Monday, 3 April 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.04.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

** संसदेचं कामकाज सलग तेराव्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित

** सीबीआयच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

** पंतप्रधानांच्या पदवीपेक्षा महत्त्वाच्या इतर विषयांवर चर्चा आवश्यक-विरोधीपक्षनेते अजित पवार

आणि

** तहसीलदार तसंच नायब तहसीलदारांचं कामबंद आंदोलन; सकारात्मक निर्णयाची सरकारकडून ग्वाही

****

संसदेचं कामकाज आज सलग तेराव्या दिवशी विरोधकांच्या गदारोळामुळे बाधित झालं. लोकसभेत आज कामकाज सुरू होताच, पुण्याचे खासदार गिरीश बापट आणि केरळमधले माजी खासदार इनोसंट यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोकप्रस्ताव मांडला. सदनानं या दोन्ही सदस्यांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर अध्यक्षांनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी हौद्यात उतरून अदानी समूहाच्या कथित घोटाळ्यासंदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. यानंतर गदारोळ कायम राहिल्यानं अध्यक्षांनी कामकाज बुधवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित केलं.   

राज्यसभेत सकाळी कामकाज सुरु होताच, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळं सभापती जगदीप धनखड यांनी सदनाचं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. राज्यसभेचं कामकाज दुपारनंतर पुन्हा सुरू झाल्यावर सभापती धनखड यांनी राज्यसभा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेनं संमत केलेलं प्रतिस्पर्धा सुधारणा विधेयक राज्यसभेसमोर सादर करताच, विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, सभापतींनी कामकाज बुधवारी सकाळपर्यंत तहकूब केलं.

***

भूतकाळात साध्य केलेल्या उद्दिष्टांबद्दल चर्चा करतानाच भविष्यकाळाबाबत मंथन करणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयच्या हीरक महोत्सव कार्यक्रमाचं नवी दिल्ली इथं पंतप्रधान यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. सीबीआयने गेल्या साठ वर्षांच्या कामकाजातून सामान्य नागरिकांचा विश्वास संपादित केला आहे. यासाठी आजवर या संघटनेत काम केलेले सर्व अधिकारी कर्मचारी कौतुकास पात्र असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

पुणे, नागपूर आणि शिलॉंग इथल्या सीबीआयच्या कार्यालयांच्या नवीन इमारतींचं उद्घाटन आणि सीबीआयच्या ट्विटर हँडलचं अनावरणही यावेळी करण्यात आलं. पंतप्रधानांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदकं प्रदान केली.

***

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अवमानना प्रकरणी सूरत न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुनावलेल्या शिक्षेला आज सुरत सत्र न्यायालयात आव्हान दिलं. न्यायालयानं त्यांची याचिका दाखल करून घेतली असून, त्यावर आता पुढच्या महिन्यात तीन तारखेला सुनावणी होणार आहे. याप्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून गांधी यांची खासदारकी रद्द झाली आहे. दरम्यान, गांधी यांच्या जामीनाचा कालावधीही न्यायालयानं वाढवला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर पुढची सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे.

***

पंतप्रधानांच्या पदवीपेक्षा देशात महत्त्वाचे इतर अनेक विषय आहेत, त्यावर लक्ष देण्याची आवश्यकता विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २०१४ साली जनतेने नरेंद्र मोदी यांना पदवी पाहून पंतप्रधान केलेलं नाही, असं पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले..

 

२०१४ ला त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिलंय का ? त्यांनी देशामध्ये २०१४ मध्ये स्वत:चा करिश्मा निर्माण केला. जो भारतीय जनता पक्षाचा काश्मिर पासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचं सर्व श्रेय हे नरेंद्र मोदी साहेबांनाच दिलं पाहिजे. मी बऱ्याचदा बघतो मधून अधून मंत्र्यांच्याही डिग्रीचं काढलं जातं. पंतप्रधानांच्याही डिग्रीचं काढलं जातं.तो महत्वाचा प्रश्न आहे ? नाही महत्वाचा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्यांचे, कामगारांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे त्या गोष्टीला फार महत्व द्यावं असं आम्हाला अजिबात वाटत नाही.  

 

रम्यान, छत्रपती संभाजीनगर प्रमाणे महाविकास आघाडीच्या राज्यभर सभा होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. पुढची सभा नागपूर इथं होणार असून, प्रत्येक सभेत प्रत्येक पक्षाचे फक्त दोनच नेते बोलतील, असं धोरण महाविकास आघाडीनं स्वीकारल्याचं पवार यांनी सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले छत्रपती संभाजीनगर इथल्या सभेत उपस्थित नसल्याबद्दल प्रश्न विचारला असता, पवार यांनी, प्रत्येक नेता सभेला उपस्थित असायला पाहिजे, असं आवश्यक नसल्याचं सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या दंगलीसंदर्भात पोलिस तपासात राजकीय हस्तक्षेप होऊ नये, असं पवार म्हणाले. चौकशीअंती दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही पवार यांनी केली.

***

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय - ईडीनं आज पुण्यात नऊ ठिकाणी छापे टाकले. पुण्यातल्या काही व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली असून, ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे.

***

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्याला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही शिवाजी महाराजांना अभिवादन केलं.

***

गेल्या २४ तासात देशभरात ३ हजार ६०० नवे कोरोना विषाणुबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एक हजार ८०० रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ७६ टक्के आहे. देशात सध्या २० हजार कोरोना विषाणु बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

***

वेतन श्रेणीच्या मुद्यावरुन तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी आजपासून कामबंद आंदोलन पुकारलं. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचं असलं तरी या पदाला इतर विभागांमधल्या समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळतं, त्यामुळे किमान वेतन श्रेणी चार हजार ३०० रुपयांवरुन चार हजार ८०० रुपये करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. राज्यातले ६०० तहसीलदार आणि दोन हजार २०० नायब तहसीलदार या संपात सहभागी झाले आहेत.

रम्यान, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या प्रश्‍नांबाबत येत्या दोन दिवसांत बैठक घेवून दिलासादायक निर्णय देण्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली आहे. ते आज अहमदनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी विभागाचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, अमोल निकम यांनी तहसीलदारांच्या मागण्‍यांबाबतचे निवेदन विखे पाटील यांना सादर केलं.

***

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९० नायब तहसिलदारांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचं असलं तरी या पदाला इतर विभागांमधल्या समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळतं, त्यामुळे बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचं संघटनेचे कार्याध्यक्ष संजय वरकड यांनी प्रशासनाला सादर केलेल्या निवदेनात म्हटलं आहे.

***

सोलापूर इथं आज शहर युवक काँग्रेसच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांच्या विरुध्दची कारवाई आणि अदानी भ्रष्टाचार संबंधी प्रश्न विचारण्यासाठी पाच हजार पोस्ट कार्ड पाठवण्यात आले आहेत.

//**************//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...