Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 March
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०३ मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
·
ईशान्य भारतातल्या दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीला बहुमत, मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक
२६ जागा
·
पुण्यातील कसबा पेठमध्ये काँग्रेस तर चिंचवडमध्ये भारतीय
जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय
·
केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी
निवड समिती स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
·
विरोधकांना देशद्रोही म्हटलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत
स्पष्टीकरण
·
विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या
विरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव
·
खासदार संजय राऊत यांच्या विरोधातील
हक्कभंग प्रस्तावावर सात दिवसात खुलासा मागवणार
- उपसभापती नीलम गोऱ्हे
·
बाजार समितीत कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश
देण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
·
राज्याच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर १४ मार्च ला पुढची सुनावणी होणार
·
राज्यातल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा १२ वीच्या उत्तरपत्रिका
तपासणीवरचा बहिष्कार मागे
आणि
·
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत पराभवाच्या छायेत
****
ईशान्य भारतातल्या तीन राज्यांमध्ये
झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्रिपुरा आणि नागालँडमधे भारतीय
जनता पक्ष आणि मित्र पक्षांनी बहुमत प्राप्त केलं आहे. मेघालयात
सत्ताधारी नॅशनल पीपल्स पार्टीला सर्वाधिक
२६ जागा मिळाल्या आहेत.
६० सदस्य संख्या असलेल्या त्रिपुरा विधानसभेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट
बहुमत मिळालं आहे. त्यांचा ३२ जागांवर विजय झाला आहे. त्याखालोखाल त्रिपुरा मोठा पार्टीला
१३, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला ११ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला तीन जागी
विजय मिळाला आहे.
नागालॅंडमध्ये
६० जागांपैकी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव्ह पार्टीला २५ आणि भारतीय जनता पक्षाला १२ जागांवर विजय मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात उमेदवार विजयी झाले आहेत, तर केंद्रीय मंत्री
रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याही दोन उमेदवारांनी विजय मिळवला
आहे.
५९ सदस्य संख्या असलेल्या मेघालय विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी नॅशनल
पीपल्स पार्टीला सर्वाधिक २६ जागा मिळाल्या
आहेत. त्याखालोखाल युनायटेड डेमोक्रॅटीक पार्टीला ११ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस
आणि तृणमूल काँग्रेसला प्रत्येकी पाच जागांवर तर भारतीय जनता पक्षाला दोन जागांवर विजय
मिळाला आहे.
****
पुण्यातल्या दोन विधानसभा
मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत, कसबा पेठ इथं काँग्रेसचे
रविंद्र धंगेकर आणि चिंचवड इथं भारतीय जनता पक्षाच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या
आहेत. धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी तर अश्विनी जगताप ३६ हजार मतांनी निवडून आल्या
आहेत.
कसबापेठ मतदार संघात काँग्रेसचे
धंगेकर यांना ७३ हजार ३०९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत
रासने यांना ६२ हजार ३९४ मते मिळाली आहेत.
चिंचवडमध्ये जगताप यांना एक लाख
३५ हजार ६०३ मतं मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी नाना काटे यांना ९९ हजार ४३५ तर अपक्ष
उमेदवार राहूल कलाटे यांना ४४ हजार ११२ मते मिळाली आहेत. या निकालावर
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार प्रतिक्रीया देताना
म्हणाले:
‘‘माझी परिस्थिती थोडी खुशी
थोडी गम अशी झालेली आहे. दोन्ही पोटनिवडणुका पुण्यामध्ये होत्या. आम्ही सगळ्यांनी खऱ्या
अर्थाने महाविकासा आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो. जनतेच्या मनामध्ये एकदा
एखादा निश्चय त्यांनी केला की या कुठल्याही गोष्टीला अर्थ राहत नाही. जनतेच्या मनामध्ये
आत्ता या प्रकार हे सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे, ते जनतेला आवडलेलं नाही. निश्चितपणे
याला आत्ताचे सत्ताधारी पक्ष विचार करतील अन् त्यांना विचार केल्याशिवाय गत्यंतर नाही.’’
****
केंद्रीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात दाखल याचिकेवर काल
झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं, हे निर्देश दिले आहेत. या समितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि
सरन्यायाधीशांचा समावेश असेल. निवडणूक आयुक्त नियुक्त करण्यासाठी संसदेत कायदा करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले असून, जोपर्यंत हा कायदा होत नाही, तोपर्यंत समितीच्या
माध्यमातूनच निवडणूक आयुक्त नेमले जातील, असं स्पष्ट केलं
आहे.
सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्णयाचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. न्यायालयाचा
निकाल, हा लोकशाहीला जिवंत ठेवणारा असल्याचं त्यांनी
म्हटलं आहे. काल मुंबईत माध्यमांशी बोलताना ते
म्हणाले:
‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या
निकालाकडे पाहिलं तर एक महत्वपूर्ण निकाल हा मानायला पाहिजे की निवडणूक आयुक्त जे फक्त
एका मर्जीने नेमल्या जायचे. तर साहजिकच आहे. बेबंदशाहीला वेळीच रोखण्याची गरज आहेच.
कारण जर का बेबंदशाहीला वेळीच रोखलं नाही तर आपल्या देशांमध्ये काळ तर सोकावेल, पण
काळाबरोबर हुकुमशाहीसुद्धा सोकावेल. आणि त्याच दृष्टीने जर का विचार केला तर निर्णय
हा स्वागतार्ह आहे.’’
****
विधानपरिषदेत
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अन्य सदस्यांनी दिलेल्या हक्कभंग प्रस्तावावर, काल मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आपली बाजू स्पष्ट केली. तत्पूर्वी
सदस्य अनिल परब आणि दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना सभागृहात निवेदन करण्यावर आक्षेप
घेत, हा प्रस्ताव समितीकडे पाठवण्याची मागणी केली. मात्र उपसभापती निलम गोऱ्हे यांनी
आक्षेप फेटाळत मुख्यमंत्री शिंदे यांना आपली बाजू मांडण्यास परवानगी दिली. विरोधी पक्षनेत्यांसह विरोधकांना देशद्रोही असं म्हटलेलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी
यावेळी सांगितलं. ते म्हणाले:
‘‘नवाब मलिक हा
देशद्रोही आहे. त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. दाऊद बरोबर ज्याचे संबंध प्रस्थापित झालेले
आहेत.त्याला मी देशद्रोही म्हटलेलं आहे. पुन्हा मी देशद्रोही म्हणेल. पण यामध्ये अजितदादांना
देशद्रोही म्हटलेलं नाही. त्या देशद्रोह्याला आपण पाठिशी घालतात. त्याचा राजीनामा मागत
नाही म्हणून बरं झालं आपण आम्हाला महाराष्ट्रदोही म्हणालात तर आपल्या बरोबर आमचं चहा
पिणं टळलं बरं झालं याच्यामध्ये माझं काय चूक आहे.’’
मुख्यमंत्र्यांनी
सभागृहाला किंवा विरोधकांना देशद्रोही म्हटलेलं नसल्याचं स्पष्ट केल्यानं हा
हक्कभंग प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवायचा की नाही याबद्दल निर्णय देण्यात येईल
असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं.
****
विरोधी पक्ष
नेत्यांकडून सरकारला महाराष्ट्र द्रोही म्हणणं हा सरकारचा अपमान असल्याचं सांगत, भारतीय जनता
पक्षाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी काल विधानपरिषदेत, विरोधी
पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.
विरोधी पक्ष नेत्यांकडून अशा प्रकारचं वक्तव्य अशोभनीय असल्याचं दरेकर यांनी हा प्रस्ताव
मांडताना सांगितलं.
****
राज्यसभा
खासदार संजय राऊत यांनी विधी मंडळासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल
भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांनी राऊत यांच्या विरोधात विधानपरिषदेत काल
हक्कभंग प्रस्ताव मांडला. यासंदर्भात चौकशी करून वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं
असू, हा हक्कभंग प्रस्ताव हक्कभंग समितीकडे पाठवण्यात येईल, तसंच या संदर्भात सात दिवसात राऊत यांच्याकडून लिखित खुलासा मागवण्यात
येईल, असं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी
यावेळी सांगितलं. संसदेच्या खासदारावर हक्कभंग दाखल झाल्यास अध्यक्ष किंवा
सभापतींकडे पाठवण्याची प्रथा असल्याचं त्यांनी यावेळी सदनात सांगितलं.
****
विधान
परिषदेत काँग्रेसच्या गट नेतेपदी सतेज पाटील यांची, तर मुख्य
प्रतोदपदी अभिजित वंजारी आणि प्रतोदपदी राजेश राठोड यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या गट नेतेपदी प्रवीण दरेकर, मुख्य
प्रतोदपदी भाई गिरकर आणि प्रतोदपदी प्रसाद लाड यांची निवड करण्यात आली आहे. तर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात
आल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल सभागृहात सांगितलं.
****
भारतीय
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ - नाफेडनं तीन शेतकरी उत्पादक कंपन्याच्या
माध्यमातून राज्यात दहा ठिकाणी कांदा खरेदी सुरू केली आहे.
या कंपन्यांनी बाजार समितीत कांदा खरेदी केंद्र सुरू केली नसतील तर त्यांना बाजार
समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देऊ, अशी
माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. छगन भुजबळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आतापर्यंत
नाफेड मार्फत १८ हजार ७४३ क्विंटल कांदा खरेदी केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर
शेतकऱ्यांना मदत जाहीर करू असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबईसह
राज्यातल्या महानगर पालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या
पाच वरून कमाल दहा करण्याची तरतूद असणारं विधेयक विधानसभेत काल मंजूर झालं.
****
उद्धव ठाकरे
गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरच्या प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत, नव्यानं
स्थापन हक्कभंग समिती स्वायत्त आणि तटस्थ स्वरूपाची असणं अपेक्षित होतं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं
आहे. राऊत यांनी केलेलं विधान विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया होती, मात्र, त्यांच्या विधानाचा विग्रह न करता ऐकल्यास,
विधानाचा अर्थ स्पष्ट होतो असंही त्यांनी या संदर्भात सामाजिक
संपर्क माध्यमावरुन नमूद केलं. हक्कभंगाची मागणी करणाऱ्या
सदस्यांचाच हक्कभंग समितीत समावेश असणं हे, तक्रारदारालाच
न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासारखं असून, यामुळे न्यायाची अपेक्षा कशी करता येईल, असा प्रश्न देखील
पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
****
राज्याच्या
सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या
घटनापीठासमोर पुढची सुनावणी १४ मार्च ला होणार आहे. काल शिंदे गटाच्या वतीने नीरज कौल आणि
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला. १४ मार्चला पुन्हा साळवे यांचा युक्तीवाद
होणार असून, शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी, मनिंदर सिंग हे देखील बाजू मांडणार
आहेत. राज्यपालांच्या वतीने महाधिवक्ता तुषार मेहता युक्तीवाद करतील, त्यानंतर कपिल
सिब्बल प्रत्युत्तर देतील. वकील असीम सरोदे यांनी मतदारांच्या वतीने बाजू ऐकून घेण्याची
विनंती केली, त्यावर सिब्बल यांच्याशी चर्चा करुन लेखी बाजू मांडण्याचे निर्देश सरन्यायाधीशांनी
यावेळी दिले.
****
राज्यातल्या
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर
या शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याची माहिती
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते काल मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. त्यामुळे बारावीचा निकाल वेळेत लागणार असल्याचं ते
म्हणाले. एक नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित तसंच अंशत:
अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक
असून, याबाबत अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समिती योग्य निर्णय घेणार आहे, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेली १०, २०, ३० वर्षांची आश्वासित
प्रगती योजना शिक्षकांनाही लागू केली जाईल यासह अन्य मागण्यांबाबत शिक्षकांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
****
बालविवाहासंबंधी समाजानं जागरुक होणं आवश्यक
असून, मुलींचं उज्ज्वल भविष्य आणि
निरोगी आरोग्याकरता समाजाने आपली मानसिकता बदलावी, विशेषत: पालकांनीच बालविवाहासाठी पुढाकार घेऊ नये, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
यांनी केलं आहे. जालना इथं काल ''महिला आयोग आपल्या दारी'' या उपक्रमातंर्गत घेण्यात आलेल्या
जनसुनावणीत त्या बोलत होत्या.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा लोटू पाटील
नाट्य पुरस्कार मुंबईचे समिक्षक रविंद्र पाथरे यांना, तर यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय
पुरस्कार चित्रकार राजु बाविस्कर यांना जाहीर झाला आहे. मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव
ठाले पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या पुरस्कारांची घोषणा केली. येत्या १२ मार्चला
या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि
वाहतुकीला आळा घालण्यासाठी विशेष भरारी पथक नेमून अधिक कठोर कारवाई करण्यात येईल,
असं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधान
परिषदेत सांगितलं. डॉ. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली जिल्ह्यात मद्य निर्मिती,
विक्री, वाहतूक अनुषंगानं लक्षवेधी उपस्थित
केली होती, त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनानंतर या विभागाची
स्वतंत्र बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असं
देसाई म्हणाले.
****
काँग्रेस
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक इथं गॅस
दरवाढीच्या विरोधात आंदोलन केलं. शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ यांनी आंदोलकांचं
नेतृत्व केलं. रिकामं गॅस सिलेंडर वाजवून आणि चुलीवर स्वयंपाक करत सरकारच्या
विरोधात घोषणाबाजी यावेळी देण्यात आली.
****
बॉर्डर -
गावसकर चषक मालिकेमध्ये इंदूरमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत पराभवाच्या छायेत
आहे. काल दुसऱ्या दिवशी भारताचा दुसरा डाव १६३ धावांवर संपुष्टात
आला. त्यामुळे कसोटी सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ ७६ धावांचं आव्हान मिळालं आहे. दुसऱ्या डावात
भारताच्या चेतेश्वर पुजारानं सर्वाधिक ५९ धावा केल्या. नेथन लायन
यानं आठ गडी बाद केले. तत्पूर्वी काल सकाळच्या सत्रात
कालच्या चार बाद १५६ धावांवरुन पुढं खेळताना ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव १९७
धावांवर संपला. रविंद्र जडेजानं चार तर रविचंद्रन अश्विन आणि
उमेश यादवनं प्रत्येकी तीन गडी बाद केले.
****
धाराशिव
तालुक्यात कसबे तडवळे इथल्या कळंब रोड रेल्वे स्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना
थांबा देण्यात यावा, या मागणीसाठी रेल्वे आंदोलन परिषदेनं काल अन्नत्याग आंदोलन
केलं. या रेल्वे स्थानकाशी परिसरातल्या ५० गावातले शेतकरी, व्यापारी
आणि नागरिकांचे व्यवहार निगडित आहेत, असं परिषदेचे अध्यक्ष
कोंडाप्पा कोरे यांनी सांगितलं.
****
आर्थिक
निर्भरता आणि स्वालंबन हाच महिलांच्या सुरक्षिततेचा मार्ग असल्याचं, नांदेड
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी म्हटलं आहे.
जिल्हा कृषि महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, काल सेंद्रीय
परसबाग लागवड स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात त्या बोलत होत्या. महिलांनी
संघटीत होऊन, परिसरातल्या उपलब्ध स्त्रोतांवर उद्योग करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
दरम्यान, या कृषी
महोत्सवात आज शेतकरी सन्मान दिवस साजरा करण्यात येणार असून, यानिमित्तानं जिल्ह्यातल्या १६ प्रगतशील शेतकऱ्यांचा,
१६ महिला बचत गटांचा आणि पाच शेतकरी उत्पादक
कंपन्याचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
****
No comments:
Post a Comment