Wednesday, 5 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.04.2023 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 05 April 2023

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग चौदाव्या दिवशी बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघमसह इतर विरोधी पक्षांनी, अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी करत, घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्षांनी शांत राहण्याचं आवाहन करुनही हा गदारोळ सुरुच राहील्यानं, लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेतही आज कामकाज सुरु झाल्यावर, अदानी समुहाच्या मुद्यावरुन विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी, राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. या गदारोळामुळे काही वेळातच सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.

***

दरम्यान, काँग्रेस पक्ष राजकीय हेतुने संसदेच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते. खासदारकी रद्द होणं, हे याआधीही घडलं असून, राहुल गांधी न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस लोकशाहीच्या नावाखाली स्वत:च्या स्वार्थासाठी हा लढा देत असल्याची टीका शिंदे यांनी केली.

***

ज्या वेगाने देशभरात अमृत सरोवर बांधले जात आहेत, ते अमृत काळासाठी केंद्र सरकारच्या संकल्पांमध्ये नवीन ऊर्जा भरणारे असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेसंबंधी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी, मिशन अमृत सरोवरचं कौतुक केलं. ४० हजाराहून अधिक अमृत सरोवर राष्ट्राला समर्पित करण्यात आले असून, यावर्षी १५ ऑगस्ट पर्यंत ५० हजार अमृत सरोवर बांधण्याचं उद्दीष्ट असल्याचं ट्विट शेखावत यांनी केलं होतं.

***

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दुसऱ्या टप्प्याचे पद्म पुरस्कार प्रदान करणार आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या या समारंभात तीन पद्मविभूषण, चार पद्मभूषण आणि ४७ पद्मश्री सन्मान दिले जाणार आहेत.

***

स्टँड अप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. याअंतर्गत आतापर्यंत देशभरातल्या एक लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती श्रेणींमध्ये उद्योजकतेला चालना देणं, हा या योजनेचा उद्देश आहे. देशातल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसंच महिलावर्ग यांच्यातल्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्टँड - अप इंडिया योजना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.

देशातले उद्योजक, त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचं जीवनमान सुधारण्यासाठी स्टँड - अप इंडिया योजना महत्वपूर्ण भुमिका बजावत असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे.

***

केरळ मधल्या कोझिकोडी रेल्वे जळीतकांड प्रकरणीतल्या मुख्य आरोपीला रत्नागिरीतून अटक करण्यात आली आहे. शाहरुख सैफ असं या आरोपीचं नाव असून, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकानं संयुक्त कारवाईत रत्नागिरी रेल्वे स्थानकावर त्याला पकडलं. परवा तीन एप्रिलला दोन प्रवाशांमध्ये आपापसात झालेल्या भांडणात शाहरुख सैफ यानं दुसऱ्या प्रवाशावर थेट पेट्रोल टाकून आग लावली होती, यात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.  

***

नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातल्या मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या अपघातातल्या जखमींवर शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. गेल्या आठवड्यात मुदखेड तालुक्यात मुगट-इंजळी रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकमध्ये झालेल्या या अपघाता पाच जणांचा मृत्यू झाला होता.

****

देशात काल चार हजार ४३५ कोविड बाधित रुग्णांची नोंद झाली, ११ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन हजार ५०८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २३ हजार ९१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

***

हनुमान जयंतीचा उत्सव उद्या साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं भद्रा मारोतीच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या भाविकांच्या सुविधेसाठी छत्रपती संभाजीनगर ते खुलताबाद मार्गावरची वाहतुक आज सायंकाळपासून अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरकडून धुळे, देवगाव रंगारीकडे जाणारी जड वाहनं नगरनाका - एएस क्लब - माळीवाडा- वेरुळ - कसाबखेडा मार्गे जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे.

//**********//

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 12 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...