Tuesday, 4 April 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : ०४ एप्रिल २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 04 April 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ०४ एप्रिल  २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करताना सीबीआयनं न घाबरण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

·      काँग्रेस नेते राहुल गांधी यांची अवमानना प्रकरणी सूरत सत्र न्यायालयात आव्हान याचिका दाखल

·      शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता कर्ज उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बँकांना निर्देश

·      २००५ नंतर सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      वेतन श्रेणीच्या मुद्यावरुन तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचं कालपासून कामबंद आंदोलन

·      कळंब नगरपालिकेतल्या १५ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

आणि

·      यपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा लखनौ संघावर १२ धावांनी विजय

****

केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करताना न घाबरण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. सीबीआयच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाचं नवी दिल्ली इथं पंतप्रधान यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी सध्याच्या सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीची कमतरता नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपल्या कामातून, कार्यक्षमतेतून सीबीआयनं लोकांचा विश्वास संपादित केल्याचं त्यांनी सांगितलं.

सीबीआयच्या १८ अधिकाऱ्यांना उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकांनी पंतप्रधानांनी सन्मानित केलं. सर्वोत्कृष्ट तपास अधिकारी म्हणून तीन अधिकाऱ्यांना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आलं. सीबीआयच्या हीरकमहोत्सवानिमित्त टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांनी केलं. पुणे, नागपूर आणि शिलॉंग इथल्या सीबीआयच्या कार्यालयांच्या नवीन इमारतींचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं.

****

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अवमानना प्रकरणी सूरत न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेल्या शिक्षेला काल सूरत सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे. न्यायालयानं त्यांची याचिका दाखल करून घेतली असून, त्यावर आता पुढच्या महिन्यात तीन तारखेला सुनावणी होणार आहे. याप्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. दरम्यान, गांधी यांच्या जामीनाचा कालावधीही न्यायालयानं वाढवला आहे. त्यांना जामीन मंजूर झाला असून, जामीन अर्जावर पुढची सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातून सुरतकडे जाणारे काँग्रेस नेते तसंच कार्यकर्त्यांची गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अनेक कार्यकर्त्यांचे फोन जप्त करण्यात आले. हा लोकशाही संपुष्टात आणण्याचा प्रकार असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनीही गुजरात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरत इथं जात असलेल्या नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी अडवून ताब्यात घेतलं, त्यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला, हे निषेधार्ह असून, गुजरात पोलिसांची वर्तणूक लोकशाहीची गळचेपी करणारी असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

****

पंतप्रधानांच्या पदवीपेक्षा देशात महत्त्वाचे इतर अनेक विषय आहेत, त्यावर लक्ष देण्याची आवश्यकता, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २०१४ साली जनतेने नरेंद्र मोदी यांना पदवी पाहून पंतप्रधान केलेलं नाही, असं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले..

२०१४ ला त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिलंय का ? त्यांनी देशामध्ये २०१४ मध्ये स्वत:चा करिश्मा निर्माण केला. जो भारतीय जनता पक्षाचा काश्मिर पासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्व श्रेय हे नरेंद्र मोदी साहेबांनाच दिलं पाहिजे. मी बऱ्याचदा बघतो मधून अधून मंत्र्यांच्याही डिग्रीचं काढलं जातं. पंतप्रधानांच्याही डिग्रीचं काढलं जातं.तो महत्वाचा प्रश्न आहे ? नाही महत्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांचे, कामगारांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टीला फार महत्व द्यावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही.

रम्यान, छत्रपती संभाजीनगर प्रमाणे महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं. पुढची सभा नागपूर इथं होणार असून, प्रत्येक सभेत प्रत्येक पक्षाचे फक्त दोनच नेते बोलतील, असं धोरण महाविकास आघाडीनं स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले छत्रपती संभाजीनगर इथल्या सभेत उपस्थित नसल्याबद्दल प्रश्न विचारला असता, पवार यांनी, प्रत्येक नेता सभेला उपस्थित असायला पाहिजे, असं आवश्यक नसल्याचं सांगितलं. राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या जाहिातींवरही पवार यांनी टीका केली. छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या दंगलीसंदर्भात पोलिस तपासात राजकीय हस्तक्षेप होऊ नये, तसंच चौकशीअंती दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

****

शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट न लावता सहज कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी बँकांनी पतपुरवठा धोरण आखावं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत नाबार्ड तर्फे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनार मध्ये ते बोलत होते. २०२३-२४ साठीच्या स्टेट फोकस पेपर मध्ये सहा लाख ३४ हजार ५८ कोटी रुपयांच्या पतक्षमतेचा आराखडा तयार केला असून, मागील वर्षाच्या तुलनेत या आराखड्यात ४७ टक्के वाढ झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. हा आराखडा पुढील मार्गदर्शनासाठी राज्य आर्थिक परिषदेत ठेवला जाणार आहे. राज्य सरकारचे विविध विभाग आणि बँकर्स यांचा सहभाग आणि समन्वय असल्यास योग्य दिशेनं विकास होऊ शकेल, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गेल्या नऊ महिन्यात २७ सिंचन प्रकल्पांना गती मिळाली असल्याचं सांगत त्यांनी विविध उपक्रम राबवत असलेल्या नाबार्डचं देखील यावेळी कौतूक केलं.

****

२००५ नंतर राज्य सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना उपदान- ग्रॅच्युइटीची रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. वित्त विभागानं काल यासंदर्भातला आदेश जारी केला. २००५ नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ग्रॅच्युइटी दिली जात नव्हती, आता कर्मचाऱ्यांचं सेवेत असताना निधन झालं, तर त्याच्या कुटुंबियांना, तसंच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला स्वत:ला ग्रॅच्युइटी मिळणार आहे.

****

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या बाराव्या बैठकीत ते बोलत होते. शून्य अपघाताचं उद्दीष्ट समोर ठेवून, अपघात प्रवण क्षेत्र कमी करावं तसंच त्याठिकाणी विशेष उपाययोजना कराव्यात, वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

****

वेतन श्रेणीच्या मुद्यावरुन तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी कालपासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचं असलं तरी या पदाला इतर विभागांमधल्या समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळतं, त्यामुळे किमान वेतन श्रेणी चार हजार ३०० रुपयांवरुन चार हजार ८०० रुपये करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. राज्यातले ६०० तहसीलदार आणि दोन हजार २०० नायब तहसीलदार या संपात सहभागी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ९० नायब तहसीलदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

रम्यान, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या प्रश्‍नांबाबत येत्या दोन दिवसांत बैठक घेवून दिलासादायक निर्णय देण्याची ग्वाही, महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली आहे. ते काल अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, अमोल निकम यांनी तहसीलदारांच्या मागण्‍यांबाबतचं निवेदन विखे पाटील यांना सादर केलं.

****

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं काल पुण्यात नऊ ठिकाणी छापे टाकले. पुण्यातल्या काही व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली असून, ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे.

****

जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीर यांची शिकवण आपल्याला साधेपणा, करुणा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहण्यासाठी सदैव प्रेरित करते. महावीर यांचे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र हे त्रिरत्न जीवनाचं सार्थक करण्यासाठी आपल्याला कटीबद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छापर संदेशात म्हटलं आहे.

****

देशभरात काल तीन हजार ६०० नवे कोरोना विषाणुबाधित रुग्ण आढळून आले, तर एक हजार ८०० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ७६ टक्के आहे. देशात सध्या २० हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, राज्यात काल २४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. २०३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एका रुग्णांचा मृत्यू झाला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा येत्या नऊ मे पासून सुरु होणार आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.भारती गवळी यांनी ही माहिती दिली. या परिक्षा याआधी एप्रिल महिन्यात घेण्यात येणार होत्या, मात्र विविध पदव्यूत्तर इतर अभ्यासक्रमांचे निकाल घोषित न झाल्यामुळे आणि अभ्यासक्रम शिकवणी पूर्ण झाल्यानं या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी  केली होती, त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब नगरपालिकेतल्या १५ नगरसेवकांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचं स्वागत केलं. धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना आणि वैजापूर इथले भारतीय जनता पक्षाचे अभय पाटील चिकटगावकर यांनी काल भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. हैदराबाद इथं तेलंगणाचे मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखरराव यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह त्यांनी हा पक्ष प्रवेश केला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथल्या ग्रामीण रुग्णालयातले तत्कालिन वैद्यकीय अधिकारी शशिकांत पट्टेकर यांना मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गंगाधर ठोंबरे यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि २१ हजार रुपये दंड ठोठावला आहे. १७ ऑगस्ट २००९ रोजी श्रावणबाळ योजनेसाठी प्रत्यक्ष रुग्णाला पाहिल्याशिवाय वयाचे दाखल देणार नसल्याचं पट्टेकर यांनी सांगितल्यामुळे ठोंबरे यांनी त्यांना मारहाण केली होती.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या झोलेगाव शिवारात विहिर ढासळून तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारी ही घटना घडली. मृत कामगार हे राजस्थानमधले राहीवाशी आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय योजनांची जत्रा, या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. ते काल यासंबंधी आयोजित बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी बळीराजा सर्वे ॲप तयार करण्यात आलं असून, अधिकारी कर्मचाऱ्यांनी याअंतर्गत समर्पित भावनेनं सर्वेक्षण करावं, या सर्वेक्षणात गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, या यंत्रणेपासून ते जिल्हाधिकाऱ्यांनीही यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन, केंद्रेकर यांनी केलं.

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये किराडपुरा भागात राम नवमीच्या दिवशी झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी काल आणखी १५ जणांना ताब्यात घेतलं आहे. या सर्वांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांनी सहा एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत या प्रकरणात ३५ जणांना अटक करण्यात आल्याचं, पोलिसांनी सांगितलं.

****

 

 

राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी एकूण १४८ अर्ज दाखल झाले, वैजापूर बाजार समितीसाठी २४२ तर कन्नड बाजार समितीसाठी एकूण २५० अर्ज दाखल झाले. उद्या अर्जांची छाननी होणार असून, सहा एप्रिलला वैध अर्जांची यादी जाहीर होईल.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेत काल चेन्नई सुपर किग्जनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा १२ धावांनी पराभव केला. प्रथम फंलदाजी करत चेन्नइच्या संघानं दिलेलं २१८ धावांचं लक्ष्य साध्य करताना, लखनौ सुपर जायंट्सचा संघ निर्धारित षटकार २०५ धावाच करु शकला.

****

सैन्यातले अधिकारी आणि सैनिकांच्या सेवा निवृत्ती वेतन रक्कमेच्या फरकाच्या संदर्भात, सेवानिवृत्त सैनिकांनी काल छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. दिल्लीच्या जंतरमंतर इथं संपूर्ण देशभरातले सेवा निवृत्त सैनिक यासंदर्भात धरणे आंदोलन करत असून, आपण त्याला पाठिंबा देत असल्याचं, कॅप्टन बाजीराव सोनवणे यांनी यावेळी सांगितलं. सैन्य अधिकारी आणि सैनिकांना समान निवृत्ती वेतन मिळावं अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

****

हनुमान जयंतीचा उत्सव परवा साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं भद्रा मारोतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या भाविकांच्या सुविधेसाठी छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद मार्गावरची वाहतुक उद्या सायंकाळपासून अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरकडून धुळे, देवगाव रंगारीकडे जाणारी जड वाहनं नगरनाका - एएस क्लब - माळीवाडा- वेरुळ - कसाबखेडा मार्गे जातील.

****

राजकोट-मेहबूब नगर-राजकोट या विशेष रेल्वे गाडीच्या दहा एप्रिल ते २७ जून दरम्यान २४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ही रेल्वे गाडी अहमदाबाद, वडोदरा, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, नांदेड, काचीगुडा मार्गे धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 11 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...