Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 01 July 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०१ जूलै
२०२३ दुपारी १.०० वा.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघाताच्या स्थळाची पाहणी केली. ते जखमींची देखील रुग्णालयात भेट घेणार
आहेत.
मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री
सहायता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
या अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला असून, घटनेच्या चौकशीचे आदेशही
मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र् मोदी यांनी देखील या अपघाताबद्दल दु:ख
व्यक्त केलं असून, पंतप्रधान सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन
लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
****
दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरच्या
वेग मर्यादेचा मुद्दा उपस्थित होत आहे. याबाबत राज्य सरकारनं गंभीर दखल
घेत त्वरित उपाययोजना कराव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद
पवार यांनी केली आहे. आपण एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून,
अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती आणि अपघात रोखण्याच्यादृष्टीनं तातडीच्या उपाययोजना कराव्यात
असं सुचवलं होतं, असं पवार यांनी
आज ट्विट संदेशात म्हटलं आहे.
समृद्धी महामार्गावर खासगी वाहनांची सुव्यवस्था
आणि वेगमर्यादा यावर सरकारने कठोर नियम करणं गरजेचं असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात देशातली गावं आणि शेतकऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी देशाच्या
सहकार क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. नवी दिल्ली इथं आज १७व्या सहकार काँग्रेसचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
सरकार आणि सहकारी मिळून विकसित भारत, स्वावलंबी
भारताच्या संकल्पाला दुहेरी बळ देतील, असं ते म्हणाले. वर्षानुवर्षे
प्रलंबित असलेले सहकार क्षेत्राचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावले जात असून, आमच्या सरकारने सहकारी बँकाही मजबूत केल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
गेल्या नऊ वर्षात सरकारने शेती आणि सहकार क्षेत्रासाठी केलेल्या उपाययोजनांची त्यांनी
माहिती दिली.
दरम्यान, पंतप्रदान मोदी आज मध्य प्रदेशात राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन अभियानाची सुरुवात करणार आहेत.
****
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै रोजी सुरु होणार
असून, ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ही माहिती
दिली.
****
डॉक्टर दिन आणि सनदी अधिकारी अर्थात सी ए दिन आज साजरे
होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टरांचं योगदान हे केवळ रुग्णांना बरं
करण्याइतकं नसून, ते समाजात विश्वास आणि आशा निर्माण करतात,
असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. तर सीए दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी, सनदी अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा आत्मनिर्भर भारतासाठी खूप महत्वाचा ठरेल,
असं ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
गृहमंत्री अमित शाह यांनी काल १९ राज्य सरकारांना सहा हजार १९४ कोटी रुपयांच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीला मंजुरी दिली आहे. पावसाळ्याच्या
दिवसांमधल्या आपत्ती निवारणाच्या कामात या निधीमुळे राज्यांना मदत होईल, असं
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
बालकांच्या सुरक्षिततेसंबंधी काम करणाऱ्या
घटकांनी, बाललैंगिक
अत्याचार विरोधी कायद्याची माहिती विविध माध्यमांद्वारे जनतेपर्यंत पोहोचवावी, असं आवाहन, विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे
यांनी केलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगानं काल पुण्यात पॉक्सो
कायद्याच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. बालहक्काविषयी जगात होणाऱ्या चांगल्या कामांचं आदानप्रदान करण्यासाठी लवकरच
बैठक होणार आहे; त्यात बाल हक्क आयोगानं आपल्या कामांची माहिती
द्यावी, अशी सूचना गोऱ्हे यांनी केली.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी
संलग्नित महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालय त्यास
जबाबदार राहील, असं कुलगुरु डॉ. प्रमोद
येवले यांनी सांगितलं आहे. पूर्णवेळ प्राचार्य, कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांच्या
कोर्सेसची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात आली असून, काही कोर्सेसची
क्षमता घटवण्याचा निर्णय कुलगुरुंनी घेतला आहे. पदवी प्रवेशासाठी
इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी महाविद्यालयांची मान्यताप्राप्त
संख्या पाहूनच प्रवेश घ्यावा, असं आवाहन
शैक्षणिक विभागानं केलं आहे.
****
सॅफ फुटबॉल स्पर्धेत आज दुसर्या उपान्त्य फेरीत भारताचा
सामना लेबनॉन विरुद्ध होणार आहे. बंगळुरु इथं श्रीकांतिवीरा मैदानात संध्याकाळी साडे
सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर स्पर्धेचा पहिला उपान्त्य फेरीचा सामना दुपारी
साडे तीन वाजता कुवैत आणि बांगलादेश दरम्यान होणार आहे.
//************//
No comments:
Post a Comment