Saturday, 25 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद , दिनांक : 25.03.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 March 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याने राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द

·      काँग्रेससह विरोधी पक्षांची कडाडून टीका;गांधी यांच्या निषेधात भाजपचं आज आंदोलन 

·      गोसेवा आयोग विधेयकाला विधानसभेची मंजुरी

·      वित्त विधेयक २०२३ लोकसभेत आवाजी मतदानानं संमत

·      केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ

·      छत्रपती संभाजीनगर नामकरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

·      लातूर ते नांदेड थेट रेल्वे मार्गाची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मागणी 

·      महाराष्ट्र भूषण हा आपल्यासाठी भारतरत्नच-ज्येष्ठ गायिका आशा भोसले

आणि

·      सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी


सविस्तर बातम्या

राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाने काल याबाबतचं पत्र जारी केलं. मानहानीच्या एका खटल्यात सूरतच्या जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधींना दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी शिक्षा झाल्यास, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा नियम आहे. या नियमानुसार लोकसभा सचिवालयानं गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं आहे.

या कारवाईनंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवर संदेश जारी करत, आपण भारताच्या आवाजासाठी लढत आहोत, आणि त्यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार असल्याचं म्हटलं आहे.

राहुल गांधी सातत्याने संसदेत आणि संसदेच्या बाहेरही सरकार विरोधात बोलत असल्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची टीका काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी काल पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

****

गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात काल विधानसभेत विरोधी पक्षांनी अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान सभात्याग केला. काँग्रेससह विरोधी पक्षांनी काळ्या फिती लावून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अजय चौधरी, यांच्यासह अनेक आमदार या निदर्शनात सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही, हा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा असल्याचं, अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, हा निर्णय म्हणजे लोकशाहीचं हत्याकांड असल्याचं म्हटलं आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

हा निर्णय द्वेष भावनेतून घेण्यात आल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वरच्या न्यायालयात जाण्याची मुभा असताना, तातडीने अशी कारवाई करणं चूक असल्याचं, आंबेडकर यांनी नमूद केलं.

दरम्यान, राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात झालेल्या अवमानकारक आंदोलनाच्या मुद्यावरून विधानसभेचं कामकाज काल तीन वेळा तहकूब करावं लागलं. वारंवार घडणाऱ्या या घटना रोखण्यासाठी एक आचारसंहिता लागू केली जाईल, तिचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना, सभागृहाचं पावित्र्य जपणं दोन्ही बाजूंचं काम असून, यापुढे सगळ्यांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असं सांगितलं. ते म्हणाले...

 

 Byte…

तुम्ही जर या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांच्या विरुद्ध बोलत असाल तर बिलकुल आम्ही सहन करणार नाही. तुम्ही जर बाहेर जाऊन या देशाचा अपमान करत असाल तर ते कोण खपवून घेणार? तुम्ही वारंवार सावरकरांचा अपमान करत असाल तो कोण सहन करणार.. आणि म्हणून या पुढे सगळ्यांनी बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे, या सदनाचा मान राखला पाहिजे

****

राज्यात गुंडगिरी आणि धार्मिक तेढ वाढली असून फोडा आणि झोडा असं धोरण सत्ताधाऱ्यांकडून राबवलं जात असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. काल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरूवात करताना ते बोलत होते. ऑनलाईन गेममुळे तरुण पिढी वाईट मार्गाला जात आहे, त्यावर तातडीनं बंदी घाला आणि त्याचा प्रचार करणाऱ्या अभिनेत्यांवर गुन्हे दखल करा अशी मागणी पवार यांनी केली.

****

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला सुरुवात केली. राज्यातलं सरकार जाहिरातबाजी करण्यात आणि विरोधकांना केंद्रीय संस्थांच्या तपासात अडकवण्यात मग्न आहे, मात्र राज्याच्या विकासाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची टीका, त्यांनी केली. सरकार फक्त घोषणा करतंय पण पुढे अंमलबजावणी काहीच नाही असं सांगत त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

****

राज्यातल्या प्रकल्पग्रस्तांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी सर्वंकष धोरण आणण्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते.

****

जात प्रमाणपत्रासंदर्भात येत्या १५ दिवसात विस्तृत बैठक घेणार असल्याचं, सहकारमंत्री अतुल सावे यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य राजन साळवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर ते उत्तर देत होते.

****

गोसेवा आयोगाची स्थापना करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधेयकाला विधानसभेत काल मंजुरी देण्यात आली. देशी पशुधनाच्या वाणाच्या संरक्षण, संवर्धन आणि विकास करणं, तसंच देशी गोधनाचं रक्षण करून त्यांचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं, हे विधेयक आणण्यात आलं. देशात यापूर्वी सात राज्यांमध्ये या आयोगाची स्थापना करण्यात आली असून, महाराष्ट्र हे आठवं राज्य असल्याची माहिती, पशुसंवर्धन विभाग मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. विधान परिषदेतही विखे पाटील यांनी हे विधेयक सादर केलं.

****


राज्यात जिल्हा परिषद शाळांमधल्या शिक्षकांचा पगार इतरत्र खर्च करणाऱ्या संबंधित जिल्ह्यातल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. आमदार सतीश चव्हाण यांनी, यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती.

****

वित्त विधेयक २०२३ काल लोकसभेत संमत झालं. त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या परदेशातल्या वक्तव्याप्रकरणी सत्ताधारी सदस्यांनी, तर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कथित अदानी घोटाळ्यासंदर्भात संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी, घोषणाबाजी केल्यानं, संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज बाधित झालं. लोकसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच राहिला मात्र तालिका अध्यक्षांनी गदारोळातच कामकाज सुरू ठेवलं. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्त विधेयक सभागृहासमोर सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं.

****

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. हा भत्ता आता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के करण्यात आला आहे. एक जानेवारी २०२३ पासून हा निर्णय लागू होईल. या निर्णयाचा एक कोटीपेक्षा अधिक केंद्र सरकारी कर्मचारी तसंच निवृत्तीवेतन धारकांना लाभ होणार आहे.

****

नवीन पेन्शन योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय र्अथ सचिवांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल ही माहिती दिली.

****

सक्तवसुली संचालनालय, तसंच केंद्रीय अन्वेषण विभाग सारख्या तपास यंत्रणांकडून देशभरात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांवर कारवाई सुरू आहे. त्या विरोधात काँग्रेससह १४ विरोधी पक्षांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर येत्या पाच एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. ईडी आणि सीबीआयकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांची होणारी अटक टाळण्यासाठी अटकपूर्व आणि अटकेनंतर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी विरोधकांनी या याचिकेत केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापुढं असल्याचं राज्य शासनाचे वकील बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं ही याचिका विचारात घ्यायला नकार दिला.

****

मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून लातूर ते नांदेड थेट रेल्वे मार्गाची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल विधानसभेत बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लक्ष घालून हा प्रस्ताव केंद्राकडे कधी पाठवणार हे सांगावं, असं चव्हाण म्हणाले. रेल्वे विकासातून मराठवाडा पूर्णपणे वगळण्यात आल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात उत्तर देताना, या प्रकल्पाला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही देत, मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं.

****

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते काल मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात आशाताईंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, २५ लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. चित्रपट तसंच गायन क्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपल्यासाठी भारतरत्न असल्याची भावना आशाताईंनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या...

 

Byte….

माझा जन्म १९३३ साली सप्टेंबर महिन्यात. ४३ साली माझं पहिलं गाणं माझं बाळ या सिनेमेसाठी मी रेकॉर्ड केलं. त्यावेळी मी फक्त १० वर्षाची होते आणि आज पर्यंत  मी उभी आहे आणि गाते आहे आणि गात राहणार. हे जे मला महाराष्ट्र भूषण मिळालं आहे माझ्या मते भारत रत्न आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आज २५ मार्च, २७ मार्च आणि १३ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन संचालकांनी सर्व संलग्नित महाविद्यालयांना पत्र पाठवलं आहे. आज विविध १३ विषयांची परीक्षा होणार होती, आता ही परीक्षा आठ एप्रिलला तर काही विषयांची परीक्षा १३ एप्रिलला होईल. २७ मार्च रोजी होणारी परीक्षा दहा आणि १५ एप्रिलला, तर १३ एप्रिलला होणारी परीक्षा २६ एप्रिलला घेण्यात येणार आहे.

****

लातूर जिल्ह्यात निलंगा - औराद शहाजनी मार्गावर कार खड्यात कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी हा अपघात झाला. मृत सर्वजण चाकूर इथल्या सावळे कुटुंबातले होते. जखमींवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यात एका महिलेचा दोन मुलांसह विहिरीत बुडून मृत्यू झाला. तुळजापूर तालुक्यात कुंभारी शिवारात काल दुपारी ही घटना निदर्शनास आली. तुळजापूर पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

****

सांगलीच्या प्रतीक्षा बागडी हिने पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान पटकावला आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत प्रतिक्षाने लपेट डावावर कल्याणच्या वैष्णवी पाटील हिला चितपट केलं. प्रतिक्षाला चांदीची गदा, महाराष्ट्र केसरी किताब आणि रोख ५१ हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं.

****

महिला प्रिमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघादरम्यान होणार आहे. काल झालेल्या उपान्त्य सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने युपी वॉरियर्सचा ७२ धावांनी पराभव केला.

****

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या दगडोजी महाविद्यालय आणि आरोग्य विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांनी काल जनजागृती फेरी काढली होती.

लातूर इथं जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने जनजागृती फेरी काढण्यात आली.

****

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात धाराशिव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली. जिल्ह्याला साडे सहाशे रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, जिल्ह्याने सहाशे एक्कावन्न उद्योगांना बँकांकडून अर्थसहाय्य देऊन हे उद्दीष्ट पूर्ण केल आहे. यात सेवा तसंच निर्मिती उद्योगांचा समावेश आहे. यामुळे आकांक्षित धाराशिव जिल्ह्यातील रोजगार निर्मितीत वाढ होऊन दरडोई उत्पन्नात वाढ होण्याचा विश्वास वर्तवण्यात आला आहे.

****

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षात १०८ सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना मंजुरी देण्यात आली आहे. याची एकूण प्रकल्प किंमत सात कोटी ४७ लाख ३२ हजार इतकी आहे.

****

खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या कथित वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं क्रांतीचौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत त्यांचं छायाचित्र फाडलं.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जेल भरो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****

मान्सूनपूर्व उपाययोजनेबाबत संबंधित विभागाने सतर्क राहून कामे करावीत अशा सूचना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हयात येत्या काळात पाणी टंचाई भासू नये यादृष्टीने देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.

****

लातूर इथं महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नवतेजस्वीनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते काल या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. उद्यापर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शन विक्री महोत्सवात ७५ महिला बचत गटाचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

परभणी इथं 'तेजस्विनी महोत्सव २०२३'चं उद्घाटन महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते काल झालं. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आणि जागतिक महिला दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं, हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. काल पहिल्याच दिवशी दोन हजारावर महिलांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

बीड इथंही आजपासून तीन दिवसीय स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या उत्पादनांचं प्रदर्शन-विक्री आणि महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे.

****

No comments: