Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मार्च २०२३ सायंकाळी
६.१०
****
· सर्वोच्च न्यायालयानं नपुंसक म्हटलं हा राज्याचा अपमान - अजित पवार यांची टीका.
· राज्य सरकारनं राजीनामा द्यावा - नाना पटोले यांची मागणी.
· सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारविरुद्ध निर्णय दिलेला नाही - उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस.
आणि
· एआयएमआयएम आणि भारतीय जनता पक्षामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये तणाव - अंबादास
दानवे यांचा आरोप.
****
सर्वोच्च न्यायालयानं या सरकारला नपुंसक सरकार म्हटलेलं आहे. हा महाराष्ट्राचा
अपमान नाही का, असा प्रश्न विधान सभेतले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज पत्रकारांशी
बोलताना उपस्थित केला. हा सरकारचा कमीपणा नाही का, आपण अधिवेशन काळात दररोज या संदर्भात
आवाज उठवत होतो, असंही त्यांनी या संदर्भात नमूद केलं.
****
राज्य सरकारनं तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांनीही आज केली. राज्यातल्या भारतीय जनता पक्ष प्रणित शिंदे सरकारच्या
नऊ महिन्यांतल्या कारभारानं राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असल्याचा आरोप त्यांनी
मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला. काही संघटनांच्या भडकाऊ भाषणांनी राज्यात धार्मिक
वाद वाढत आहेत. सरकार त्यावर काहीच कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार
नपुंसक असल्याचे ताशेरे ओढले आहेत. न्यायालयानं ते काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद
विकोपाला जात आहेत असा संताप व्यक्त केला आहे, असं पटोले म्हणाले. सत्ताधारी पक्षातले
आमदार खासदार खुलेआम गुंडगिरी करतात. गृहमंत्र्याच्या घरात कुख्यात माफीयाचा हस्तक
राजरोस वावरतो तरी पोलीस यंत्रणा, गृहमंत्र्यांना त्याची खबर लागत नाही, अशी टीका त्यांनी
केली. माजी मंत्री, आमदार यांच्यावर हल्ले होतात तरीही त्याची दखल घेतली जात नाही.
सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळीबार करतो तरी त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली
जाते, असा आरोपही पटोले यांनी केला.
****
सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारविरुद्ध निर्णय दिलेला नाही, अशी प्रतिक्रीया
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात दिली आहे. या संदर्भात पत्रकारांशी
बोलताना ते म्हणाले –
सॉलिसिटर
जनरल साहेबांनीही इतर राज्यांमध्येही काय काय होतंय आणि कसं महाराष्ट्रालाच पिन पॉईंट
करण्याचा प्रयत्न होतोय हे लक्षात आणून दिल्यानंतर एक जनरल स्टेटमेंट सगळ्यांबद्दल
त्यांनी केलेलं आहे की राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतंय
की कुठेही राज्य सरकारच्या विरूद्ध निर्णय दिलेला नाही. कुठेही कंटेम्पट सुरू केलेला
नाही. जाणीवपूर्वक कुठलं तरी वाक्य एखादं काढायचं आणि त्या सदंर्भात बोलायचं, मला वाटतं
हे जे बोलतायत त्यांना न्यायालयाची कारवाई समजत नाही. न्यायालय काय म्हणतंय हे देखील
समजत नाही आणि त्यामुळे हे लोकं असं बोलतायत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशानं सातत्यानं उच्च आर्थिक वृद्धी
दर साध्य केला असून कोविड काळातही सगळ्या समस्या योग्य पद्धतीनं हाताळल्या असल्याचं
केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज जी -२० समुहाच्या व्यापार
आणि गुंतवणूक कार्यसमुहाच्या बैठकीत ते बोलत होते. भारत अनेक विकसित आणि विकसनशील देशांसाठी
प्रेरणास्त्रोत आहे. तसंच जागतिक व्यापारासाठी केंद्र सरकार सुक्ष्म आणि लघू उद्योगांच्या
एकत्रितकरणावर भर देत असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं.
****
मुंबई-गोवा महामार्गाचं काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल आणि यामुळं
कोकण विभागाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असं केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग
मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते आज आज पनवेल तालुक्यातील खारपाडा
येथे या संदर्भातल्या प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ झाला, त्यावेळी गडकरी बोलत होते.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय वाहतुकीला अडथळा आणणारे टोल नाके न ठेवता महामार्गांवर
उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
श्रीरामनवमी आज ठिकठिकाणी भक्तीभावात साजरी करण्यात येत आहे. जालना शहरासह जिल्ह्यात
रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जुना जालना परिसरातल्या आनंदवाडी इथल्या श्रीराम
मंदिरात तसंच नवीन जालन्यातल्या श्रीराम मंदिरातही विविध धार्मिक क्रार्यक्रम सुरू
आहेत. या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असून येथे श्रीरामाच्या
प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पैठण इथंही आज रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात
आली. नाशिक इथं पंचवटी परिसरातल्या श्री काळाराम मंदिरात भाविकांनी आज मोठी गर्दी केली.
शिर्डी इथं साईबाबा देवस्थानात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धुळे
शहरात श्रीराम मंदिरात आज राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. वाशिम, सोलापूर, पंढरपूर
इथंही रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
****
पत्रकार शिवीगाळ, धक्काबुक्की प्रकरणात अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयानं
दिलासा दिला आहे. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयानं आज संपूर्ण प्रकरण
रद्द केलं आहे. तसंच अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेले समन्स उच्च न्यायालयानं रद्द
केले आहेत. वर्ष २०१९ मध्ये सलमान खान अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना पत्रकार अशोक
पांडे यांनी त्याचं चित्रीकरण केलं. हे चित्रीकरण त्यानं `यू ट्यूब`वर अपलोड करण्यासाठी
केलं होतं. ही बाब सलमान आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाला आवडली नाही. त्यामुळं सलमान
आणि त्याच्या सुरक्षा रक्षकानं त्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, अशी तक्रार या
पत्रकारानं पोलिसांकडे केली होती.
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड - नांदेड रस्त्यावर ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात आज
एका सात महिन्यांच्या बालिकेसह पाच मजुरांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.
मुदखेड शहरातून निघालेल्या या रिक्षातून दहा जण कामासाठी नांदेडला येत होते. मुगट शिवारा
जवळ समोरुन आलेल्या ट्रकने रिक्षाला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी
दिली. जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भीषण अपघातामुळं
मुदखेड नांदेड मार्गांवरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल
दोन गटांमध्ये झालेला वाद आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर
नागरिकांनी आज या भागात शांततेचा संदेश देत ऐक्याची
मिरवणूक काढली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलिसांकडून या प्रकरणाची
माहिती घेतली तसंच नागरिकांना एकोप्यानं सण साजरे करण्याचं आवाहन केलं. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्ष
नेते अंबादास दानवे यांनी या प्रकणात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन -एआयएमआयएम
आणि भारतीय जनता पक्षाला दोष दिला आहे. पोलिस रोखठोक भूमिका घेण्यात कमी पडल्याची टीकाही
त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी
बोलताना
केली.
ते म्हणाले –
मागच्या
महिनाभरापासून लोक बोलत होते. मी सुद्धा चारदा पोलिसांना बोललो, कमिशनरांना बोललो.
परंतु मला असं वाटत त्याची दखल घेतली गेली नाही. जातीय विद्वेश स्वतःच्या राजकीय पोळ्या
भाजण्यासाठी याठिकाणी होत आहेत. आणि पोलिस कमीशनर सुद्धा याबाबती सुस्पष्टपणे रोखठोक
भूमिका घेण्यास कमी पडले असं मी समजतो. परंतू या दंगलीला एमआयएम आणि भारतीय जनता पार्टी
आणि बाकीचे त्यांचे मित्र हे जबाबदार आहेत, हे मी जबाबदारीनं सांगतो.
[$724C5F1E-4B7D-49FE-A362-A346742C390A$Ambadas
Danve Byte for 30.03.2023 - Ambadas Danve Byte for 30.03.2023 - ]
****
छत्रपती संभाजीनगर मधील तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी त्यात
तेल ओतण्याचा प्रयत्न करु नये असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी केलं आहे. ते आज पुण्यामध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. छत्रपती
संभाजीनगर मध्ये दोन धर्मात तेढ आणि तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात प्रशासन
कमी पडले. संपूर्ण राज्यात यापद्धतीचे तणाव निर्माण करण्याचा कट काही लोकांचा आहे.
असा तणाव छत्रपती संभाजीनगर मध्ये होईल असं खाजगीत असंख्य लोकं कुजबुजत होते. पोलिस
प्रशासनानं यासंदर्भात अधिक लक्ष घालून दोन धर्मात कटूता निर्माण होणार नाही. याची
काळजी घेण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केलं.
****
नांदेड जिल्ह्यातील किनवट इथून आज आनंदाचा शिधा वितरणाला प्रारंभ करण्यात आला.
पात्र गरजूंना याचा विशेष लाभ होणार असल्याचं प्रतिपादन आमदार भिमराव केराम यांनी यावेळी
केलं.
****
No comments:
Post a Comment