आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ एप्रिल २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
सामान्य नागरिकांच्या पॅन
आणि आधार ओळखपत्राचा गैरवापर करुन ११९ बनावट कंपन्या तयार करण्याच्या आरोपावरुन मयुर
नागपाल या व्यक्तीला राजस्थानमधल्या जयपूर इथून काल अटक करण्यात आली. राज्यकर उपायुक्त,
सहाय्यक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकानं जयपूर पोलीसांच्या मदतीनं
ही कारवाई केली. मयुर नागपाल ला काल मुंबईच्या अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी १४
दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
***
समृद्धी महामार्गावर भरधाव
चारचाकीनं ट्रकला मागून धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ डॉक्टर्सचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यामधील
महाबळा इथं मध्यरात्री ही दुर्घटना घडली. अपघातातील
तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
***
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी
इथे रामनवमी यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या
जत्रेत जमिनीवरील फिरता पाळणा निखळून झालेल्या दुर्घटनेत ४ जण जखमी झाले आहेत. काल
रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारासाठी तातडीनं रुगणालयात
दाखल करण्यात आलं असून, या ठिकाणचे फिरते पाळणे तात्काळ बंद करण्याच्या सूचना अहमदनगर
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.
***
सातारा जिल्ह्यातल्या शिखर
शिंगणापूर इथल्या शंभू महादेवाच्या यात्रेचा आज मुख्य दिवस असून मुंगी घाटातून मानाची
तेल्या भुत्याची कावड चढाई करणार आहे. कोल्हापूर मधल्या ज्योतिबा यात्रेत प्रथम क्रमांकाचं
स्थान असलेल्या सातारा तालुक्यातील निनाम - पाडळी इथली मानाची सासनकाठी आज ज्योतिबाकडे
प्रस्थान करणार आहे.
****
जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून २०२४ पर्यंत प्रत्येक
घरात नळाद्वारे पाणी देण्याचं केंद्रसरकारचं उद्दीष्ट असून गावपातळीवर योजनेची अंमलबजावणी
करताना गावागावात जाऊन योजनेतील त्रृटी दूर कराव्यात, वेळ पडली तर पुन्हा सर्वेक्षण
करावं, अशा सूचना राज्याचे महसूल,पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे
पाटील यांनी दिल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यात सुरू असलेल्या
जल जीवन मिशन योजनांच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर काल ते बोलत होते.
//*************//
No comments:
Post a Comment