेत झालेल्या घोटाळा प्रकरणी होत असलेल्या कारवाईबाबत
फडणवीस यांनी माहिती दिली. ते म्हणाले -
छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जेवढं ते
टेंडर होतं, त्याच्या चारपट घरं ही बांधण्याचे कार्यादेश देण्यात आलेत. ज्यावेळेस हे
सरकार आलं, त्यावेळेस काही तक्रारी प्राप्त झाल्या. म्हणू आपण त्याच्यावर कमिटी तयार
केली आहे. त्या कमिटीने सांगितलं की, ही सगळी प्रक्रिया सदोष आहे. त्यासंदर्भात असं
लक्षात की याच्यात काही घोटाळे झालेत. म्हणून ही सर्व प्रक्रिया रद्द झाली. त्याच्यावर
गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. कारण विकासकांनी खोटे कागदपत्र त्याठिकाणी वापरल्याचं
देखील लक्षात आलंय. आणि ज्या अधिकाऱ्यांनी केलंय त्यांच्यावरदेखील कारवाई सुरू आहे.
****
राज्यातल्या मंदिरांच्या समस्यांविषयी
सरकार गंभीर असून, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकारी, मंदिर विश्वस्त, पुजारी यांची स्वतंत्र बैठक घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे, विधानभवनात मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत
ते आज बोलत होते. दरम्यान, राज्यातल्या मंदिरांवर प्रशासक आणि न्यायाधीश
यांची नियुक्ती करू नये, अशी मागणी आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज
यांनी केली आहे.
****
'दी मॅजेस्टिक' या विधानमंडळ अतिथीगृह तसंच
आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन आणि कोनशिलेचं अनावरण मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांच्या हस्ते आज झालं. या वास्तुचं अत्याधुनिकीरण येत्या १८ महिन्यात पूर्ण
करणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ‘दि मॅजेस्टिक' वास्तू ही टू-ए दर्जाची हेरिटेज
इमारत असून ती धोकादायक झाली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार याचं
नूतनीकरण होत आहे.
****
महाराष्ट्र लोकायुक्त विधेयकासाठी विधिमंडळाच्या
दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची संयुक्त चिकित्सा समिती नेमण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सभागृहाला ही माहिती दिली. १८ सदस्यांची ही संयुक्त
समिती असणार आहे. या समितीत विधानपरिषदेतले सहा आणि विधानसभेतले बारा सदस्य असतील तसंच काही विशेष निमंत्रितांचाही यात समावेश असेल असं
उपसभापतींनी सांगितलं.
****
खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधीमंडळाच्या
दोन्ही सभागृहात दाखल हक्कभंग सूचना पुढील कारवाईसाठी राज्यसभेच्या सभापतींकडे पाठवण्यात
येणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सदनात ही माहिती दिली.
राम शिंदे यांनी ही हक्कभंगाची सूचना मांडली होती. राऊत यांनी खुलासा करतांना हक्कभंग
समितीच्या निःपक्षपातीपणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, त्या मताशी आपण सहमत नसल्याचंही
गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, विधानसभेकडूनही हे प्रकरण राज्यसभा अध्यक्षांकडे
पाठवण्यात येणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात स्पष्ट केलं.
राऊत यांच्या कडून हक्कभंगासंदर्भात समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचं नार्वेकर म्हणाले.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभा
सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. या
याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची मागणी गांधी यांच्यातर्फे करण्यात आली आहे. केरळच्या
आभा मुरलीधरन यांनी राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात याचिका
दाखल केली आहे.
दरम्यान, सदस्यत्व रद्द केलं म्हणजे
आपल्याला गप्प केलं जाऊ शकतं, हा भारतीय जनता पक्षाचा भ्रम आहे, आपण प्रश्न विचारत राहू असं, राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्ली
इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. अडानी यांच्या शेल कंपनीत २० हजार कोटींची गुंतवणूक
कुणाची आहे, असा सवाल गांधी यांनी विचारला असून, विमानतळ हस्तांतर प्रकरणी केंद्र सरकारने
अदानी यांच्याशी बेकायदा व्यवहार केल्याचा आरोप गांधी यांनी केला.
****
दरम्यान, अडानी प्रकरणावरुन राहुल गांधी
देशात भ्रम पसरवत असल्याचं, भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं
आहे. ते आज पाटणा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असंही
प्रसाद यांनी सांगितलं. राहुल गांधी यांच्याप्रमाणे आजवर ३२ सदस्यांचं सदस्यत्व रद्द
झालं असल्याची माहितीही प्रसाद यांनी दिली.
****
विधान परिषदेचं कामकाजही आज संस्थगित झालं.
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सदनात ही घोषणा केली.
****
काँग्रेसचे नेते राहुल गांधी याचं लोकसभा
सदस्यत्व रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आज राज्यात ठिकठिकाणी
निदर्शने करण्यात आली. ठाणे इथं पंतप्रधान मोदी आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध घोषणाबाजी
करत आंदोलन करण्यात आलं. धुळे इथंही काँग्रेसच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध निदर्शने करण्यात आले.
****
दरम्यान, राहुल गांधी यांनी इतर मागास
वर्ग- ओबीसी संदर्भात अवमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत भारतीय जनता
पक्षाच्या वतीनं आज राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आलं. मुंबई इथं गांधी आणि कॉँग्रेस
विरोधात घोषणा देत निषेधाचे फलक दर्शवण्यात आले. धुळे आणि शिरपूर इथही गांधी यांच्या
विरोधात आंदोलन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर मधील हर्सुल टी पाँईट
इथं रास्ता रोको आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी राहुल
गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत त्याचं दहन केलं.
धाराशिव इथंही आज गांधी यांच्या कथित वक्तव्याच्या
निषेधार्थ भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
****
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज हिंगोली
जिल्ह्यातल्या भिरडा इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. अवकाळी
पावसामुळे जिल्ह्यातल्या अनेक भागात शेतीचं नुकसान झालं आहे. शासन तातडीने शेतकऱ्यांनी
मदत करणार असल्याचं आश्वासन सत्तार यांनी दिलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या
शाळातल्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या ५० गुणवंत विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड
झाली आहे. या मुलांना श्रीहरिकोटा इथलं अंतरिक्ष केंद्र तसंच थुंबा इथं स्पेस म्युझियम, वीरेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्निकल म्युझियम पाहता येणार आहे. या साठी शाळास्तर, केंद्रस्तर, तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर चाळणी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड करण्यात
आली.
****
छत्रपती संभाजीनगर परिमंडळात वीज देयक
थकबाकीचा भरणा होत नसल्यानं महावितरणकडून सर्व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची
कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत छत्रपती संभाजीनगर परिमंडळातल्या
९ हजार ७१ थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर परिमंडळात ३ लाख ७९ हजार ५४६ ग्राहकांकडे ६५० कोटी रुपयांच्या
वीजबिलांची थकबाकी आहे.
****
No comments:
Post a Comment