Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 01 June 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०१ जून
२०२३ दुपारी १.०० वा.
****
मणिपूरमधल्या हिंसाचाराच्या
घटनांच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या
अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार असल्याचं केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आज इंफाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंसाचारात मृत्युमुखी
पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची भरपाई दिली जाणार असल्याची
घोषणाही शहा यांनी यावेळी केली आहे.
***
जम्मू-काश्मीरमध्ये, आज पहाटे सांबा
जिल्ह्यातल्या मंगुचक चौकीजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी
एका संशयित पाकिस्तानी घुसखोराला ठार केलं. सांबा भागातून तो आंतरराष्ट्रीय
सीमा ओलांडत होता.
***
येत्या २१ जून रोजी असलेल्या नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी आपण सज्ज होऊया, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या निमित्त आपण एक अधिक निरोगी
आणि आनंदी समाज निर्माण करूया असं आवाहनही त्यांनी आयुष मंत्रालयाच्या ट्विटला उत्तर
देताना केलं आहे.
***
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्यांची
संख्या आता पाच कोटींच्या पुढे गेली आहे. या रुग्णांच्या देयकांची एकूण रक्कम ६१ हजार
५०१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या
पत्रकात म्हटलं आहे. आयुष्मान कार्डधारकांची संख्या २३ कोटींच्या वर गेली असून, या
योजनेत समाविष्ट असलेली २८ हजार ३५१ रुग्णालयं आणि १२ हजार ८२४ खासगी रुग्णालयं यांच्या
माध्यमातून त्यांना मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत.
***
केरळमधल्या कन्नूर रेल्वे स्थानकावर
आज सकाळी एका एक्सप्रेस रेल्वेच्या डब्यात आग लागली. सर्व प्रवासी
रेल्वेतून उतरल्यानंतर ही घटना घडली, त्यामुळं या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही. दरम्यान, आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी अन्य डबे वेगळे करण्यात आले आहेत.
***
१९
किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जवळपास ८४ रुपयांची
कपात झाली आहे. आत हा सिलेंडर एक हजार ८५६ रुपये ५० पैशांऐवजी एक हजार ७७३ रुपयांना
मिळणार आहे. घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
***
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५० वर्षे होत असून त्यानिमित्त
शासनातर्फे दिमाखदार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. उद्या सकाळी साडेआठ
वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या
सोहळ्याचं उद्धघाटन होईल. रायगड जिल्हा प्रशासनाकडून या समारंभाची जय्यत तयारी करण्यात
आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
पुणे इथं येत्या १२ ते १४ जून दरम्यान जी २० च्या डिजीटल अर्थव्यवस्था कार्यकारी
गटाची बैठक होणार आहे. यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या पुण्याच्या प्रगतीचं
प्रदर्शन करतानाच, महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन परिषदेच्या सदस्यांना घडवावं, अशी सूचना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय
इलेक्ट्रॉनिक कारभार विभागाचे अपर सचिव अभिषेक सिंग यांनी दिली आहे. या बैठकीच्या नियोजनासंबधी
काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
***
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' या संकेतस्थळावर कारवाई करण्याचे निर्देश,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. 'इंडिक
टेल्स'नं प्रसिद्ध केलेल्या लेखाबद्दल अनेक राजकीय संघटना,
सामाजिक संस्थांनी शासनाकडे नोंदवलेल्या आक्षेपांची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी
हे निर्देश दिले आहेत. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार
नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
***
पंढरपूर इथल्या आषाढी वारीसाठी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर
इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उद्या प्रस्थान होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं तीस लाख रुपये मंजूर केले असून, वारीच्या दरम्यान विविध
सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, नाशिकचे जिल्हाधिकारी
गंगाथरन डी. यांनी सांगितलं.
***
स्वच्छ
भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या अजिंठा ग्रामपंचायतीमध्ये
काल घंटागाडीचं लोकापर्ण गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या हस्ते करण्यात आलं.
***
ओमानमध्ये सलालाह इथं सुरु असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज
भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे नऊ वाजता सामन्याला
सुरुवात होईल.
***
नैर्ऋत्य मौसमी पावसाच्या आगमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, येत्या दोन - तीन दिवसांत तो काही अंशी बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या
काही भागात दाखल होण्यासाठी वातावरण अनुकूल झाल्याचं ट्विट भारतीय हवामान विभागाचे
कृष्णानंद होसाळीकर यांनी केलं आहे.
//************//
No comments:
Post a Comment