Wednesday, 5 April 2023

[$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$RNU AIR Aurangabad - Signature Tune - ]

****

नमस्कार, आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते.

**** 

ठळक बातम्या

****

** राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या एकूण एक लाख नव्याण्णव हजार चारशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण 

** कोविडच्या संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन

** महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातल्या, आठशे पासष्ट गावांमध्ये, राज्याची महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू  

** शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीनंतर, ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांचे एकमेकांवर कठोर आरोप- प्रत्यारोप

** राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज छाननी

** गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांचा इशारा 

** आणि

** आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर सहा गडी राखून विजय 

**** 

आता सविस्तर बातम्या 

**** 

राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेती आणि फळपिकांच्या, एकूण एक लाख नव्याण्णव हजार चारशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागानं ही माहिती दिली. गेल्या महिन्यात चार ते नऊ तारखेदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे, राज्यात ३८ हजार ६०६ हेक्टर, तर पंधरा ते वीस तारखेदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे, एक लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. याच्या नुकसान भरपाईच्या निधीच्या मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, निधी वितरणाला तत्काळ मंजुरी दिली जाईल, असंही मदत आणि पुनर्वसन विभागानं कळवलं आहे. 

**** 

राज्यात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचं आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते. राज्यात सध्या मास्क वापरणं बंधनकारक नसल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या १३ आणि १४ तारखेला राज्यातल्या विविध रुग्णालयांमध्ये कोविडसंबंधी मॉक ड्रिल घेतली जाणार आहे, तसंच सर्वेक्षण आणि परिक्षण देखील सुरु आहे. त्यामुळे नागरीकांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं सावंत यांनी सांगितलं. 

दरम्यान, राज्यात काल ७११ नव्या रुग्णांची नोंद झाली, ४४७ रुग्ण बरे झाले, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या तीन हजार ७९२ रुग्णांवर उपचार सुरु असून, राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के, तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.

****

सगळ्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक वर्धक मात्रा देण्याचं धोरण निश्चित करण्याचे आदेश, केंद्र आणि राज्य सरकारसह महापालिका प्रशासनाला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका, मुंबई उच्च न्यायालयानं दाखल करून घेतली आहे. विधिज्ञ धृती कपाडिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर, येत्या सत्तावीस तारखेला सुनावणी होणार आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राबवल्या गेलेल्या लसीकरण मोहिमेत, लसीच्या दोन मात्रा यशस्वीपणे देण्यात आल्या, मात्र काही महिन्यांनी या मात्रांची परिणामकारकता कमी होत असल्यानं, वर्धक मात्रा घेण्याचा सल्ला सगळे तज्ज्ञ देतात, याकडे या याचिकेतून लक्ष वेधण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांत देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी सात दिवसांपेक्षाही कमी असल्याचं दिसून येत आहे.

****

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातल्या, महाराष्ट्र् शासनानं दावा सांगितलेल्या आठशे पासष्ट गावांमध्ये, महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बीदर जिल्ह्यांतल्या आठशे पासष्ट गावातल्या नागरिकांची, यासंदर्भातली मागणी लक्षात घेत, विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार काल शासन निर्णय जारी करण्यात आला. या गावांमधल्या अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, प्राधान्य गटातली कुटुंबं आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे. 

**** 

राज्यातल्या सहा हजार दोनशे रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गेल्या नऊ महिन्यांमध्ये पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहिती दिली. यावर्षीच्या मार्च महिन्यात विक्रमी अकरा कोटी पंचाण्णव लाख रुपयांची मदत गरजू रुग्णांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे या महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीनंतर, काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर कठोर आरोप- प्रत्यारोप केले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे यांनी काल सहकुटूंब रोशनी शिंदे यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. ते म्हणाले, 

[$74171B2C-7797-4AF0-9984-CD637FB5BBA1$Uddhav thackrey for RB 05.04. - Uddhav thackrey for RB 05.04. - ] 


यावर फडणवीस यांनी नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना, या मारहाणीसंदर्भात तपास करून दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं. उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना, आम्ही तोंड उघडलं तर पळता भुई थोडी होईल, असं ते म्हणाले. 

[$2080B3E1-EE70-46E3-8479-2A56172D9990$devendra fadanvis for RB 05.04 - devendra fadanvis for RB 05.04 - ] 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेचा निषेध करतानाच मारहाण करणाऱ्या महिलांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. कोणत्या मानसिकतेचे लोक सत्तेत आहेत, हे या घटनेवरून लक्षात येतं, या शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली. 

दरम्यान, विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करावी, परंतू देवेंद्र फडणवीस यांच्यावरची खालच्या पातळीची व्यक्तिगत टीका खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. वेळप्रसंगी मातोश्री बाहेर या विरोधात आवाज उठवू, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला. 

**** 

सावरकरांवर टीका करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी गौरव यात्रा काढल्याचं, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं सावरकर गौरव यात्रेत बोलत होते. स्वातंत्र्यलढ्यासोबतच समाज सुधारणा, अंधश्रद्धा निर्मुलन, भाषा शुद्धी आदी क्षेत्रात सावरकरांचं योगदान मोठं असून, जन्मभर देशाची तसंच समाजाची सेवा करणाऱ्या सावरकरांचं कार्य राहुल गांधी यांना कधीच समजू शकणार नाही, असंही फडणवीस म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या कार्याचा गौरव केलेलं पत्र त्यांनी वाचून दाखवलं. सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत आघाडी केल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. 

**** 

देशातल्या ग्रामीण भागात ६० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठ्याचं उद्दीष्ट साध्य झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. हे मोठं यश असून, यामुळे अनेक लोकांच्या आयुष्याला बळ मिळेल, असं त्यांनी आहे. जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या ट्विटला उत्तर देताना, पंतप्रधानांनी या योजनेला गती देण्यासाठी सरकार प्रयत्नरत असल्याचं सांगितलं. 

****

राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज छाननी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सात बाजार समित्यांसाठी एक हजार २५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या बाजार समित्यांसाठी येत्या १८ एप्रिलला मतदान होणार आहे. 

नांदेड बाजार समितीच्या १८ जागांसाठी २९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातल्या नांदेड, नायगाव, कुंटूर, भोकर आणि हिमायतनगर या पाच बाजार समित्यांसाठी एकूण ७५८ अर्ज दाखल झाले आहेत. 

हिंगोली जिल्ह्यातल्या चार बाजार समितीच्या ७२ संचालक निवडीसाठी एकूण ५४३ अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्जांची छाननी झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २० एप्रिल पर्यंत आहे.

****

[$AB89D14E-5308-429A-8A73-A9DB7B02155C$RAVIKUMAR  MID BREAK NEW - RAVIKUMAR  MID BREAK NEW - ] 

**** 

जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती काल साजरी झाली. ठाण्यातल्या श्री ठाणा जैन महासंघाच्या भव्य रथयात्रेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला. यानिमित्तानं मुख्यमंत्र्यांनी जैन बांधवांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

छत्रपती संभाजीनगर इथं सकल जैन समाजाच्या वतीनं भगवान महावीर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. महावीर स्तंभ इथं सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठण गेट इथून शोभायात्रेला प्रारंभ झाला. प्राऊड ऑफ जैन या विषयावर आधारित सजीव देखावे या शोभायात्रेतून सादर करण्यात आले. महावीर मेडीकल फांऊडेशनच्या वतीनं यावेळी महारक्तदान शिबीर घेण्यात आलं.

**** 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करण्याचा इशारा, कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. परीक्षेची वेळ संपल्यावर देखील विद्यार्थ्यांना बोलवून उत्तरपत्रिका लिहिण्यात आल्याची तक्रार असलेल्या, शेंद्रा इथल्या वाल्मिकराव दळवी महाविद्यालयाच्या चौकशीसाठी, त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. याशिवाय, वाल्मिकराव दळवी महाविद्यालय तसंच शहरातल्या नवखंडा इथलं डॉक्टर रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोन प्राध्यापकांचं बैठं पथक परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वीपासून ते उत्तरपत्रिका सील करेपर्यंत प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे. 

**** 

बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांची ऑनलाइन नोंदणी करण्यात येऊन त्यांना ओळखपत्र दिलं जाणार आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी ही माहिती दिली. या कामगारांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ देता यावे, यासाठी त्यांची माहिती शासनाकडे असणे गरजेचं आहे. यादृष्टीने जिल्हा परिषद, स्वयंसेवी संस्था, समाज कल्याण विभाग, गटविकास अधिकारी यांच्या समन्वयाने येत्या २० मेपर्यंत सुमारे दीड महिना ही मोहीम चालणार आहे. 

**** 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ धाराशिव जिल्ह्यात आजपासून जिल्हा गौरव यात्रा सुरू होत आहे. तुळजापूर इथून आज संध्याकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या यात्रेचा शुभारंभ होणार असून, उद्या ही यात्रा धाराशिव शहरात येणार आहे. सावरकर प्रेमींनी या गौरव यात्रेत मोठ्या संख्येने  सहभागी व्हावं, असं आवाहन यात्रा संयोजक भाजपा आणि शिवसेनेनं केलं आहे.

**** 

अहमदनगर महानगरपालिका स्वच्छता सखी तसंच स्वच्छता मित्रांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या स्वच्छोत्सव २०२३ चा शुभारंभ महापौर शेंडगे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. 

**** 

हिंगोली शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेकडून पुन्हा कारवाईसत्र सुरू करण्यात आलं आहे. या कारवाईतून मागच्या आठवड्यात आठशे चौदा वाहनांवर कारवाई करत सहा लाख अडोतीस हजार रुपयांचा दंड लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सय्यद अखिल इब्राहिम यांनी दिली. 

**** 

छत्रपती संभाजीनगरच्या लोकरंजन लोककला प्रतिष्ठानच्या वतीनं सिल्लोड तालुक्यात, शेतकऱ्यांसह समाजातल्या विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करण्यात आला. मागेल त्याला शेततळे, एक रुपयात पीकविमा, नमो किसान सन्मान निधी, रमाई आवास, राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनांसह तृतीयपंथीयांना सन्मानाजनक वागणूक आदींबाबत, हलक्या - फुलक्या विनोदांसह ग्रामीण बाजात नाट्य-संवाद, लोकगीतांद्वारे लोकरंजनातून प्रबोधन करण्यात आलं. 

**** 

ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते, दिग्दर्शक अजित भगत यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६९ वर्षांचे होते. काल सायंकाळी त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आर्य चाणक्य, 'जांभूळ आख्यान' 'सगेसोयरे', आदी नाटकांसह दूरचित्रवाणीवर 'मॅड मॅड मर्डर', 'एक वाडा झपाटलेला', आदी मालिकांसाठीही त्यांनी काम केलं. 'मुंबई मेरी जान' आणि 'कंपनी' या हिंदी चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका साकारली होती. अनेकविध पुरस्कारांनी अजित भगत यांचा गौरव करण्यात आला. भगत यांच्या निधनानं रंगभूमीचं भरून न येणारं नुकसान झाल्याची शोकभावना अभिनय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

**** 

अहमदनगर इथं दिव्यांगांना आधुनिक दर्जेदार कृत्रिम अवयव तसंच कुबड्यांचं वाटप करण्यात आलं. भारत विकास परिषदेची दक्षिण शाखा आणि पुणे हेरिटेज रोटरी क्लब यांच्या वतीनं काल हे अवयव वाटप शिबीर घेण्यात आलं. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातल्या शंभरावर दिव्यांगांना अवयवांचं वाटप करण्यात आलं.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेत काल दिल्ली इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. दिल्लीच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं १६३ धावांचं लक्ष्य, गुजरात टायटन्सनं एकोणिसाव्या षटकात पूर्ण केलं. 

****

भारताचे बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप आजपासून फ्रान्समध्ये सुरु होणाऱ्या ऑर्लिन्स मास्टर २०२३ बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार आहेत. माद्रिद मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभूत झालेली पी व्ही सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय हे या स्पर्धेमधून बाहेर पडले आहेत. 

**** 

राज्यात पुढचे काही दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्या आणि परवा पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी परिपक्व झालेला गहू, भाजीपाला तसंच फळपिकांची काढणी करून सुरक्षित साठवणूक करावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. विजांचा कडकडाट तसंच वादळी वारे वाहत असताना, जनावरांची काळजी घेण्याची सूचनाही विभागानं केली आहे. 

**** 

शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या

****

** राज्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या एकूण एक लाख नव्याण्णव हजार चारशे शहाऐंशी हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण 

** कोविडच्या संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचं आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचं आवाहन

** महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातल्या, आठशे पासष्ट गावांमध्ये, राज्याची महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू  

** शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीनंतर, ठाकरे गट आणि भाजपच्या नेत्यांचे एकमेकांवर कठोर आरोप- प्रत्यारोप

** राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची आज छाननी

** गैरप्रकार करणाऱ्या महाविद्यालयांचं संलग्नीकरण रद्द करण्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांचा इशारा 

** आणि

** आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर सहा गडी राखून विजय 

**** 

या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद -  AURANGABAD AIR NEWS या यू- ट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.

****

[$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$RNU AIR Aurangabad - Signature Tune - ]


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 12 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...