आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जून २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात
सहा पूर्णांक एक टक्क्यांची
वाढ नोंदवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विकासदर
वाढीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. जागतिक आव्हानांमध्ये ही वाढ भारतीय
अर्थव्यवस्थेचं महत्त्व दर्शवते आणि आपल्या अर्थव्यवस्थेच्या
वाढीचं आणि स्थिरतेचं उदाहरण असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
***
१९
किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत जवळपास
८४ रुपयांची कपात झाली आहे. आता हा सिलेंडर एक हजार ८५६ रुपये ५० पैशांऐवजी एक हजार
७७३ रुपयांना मिळणार आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही
बदल झालेला नाही.
***
आंदोलक कुस्तीपटूंनी तपासाचा निकाल येईपर्यंत धीर धरावा आणि कुठलंही चुकीचं पाऊल
उचलू नये, असं आवाहन, क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आंदोलक कुस्तीपटूंनी
क्रीडाक्षेत्राला नुकसान पोहचेल असं वर्तन करू नये, आणि तपासव्यवस्थेवर विश्वास ठेवावा,
केंद्र सरकार खेळ आणि खेळाडूंच्या बाजूनं असल्याचं ठाकुर म्हणाले.
***
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला कुस्तीपटूंच्या न्याय मागण्यांकडे
लक्ष देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे
केली आहे. 'प्रधानसेवक' या नात्यानं
या विषयाकडं लक्ष द्यावं, असं ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं
आहे.
***
राज्यातल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयंपुर्नविकासासाठी जमिनीची मालकी देण्यासाठीचा, मानीव अभिहस्तांतरण - डिम्ड कन्व्हेन्स प्रक्रिया अर्ज केल्यानंतर, महिन्याभरात याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याबाबत संबंधित यंत्रणाना वेळेत
निर्णय घेणं बंधनकारक असल्याचा आदेश काल राज्य सरकारनं जारी केला आहे.
***
अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव पुरवण्याच्या केंद्र सरकारच्या एडीआयपी
योजनेअंतर्गत, उस्मानाबाद जिल्ह्यात एक
हजार ६९८ लाभार्थ्यांना येत्या सहा जून पासून उपकरणांचं वाटप
करण्यात येणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल ही
माहिती दिली.
//*************//
No comments:
Post a Comment