Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ एप्रिल २०२३ सायंकाळी
६.१०
****
§ भाजप शिवसेनेच्या सावरकर
गौरव यात्रेला प्रारंभ;छत्रपती संभाजीनगर इथं आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा.
§ भविष्यातील
दृष्टिकोन अंगीकारून ग्रामीण आणि कृषी केंद्रित संशोधन करावं-केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांचं आवाहन.
§ मराठवाडा
शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांचं निधन.
आणि
§ छत्रपती
संभाजीनगर इथल्या दंगलप्रकरणी आतापर्यंत २८ आरोपींना अटक.
****
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी भाजप शिवसेनेच्या सावरकर
गौरव यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेत
सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार
अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन
डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या
संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत. ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी,
श्रद्धा व्यक्त करणारी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
नमूद केलं. ते म्हणाले...
या महाराष्ट्रातील, देशातील जनता सुज्ञ आहे. आणि म्हणून सावरकरांचा आपमान कोणीही खपवून घेणार नाही. याची सुरुवात या गौरव यात्रेमधून सुरु झालेली आहे. प्रखर देशभक्ती सावरकरांच्या वरची व्यक्त करण्याचं काम आपण केलं आहे. असा कार्यक्रम या संपूर्ण राज्यामध्ये सुरु राहणार आहे. आणि यामुळेच खऱ्या अर्थाने ही गौरव यात्रा सावरकरांवर प्रेम व्यक्त करणारी, श्रद्धा व्यक्त करणारी, देशभक्ती, राष्ट्रप्रेम व्यक्त करणारी ही गौरव यात्रा आहे.
मुंबई
इथं आज दादर इथल्या सावरकर सदनातून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला सुरूवात झाली.
मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर
भाजपा आणि शिवसेना कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले होते.
दरम्यान,
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या समर्थनगर भागातून आज सावरकर गौरव
यात्रेला सुरुवात होत आहे. ही यात्रा मराठवाड्यातल्या सर्व लोकसभा
आणि विधानसभा मतदारसंघामधून प्रवास करणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज महाविकास आघाडीची
वज्रमूठ सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख
उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांच्यासह अनेक मान्यवर नेते या सभेला उपस्थित
राहणार आहेत. दरम्यान माजी मंत्री सुभाष देसाई यांनी काल या सभेच्या
तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी
काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, या सभेला मोठा जनसमुदाय येणार
असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान,
या सभेच्या पार्श्वभूमीवर आज शहरातून वाहनफेरी काढण्यात आली.
****
शास्त्रज्ञांनी
भविष्यातील दृष्टिकोन अंगीकारून देश तसंच समाजाला समृद्ध करण्यासाठी ग्रामीण आणि कृषी
केंद्रित संशोधन करावं, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते
आज नागपूर इथं इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या 'वुमन इन सायन्स अँड एन्टरप्रेनरशिप-
वाईस 2023 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सिद्ध झालेले तंत्रज्ञान,
कच्च्या मालाची उपलब्धता, आर्थिक व्यवहार्यता तसंच विपणन क्षमता या चार गोष्टी शिवाय
संशोधनाला महत्त्व नसल्याचं गडकरी यांनी नमूद केलं. इंडियन वुमन सायंटिस्ट असोसिएशनच्या
सर्व पदाधिकाऱ्यांना संशोधनातील नव-नव्या संधी शोधून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी
हातभार लावण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
भारतानं
संरक्षण सामुग्रीच्या निर्यातीत एक विक्रमी उच्चांक प्रस्थापित केला आहे. भारतानं ८५
हून अधिक देशांना सुमारे १६ हजार कोटी रुपयांच्या संरक्षण सामुग्रीची निर्यात केली
आहे. गेल्या ६ वर्षात देशाची या क्षेत्रातली निर्यात १० पट वाढली असून सरकारच्या धोरणांमुळे
हे शक्य झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
देशाला संरक्षण सामुग्री उत्पादन केंद्र बनवण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेलं, असंही
त्यांनी सांगितलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही हे यश महत्त्वपूर्ण
असल्याचं म्हटलं आहे. या क्षेत्रातली निर्यात सतत वाढत राहील असंही ते म्हणाले. देशातल्या
शंभरहून अधिक कंपन्या सध्या संरक्षण सामुग्रीची निर्यात करत असल्याची माहिती संरक्षण
मंत्रालयानं दिली आहे. देशातून ब्रम्होस क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली,
रडार, पिनाक रॉकेट आणि लाँचर आदींची निर्यात होत आहे.
****
इस्रो
अर्थात भारतीय अवकाश संशोधन संघटनेनं पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपण यानाची स्वयं
अवतरण मोहिम आज कर्नाटकात यशस्वीरित्या पार पाडली. चित्रदुर्ग इथल्या चाचणीतळावर आज
सकाळी आरएलव्ही एलव्हीएक्स वायू दलाच्या चिनुक हेलिकॉप्टरद्वारे साडेचार किलोमीटर उंचीवरून
ही चाचणी घेण्यात आली. गती, समुद्र सपाटीपासूनची उंची अशा विविध दहा निकषांवर ही चाचणी
यशस्वी ठरली आहे.
****
नांदेड
इथं गोदावरी नदीवरच्या बंदा घाटावर काल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या
हस्ते समता पर्वाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची
आणि उपक्रमांची यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचं प्रकाशनही मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात
आलं. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून १ एप्रिल
ते १ मे २०२३ हा कालावधी समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत आहे.
दरम्यान,
नांदेड जिल्ह्यात या समता पर्वाच्या निमित्तानं जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या
वतीनं जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष मोहिमेलाही प्रारंभ झाला.
****
माजी
क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं आज गुजरातमध्ये जामनगर इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे
होते. दुर्राणी यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले होते. १९६९ साली प्रदर्शित झालेला
एक मासूम तसंच १९७३ साली प्रदर्शित झालेल्या चरित्र या हिंदी चित्रपटात त्यांनी काम
केलं होतं. दुर्राणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त
केलं आहे.
****
मराठवाडा
शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. अविनाश येळीकर यांचं आज दुपारी हृदयविकाराच्या
तीव्र झटक्यानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे हेाते. मराठवाड्यातील नामांकित प्लास्टिक
सर्जन म्हणून ते प्रसिद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन
परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांनी काम केलं, तसंच मराठवाडा शिक्षण प्रसारक
मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्यांनी सतत पुढाकार
घेतला. छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- घाटीच्या माजी अधिष्ठाता
डॉ. कानन येळीकर यांचे ते पती होत. येळीकर यांच्या पार्थिव देहावर उद्या छत्रपती संभाजीनगर
इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
छत्रपती
संभाजी नगरमध्ये रामनवमीच्या दिवशी किराडपुरा इथं झालेल्या दंगलप्रकरणी २८ आरोपींना
आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी ही माहिती दिली.
ते आज छत्रपती संभाजी नगर इथं पत्रकारांशी बोलत होते. सायबर सेलच्या मदतीनं सीसीटीव्ही
फुटेजच्या माध्यमातून दंगलीतल्या हल्लेखोरांची ओळख पटवून अटक करण्यात येईल. आतापर्यंत
५० पेक्षा जास्त लोकांची ओळख पटली आहे. त्यातील २८ जणांना अटक केली असून काही लोक फरार
असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
****
श्री
क्षेत्र पंढरपूर इथं आज चैत्री यात्रेच्या निमित्तानं श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरं समितीच्या
वतीनं गाभाऱ्यात सुंदर आणि मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. या यात्रेसाठी
राज्याच्या विविध भागातून वारकऱ्यांच्या दिंड्या दाखल झाल्या आहेत. या काळात भाविकांच्या
आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीनं नगरपालिका
प्रशासनाकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
****
अक्कलकोट
तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत १२ उमेदवार
बिनविरोध झाले आहेत. निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत
दोन दिवसात संपत आहे. तरी उर्वरित जागा देखील बिनविरोध करुन निवडणूक टाळण्याची मागणी
सभासदांमधून होत आहे.
****
भारतची
बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान
मानावं लागलं. आज झालेल्या अंतिम फेरीत तिचा इंडोनेशियाच्या ग्रोगोरिया मारिस्का तुनजुंग
हिने २१-८, २१-८ असा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment