Sunday, 23 April 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 23.04.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 23 April 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २३ एप्रिल  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना,  राज्य सरकारनं निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं नवीन कृती दल

·      नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन

·      येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध - कृषी आयुक्त सुनील चव्हाण

·      अक्षय्य तृतीया, भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती तसंच रमजान ईदचा सण देशभरात उत्साहात साजरा

·      वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं महावितरणचं आवाहन

·      जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण पदकं

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचा प्रतिस्पर्ध्यांवर विजय


सविस्तर बातम्या

देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान या राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड विषयक देखरेखीबद्दल सावध राहून व्यवस्था अधिक बळकट करावी, चाचणी, उपचार, बाधितांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि मास्कचा वापर याकडे लक्ष देण्याची सूचना भूषण यांनी या पत्रातून केली आहे.

****

सार्वजनिक आरोग्य विभागानं कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी नव्या कृती दलाची स्थापना केली असून निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांची या कृती दलाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर,  डॉक्टर बिशन स्वरुप गर्ग, यांच्यासह ८ जणांची या कृती दलाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

****

राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे संकेत रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल नंदूरबार इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कुठल्याही खात्याचं काम अडून राहिलेलं नाही असंही भुमरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भुमरे यांनी टीका केली. राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं, असं आव्हान भुमरे यांनी दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पक्षात घुसमट होत असून, एक दिवस त्याचा विस्फोट होईल, असंही मंत्री भुमरे यांनी म्हटलं आहे.

****

मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना यंदा आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी निराशा केल्याचं मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपण अविचलपणे जनतेसाठी काम करीत राहू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाणे इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे जिल्हा रुग्णालयात सुपरस्पेशॅलिटी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, मात्र रुग्णांना तातडीने इतरत्र नेण्याची गरज पडल्यास हवाई रुग्णवाहिकेची सोयही उपलब्ध होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर बोलत होते. धर्माचं राजकारण केल्यानं भविष्यात राज्यात दंगली होतील, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले

Byte…

महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का की दंगली घडवायच्या?  असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर याठिकाणी उपस्थित होतो. मला असं वाटतंय की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटीव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटीव्हली बोललं पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही.

****

येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते काल पुणे इथं बोलत होते. मृगाचा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असते, त्या पार्श्वभूमीवर खतांचं नियोजन एप्रिलपासून सुरु करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी माती तपासणी अहवालाप्रमाणे पिकनिहाय खतांचं प्रमाण, त्यांची उपलब्धता आणि त्यासाठीचा खर्च याबाबत माहिती देणारं ‘कृषिक ॲप कृषी विभागानं तयार केल्याची माहिती कृषि आयुक्त चव्हाण यांनी दिली. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालानुसार खतांचा समतोल वापर करावा, अतिरिक्त खत वापरामुळे होणारा अतिरिक्त खर्च, घटणारं पिक उत्पादन अशा समस्यांवर मात करावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं.

****

राज्यात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर ई-पीक पेऱ्यांची नोंद झालेली नाही अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी संबंधित  जिल्हाधिकाऱ्यांनी गावपातळीवर संबंधीत गावचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची समिती गठित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या समितीनं कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहणी करून, याबाबत शंका असल्यास आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करून सत्यता पडताळून शहानिशा करावी आणि  सात - बारा उताऱ्यावर  त्याची नोंद करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमाणित केलेले सात - बारा उतारे कांदा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील. समितीनं आपला अहवाल सात दिवसांत सादर करायचा आहे.

****

उडान अर्थात उडे देश का आम नागरिक' या योजनेच्या पाचव्या टप्प्याला काल सुरुवात झाली. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उडानच्या माध्यमातून देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी हवाई संपर्क सुविधा अधिक वाढवणं आणि अगदी अखेरच्या टोकापर्यंत हवाई संपर्क सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. नजीकच्या भविष्यात एक हजार नवे मार्ग, पन्नास अतिरिक्त विमानतळं, हेलीकॉप्टर स्थानकं आणि पाण्यावरील विमान उड्डाण व्यवस्था कार्यान्वित करण्याचं लक्ष्य साध्य होईल असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य तुरुंग विभागानं नवीन धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार महिला आणि पुरुष कच्चे कैदी तसंच शिक्षा झालेल्या महिला कैदी, त्यांच्या मुलांना, तसच नातवंडं, भाऊ, बहिण यांना भेटू शकणार आहेत. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारावं आणि समान वागणूक द्यावी, या उद्दशानं हे धोरण तयार करण्यात आलं असल्याची माहिती, तुरुंग अतिरिक्त महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली.

****

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी एक चार पाच सहा सात या क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या या नि:शुल्क मदतवाहिनीच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार आदी बाबींची माहिती तसंच मदत देण्यात येते

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी, ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचं विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

****

विविध क्षेत्रातल्या नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पाठ्यवृत्ती अर्थात फेलोशिप उपक्रम राबवणार आहे. राज्याचा पर्यटन विकास साधणं हा याचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपसाठी तरुणांनी १५ मे पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन महामंडळानं केलं आहे. २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतली प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना अर्ज करता येणार आहेत. gm@maharashtra tourism.gov.in आणि dgm@maharashtra tourism.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज करता येतील.

****

साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण , भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसंच ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण काल देशभरात साजरा झाला. उत्तराखंडातल्या प्रसिद्ध चार धाम तीर्थक्षेत्र यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. उत्तराखंडमधील, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम इथल्या मंदिरांचे दरवाजे काल दुपारच्या सुमारास दर्शनासाठी विधीवत उघडण्यात आले. केदारनाथ धाम इथलं मंदिर २५ एप्रिलला आणि बद्रीनाथ धाम इथलं मंदिर २७ एप्रिल रोजी दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. पुढच्या सहा महिन्यांपर्यंत नेहमीप्रमाणे या चारही ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं, ब्राम्हण समाज समन्वय समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रा आणि मिरवणुक काढण्यात आली तर  महात्मा बसवेश्वर जिल्हा महोत्सव समिती आणि अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. लातूर इथं शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.

****

ईद-उल-फित्रच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर हजारो नागरिकांनी मुख्य नमाज पठण केली. खासदार इम्तियाज जलील, यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सणा सुदीच्या पार्श्वभुमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी दिली आहे.

****

जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जालना शहरात मुस्लीम समाजबांधवांनी सकाळी कदीम जालना आणि सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईद ऊल फित्रच्या शुभेच्छा दिल्या.

****

वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. वीज वाहिन्या, रोहित्र, वीज वितरण पेट्या किंवा फीडर फिल्डरच्या जवळ कचरा जाळल्यामुळे किंवा वाढत्या तापमानामुळे कचऱ्याला आग लागल्यामुळे विजेच्या भूमिगत तारा आणि इतर वीज यंत्रणा नादुरुस्त झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या आगींमुळे महावितरणच्या नुकसानीसोबतच ग्राहकांना वीज पुरवठा अनियमित होतो आहे.  अशा घटनातून वीज यंत्रणेला आग लागल्याचं आढळल्यास एक नऊ एक दोन किंवा १८००-२१२-३४३५ या नि:शुल्क क्रमांकावर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

****


बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १२ वसतीगृहं सुरू करण्यात आली आहेत. बीडचे अप्पर जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी ही माहिती दिली, ते काल मानकुरवाडी इथं ऊस तोडणी कामगारांना ओळख पत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. मानकुरवाडी परिसरातील ऊसतोड कामगारांची लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत शंभर टक्के नोंद करण्यात आली आहे. या महामंडळांतर्गत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या शेक्सपिअर महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साहित्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम झाला. आज प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.

****

जागतिक ग्रंथ दिन आज साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठी प्रकाशक पुणे यांच्या वतीनं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी मराठी साहित्याची विद्यमान अवस्था या विषयावर विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे , भाष्य करणार आहेत. प्रकाशन परिषदेचे कार्यवाह अरविंद पाटकर हे ग्रंथव्यवहारासंबंधी विचार मांडणार आहेत.

****

तुर्की इथं झालेल्या प्रथम स्तर जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकं पटकावली आहेत. ज्योती वेन्नम आणि ओजस देवतळे या जोडीनं मिश्र दुहेरीत चिनी तैपेई जोडीचा १५९ विरुद्ध १५४ गुणांनी पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. ज्योतीने महिलांच्या कंपाउंड प्रकारात कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीवर १४९ विरुद्ध १४६ अशी मात करत सुवर्ण पदक पटकावलं.

****


इंडियन प्रीमिअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायन्टसवर ७ धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सनं २० षटकात ६ गडी गमावत १३५ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल लखनऊ सुपर जायन्टस संघ मात्र २० षटकांत सात गड्याच्या बदल्यात केवळ १२८ धावा करू शकला.

या स्पर्धेतल्या अन्य सामन्यात पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्स संघावर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्जनं २१५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करणारा मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत २०१ धावाच करु शकला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...