Saturday, 1 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 01.07.2023, रोजीचे सकाळी : 07.10, वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 July 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातांमध्ये ४३ जणांचा मृत्यू

·      राज्य मंत्रिमंडळाचा याच महिन्यात विस्तार होण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे संकेत

·      औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

·      रायगड जिल्ह्यातल्या रातवड इथं चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी; १२५ कोटी रुपये निधी जाहीर

·      ृषीदिनानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      जुलै महिन्यात सरासरीएवढा पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज  

·      भालाफेकपटू नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या लाऊसान डायमंड लीगचं विजेतेपद

आणि

·      आशियायी कबड्डी स्पर्धेत इराणवर मात करत भारत अजिंक्य

****

राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ४३ जणांचा मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या खासगी बसच्या भीषण अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा तालुक्यात पिंपळखुटा इथं हा अपघात झाला. टायर निखळल्यानं धावती बस पलटली, आणि दुभाजकाला धडकून रस्त्यावर घासत गेल्यानं तिने पेट घेतला, त्यात २८ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती, आमच्या बुलडाण्याच्या वार्ताहरानं दिली आहे. बुलडाण्याचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी अपघात स्थळी धाव घेत, मदतकार्याचा आढावा घेतला. अपघातातल्या मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस नागपूरहून पुण्याकडे जात होती.

****

अहमदनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अन्य एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. कोपरगाव तालुक्यातल्या कोकमठाण शिवारात टेम्पोला क्रूझर जीपनं धडक दिल्यानं हा अपघात झाला. यात मंठा तालुक्यातल्या पांगरी गोसावी गावचे संतोष आणि वर्षा राठोड यांच्यासह त्यांच्या १८ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.

****

औरंगाबाद - सोलापूर महामार्गावर कुंथलगिरीजवळ दुचाकीच्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. औरंगाबाद तालुक्यातल्या कुबेर गेवराई इथले विक्रम कुबेर आणि मुरुमखेडा इथले विठ्ठल दाभाडे हे दुचाकीवरुन पंढरपुरला जात असताना, त्यांना अज्ञात वहानाने धडक दिल्यानं हा अपघात झाला.

****

पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अक्कलकोट तालुक्यात अपघात होऊन सहा जण ठार तर सात जण जखमी झाले. भाविकांच्या जीपची मालववाहू ट्रकशी धडक होऊन हा अपघात झाला. मृतांमध्ये पाच महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. अपघातातल्या जखमींना अक्‍कलकोट इथल्या प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात वणी - सापुतारा मार्गावर मोटार कार आणि खासगी प्रवासी जीप यांच्यात समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघाता वणी इथल्या चौघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी हा अपघात झाला.

****

आपलं सरकार हे सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला न्याय देणारं आहे,  गेल्या एका वर्षाच्या काळात शासनानं अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. सातारा जिल्ह्यात १२८ गावातल्या १२२ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचं ई - भूमीपूजन दूरदृष्य प्रणाली द्वारे काल झालं. त्यावेळी ते बोलत होते. सातारा जिल्ह्यातले अनेक रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्य मंत्रिमंडळ विस्तार जुलै महिन्यातच होणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. काल औरंगाबाद विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तार आणि दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट, याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले,

राज्याचे अनेक प्रश्न असतात, त्यासंदर्भात आपल्याला भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो, अनेक वेळा त्यासंदर्भातल्या बैठका देखील असतात. आणि अर्थातच तुमचा आवडता प्रश्न आहे, तर विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे. माननिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबद्दल निर्णय घेतीलच, तर मला असा वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर अंतिम निर्णय घेतील, असं सांगून, मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी तारीख आणि अधिक माहिती सांगायला फडणवीस यांनी नकार दिला. आमदार संजय शिरसाठ यांनी मात्र, आठवडाभरात हा विस्तार होईल असा दावा केला आहे.

****

बीड इथं शिवसंग्राम संघटनेचे नेते दिवंगत विनायक मेटे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मेटे यांच्या स्मृती स्थळावर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक उभारणीचं मेटे यांचं स्वप्न पूर्ण करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद देण्याच्या मागणीचा, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुनरुच्चार केला आहे. ते काल बीड थं पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेची एक जागा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही रिपब्लिकन पक्षानं योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, निवडणुकीत आरक्षणाची रोटेशन पद्धत बंद करण्याची मागणी आठवले यांनी केली आहे.

मेटे यांच्या जयंतीनिमित्त आठवले यांनी त्यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन केलं, मराठा समाजातील गरीबांना आरक्षणाची गरज असून त्यास आपला पाठिंबा असल्याचं आठवले यांनी सांगितलं.

****

हर घर, नल से जलअभियानाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथं, एक हजार कोटी रुपये खर्चाच्या गंगापूर-खुलताबाद पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्या हस्ते झालं, या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत उपमुख्यमंत्र्यांनी, मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कारकीर्दीतल्या महत्त्वाच्या योजना आणि यशाची माहिती दिली. कोविड महामारीमध्ये मोदी सरकारनं त्वरेनं स्वदेशी लस निर्माण करून तिच्या तीन मात्रा तत्परतेनं नागरिकांना नि:शुल्क दिल्यामुळेच, आपल्या देशातून कोविड हद्दपार झाला, असं ते म्हणाले. मोदी सरकारनं महाराष्ट्राला पंचवीस लाख घरं दिली त्यामुळे सव्वा लाख लोकांना हक्काची घरं मिळाली, याशिवाय राज्यातल्या एक्काहत्तर लाख लोकांना आरोग्य सेवा मोदी सरकार पुरवत आहे, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

****

केंद्र शासनानं रायगड जिल्ह्यातल्या रातवड इथं चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला असून, यातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तीनशे तेवीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांच्या खर्चाला राज्य शासनानंही मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून सुमारे पंचवीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

****

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठण्यासाठी रासायनिक उद्योगांची भूमिका महत्वाची असल्यानं, शाश्वत विकासासाठी रासायनिक उद्योजकांनी हरित उद्योग उभारणीचे प्रयत्न करावेत, शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, सं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. मुंबईत ‘शाश्वत भारतासाठी क्रांती’, या विषयावर काल झालेल्या रासायनिक परिषदेत ते बोलत होते. नवीन उद्योगांमुळे आपली हानी होणार नाही, अशी भावना स्थानिकांच्या मनात निर्माण होण्याची गरज असल्यानं उद्योजकांनी प्रदूषण विरहीत उद्योग उभारण्याचे प्रयत्न करावेत, असा आग्रह सामंत यांनी यावेळी केला.

****

शंभर मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असं आवाहन, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ते काल जालना इथं बोलत होते. राज्यात बोगस बियाणं विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत असून, त्यासाठी कृषी विभाग कारवाई करत आहे, असं त्यांनी सांगितलं. राज्यात आजपासून पोलीस, महसूल, कृषी आणि ग्रामविकास हे चारही विभाग मिळून याबाबत कारवाई करणार असून, ज्या ठिकाणी बोगस बियाणं किंवा महागड्या दरात बियाणांची विक्री होईल, त्याठिकाणी या चारही विभागाचे कर्मचारी बसून शासकीय दरात बियाणांची विक्री करतील, अशी माहिती सत्तार यांनी यावेळी दिली.

****

केंद्र शासनानं गरीबांना न्याय दिला असल्याचं रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने नऊ वर्षे पूर्ण केल्यानिमित्तानं ते काल नाशिक इथं बोलत होते. २०१४ मध्ये खऱ्या अर्थाने गरीबांचं सरकार आलं, कोविड काळात हे खऱ्या अर्थाने जाणवल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्र सरकारने लोकांसाठी राबवलेल्या योजनांचा दानवे यांनी आढावा घेतला. राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अन्य भाजपाचे स्थानिक आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. लोढा यांनी यावेळी केंद्रशासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.

****

राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या आठवड्यात महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पाच जुलै रोजी गडचिरोलीतल्या गोंडवना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी होणार आहेत. त्यानंतर त्या नागपूरला भेट देणार असून, सहा जुलै रोजी राष्ट्रपती मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

****

शिक्षण ही केवळ शिकवण्याची नाही तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल दिल्ली विद्यापीठाच्या शताब्दी समारंभाच्या सांगता कार्यक्रमात बोलत होते. इतकी वर्षं विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, यावर शैक्षणिक धोरण केंद्रित असायचं, पण आता विद्यार्थी काय शिकू इच्छित आहेत, याकडे आम्ही लक्ष वळवलं असून, केंद्र सरकारनं लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार विषयांची निवड करू शकतील, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी दिल्ली मेट्रोनं प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

****

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल, आज त्यांची जयंती राज्यात आज कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे आज कृषि दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असलेल्या या कार्यक्रमात, शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी कृषी शास्त्रज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानं होणार असून, कीटकनाशक फवारणी करताना वापरायच्या सुरक्षा किट्सचं वाटपही करण्यात येणार आहे.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही कृषीदिनानिमित्त आज एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रख्यात कृषीतज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांचं यावेळी व्याख्यान होणार आहे. दोन्ही अध्यासन केंद्रांच्या वतीनं कृषितंत्रज्ञान सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात येणार आहे.

****

जून महिन्यात देशभरात सरासरीच्या तुलनेत दहा टक्के कमी पाऊस झाला. जूनमध्ये राज्यात सरासरी १६३ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदाच्या वर्षी केवळ १४८ मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यात सरासरीपेक्षा ६९ टक्के कमी पाऊस झाला. तर विदर्भ आणि उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात सुमारे सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस झाला. कोकणात सरासरी पेक्षा २८ टक्के कमी पाऊस पडला.

जुलै महिन्यात सरासरीच्या आसपास पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

****

भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं स्वित्झर्लंडमध्ये झालेली लाऊसान डायमंड लीग स्पर्धा जिंकली आहे. थोड्या वेळापूर्वीच झालेल्या या स्पर्धेत त्यानं ८७ पूर्णांक ६६ मीटर अंतरावर भाला फेकत ही कामगिरी केली. या स्पर्धेत जर्मनीचा भालाफेकपटू दुसऱ्या तर झेक प्रजासत्ताकचा भालाफेकपटू तिसऱ्या स्थानावर राहीला.

यापूर्वी दोहामध्ये मे महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये देखील नीरजनं विजय मिळवला होता.

****

आशियायी कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं भारतानं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम फेरीत भारतानं इराणच्या संघाचा ४२ - ७२ पराभव करत हा किताब जिंकला. आतापर्यंत नऊ वेळा झालेल्या या स्पर्धेत भारतानं आठ वेळा अजिंक्यपद मिळवलं आहे.

****

चीनमधल्या हांगझाउ इथं आशियाई स्क्वॅश मिश्र दुहेरी स्पर्धेत काल भारताला दोन पदकं मिळाली. दीपिका पल्लिकल आणि हरिंदर पाल संधू या भारतीय जोडीनं सुवर्णपदक पटकावलं. या तिसऱ्या मानांकित जोडीनं दुसऱ्या मानांकित मलेशियाच्या जोडीचा दोन - शून्य असा पराभव केला. तर अनाहत सिंग आणि अभय सिंग या भारतीय जोडीनं कांस्य पदकाची कमाई केली. सप्टेंबरमधे याच ठिकाणी होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीची ही चाचणी स्पर्धा होती.

****

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत यायचं असेल तर त्यांनी आपल्या जीवनात सकारात्मकता अंगी बाणवावी, असं प्रतिपादन, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालया, ‘प्रशासकीय सेवेत जाण्याचा पत्रकारिताएक राजमार्ग’, या विषयावरच्या कार्यशाळेत त्या बोलत होत्या. प्रशासनात काम करत असताना जागोजागी पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा होतो, असं त्या म्हणाल्या. लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी यावेळी बोलताना, पत्रकारितेच्या अभ्यासाचा फायदा नागरी सेवांच्या परीक्षेसाठी होतो, असं सांगत, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं आपण लष्करी सेवेमध्ये सहभागी व्हावं, असं आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी केलं.

****

संत वाङ्गमय आणि बहुभाषा अभ्यासक मनीषा बाठे यांनी लिहिलेलं समर्थ रामदासांचं चरित्र, साहित्य अकादमीकडून,''भारतीय साहित्याचे निर्माते'', या मालिकेत प्रकाशित करण्यात आलं आहे. या मालिकेतली पुस्तकं मूळ भाषेसह अन्य वीस भाषांमध्ये अनुवादित होऊन प्रकाशित केली जात असल्यानं, आता समर्थ रामदासांचं हे चरित्रही वीस भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.

****

मराठवाड्यातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेत पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी चालवण्याचा निर्णय, दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे. यानुसार ही विशेष गाडी परवा तीन जुलैपासून दर सोमवारी सकाळी पूर्णा स्थानकावरून निघून, मंगळवारी सकाळी पावणे अकराला तिरुपतीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी येत्या चार जुलैपासून दर मंगळवारी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी तिरुपतीहून निघेल, आणि बुधवारी दुपारी अडीच वाजता पूर्णेला पोहचेल, दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं ही माहिती दिली.

****

नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पिकाच्या वाढीच्या अवस्थेत युरिया खताचा अतिवापर टाळून पर्यायी नॅनो युरिया खताचा वापर करावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

No comments: