Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 July
2023
Time 7.10 AM
to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
०२ जुलै २०२३ सकाळी ७.१० मि.
****
·
समृद्धी महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करून उपाययोजना करण्याची
मुख्यमंत्र्यांची घोषणा
·
सिंदखेडराजा बस अपघातातल्या मृतांच्या कुटूंबांना मुख्यमंत्र्यांकडून
पाच लाख तर पंतप्रधानांकडून दोन लाख रुपये मदत जाहीर
·
निराधार अनुदान योजनेच्या ज्येष्ठ लाभार्थ्यांना आता पाच वर्षांतून एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार
·
संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै पासून सुरु
होणार
·
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून सर्वत्र
साजरी
आणि
·
सॅफ फुटबॉल स्पर्धेत लेबनॉनचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत भारत अंतिम फेरीत
दाखल
****
समृद्धी महामार्गावरचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी
तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल, तसंच त्यांच्या
सूचनेनुसार उपाययोजना करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या महामार्गावर शुक्रवारी
मध्यरात्री सिंदखेडराजा जवळ, खाजगी प्रवासी
वाहतूक करणाऱ्या बसने अपघातानंतर पेट घेतला, या दुर्घटनेत सव्वीस जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काल
अपघातस्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली, तसंच रुग्णालयात
जाऊन जखमींची विचारपूस केली, त्यानंतर ही घोषणा केली.
समृद्धी महामार्गावरील अपघात अतिवेग आणि वाहनचालकांना
झोपेची डुलकी अशा मानवी कारणांमुळे घडतात, असे अपघात घडू नये यासाठी ज्या ज्या
उपायोजना करणं गरजेचं आहे, त्या शासन स्तरावरून
गांभीर्यपूर्वक आणि प्राधान्यानं करण्यात येतील असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
समृद्धी महामार्गावर येणारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा
कार्यान्वित असून महामार्गावर प्रवेशापूर्वी वाहनांची तपासणी
केली जात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
या अपघाताबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती
जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी,
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते आणि महामार्ग
मंत्री नितीन गडकरी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीमधून पाच लाख रुपये मदत
जाहीर केली आहे. राज्यपाल रमेश बैस, विधान सभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार
यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न
सुरू असून, अपघातासंदर्भात अधिक चौकशी सुरू आहे. या
अपघातातून बचावलेले बसचालक आणि सहचालक
यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, अपघात प्रकरणी चालकाविरुद्ध सदोष मनुष्य
वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस दुभाजकाला धडकून उलटताच चालक
आणि सहचालक दोघेही बसच्या काचा फोडून पळाल्याचं या अपघातात
बचावलेल्या प्रवाशांनी सांगितलं.
****
दरम्यान, या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरच्या वेग मर्यादेचा
मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित
उपाययोजना कराव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात
एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी काल ते बोलत होते.
महामार्गांवरील वाढते अपघात टाळण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती तयार करून संपूर्ण
रस्त्याची पुन्हा पाहणी करावी तसंच, अपघाताची कारणं शोधून
काढावी, अशी सूचना पवार यांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी, शिंदे
फडणवीस सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी
मागणी केली आहे. या महामार्गावर सुरक्षेच्यादृष्टीनं उपाय योजना करून त्रुटी दूर
करणं गरजेचं असल्याचं मत पटोले यांनी व्यक्त केलं. रस्ता संमोहनामुळे
अपघात होत असल्याच्या तज्ज्ञांच्या मताचा विचार करून योग्य त्या उपाययोजना
करण्याची गरजही पटोले यांनी व्यक्त केली आहे.
****
पुण्यात झालेल्या कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तीन
युवकांना मुख्यमंत्र्यांच्या वतीनं पंधरा लाख रुपयांची बक्षीसं देण्यात आली. पीडित तरुणीलाही पाच लाख रूपये तर तिला मदत करणाऱ्या तिच्या मित्राला पंचवीस हजार रूपये
देण्यात आले, तरुणीच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या
वतीनं केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
****
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं काल मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात
आला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात मुंबई महापालिकेतल्या
कथित घोटाळ्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. मुंबई महापालिकेप्रमाणे ठाणे, नाशिक
आणि पुणे महापालिकेतही विशेष तपास पथक-एसआयटीमार्फत चौकशीचं आव्हान ठाकरे यांनी दिलं.
दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. कनाल यांच्यासह
अनेक कार्यकर्ते ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झाले. दरम्यान, कोविड सेंटरच्या नावाखाली
करण्यात आलेल्या गैरव्यवहारांची ईडी कडून चौकशी सुरु झाल्याने, जनतेची दिशाभूल करण्यासाठी
मोर्चा काढल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.
****
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन
योजनेतील ५० वर्षांवरील लाभार्थ्यांकडून आता पाच वर्षांतून एकदाच उत्पन्नाचा दाखला
द्यावा लागणार आहे. याबाबतचा शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला. दरवर्षी
आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला घेण्यात येत
होता. मात्र, पन्नास वर्षावरील ज्येष्ठ तसंच वृद्ध नागरिकांना येणाऱ्या अडचणी
लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
****
जून महिन्यात
देशभरात जीएसटी - वस्तू आणि सेवा कर संकलन
एक लाख ६१ हजार ४९७ कोटी रुपये इतकं झालं आहे. महाराष्ट्रात या महिन्यात २६ हजार ९८ कोटी
रुपये जीएसटी संकलन झालं, हे संकलन गेल्या वर्षीच्या जून
महिन्यातील संकलनाच्या तुलनेत १७ टक्के
अधिक असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या
अंमलबजावणीचा सहावा वर्धापन दिन काल मुंबईत
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत साजरा झाला. या महिन्यात गेल्या वर्षींपेक्षा १२ टक्क्यांनी अधिक म्हणजेच एक लाख ६१ हजार
४९७ कोटी रूपये इतक्या रकमेचं कर संकलन झालं असून एक कोटी पन्नास लाख व्यवसायिकांनी
नोंदणी केली असल्याचं बैस यांनी सांगितलं.
****
संसदेचं
पावसाळी अधिवेशन येत्या २० जुलै पासून सुरु होणार असून, ते ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल ही माहिती दिली. २३ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात
एकूण १७ बैठका होणार आहेत. यादरम्यान
सर्व पक्षांनी कामकाजात सहभागी होण्याचं आवाहन प्रल्हाद जोशी
यांनी केलं आहे. नवीन संसद भवनात होणारं हे पहिलं अधिवेशन असेल.
****
प्रसिद्ध अमरनाथ यात्रेला काल सकाळी काश्मीरमधल्या
बालताल आणि नुनवान इथून प्रारंभ झाला. यात्रामार्गावर अनेक ठिकाणी
यात्रेकरुंच्या निवास, भोजन तसंच सुरक्षेची
व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत
राहण्याकरता जम्मू-काश्मीर प्रशासनानं वाहतूक नियमावली जारी केली आहे.
****
राज्य आपत्ती
प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासह १९ राज्य सरकारांना ६ हजार १९४ कोटी ४० लाख
रुपये देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंजुरी दिली आहे.
हा निधी वितरित केल्यामुळे, राज्यांना चालू पावसाळी हंगामात विविध उपाययोजना करण्यास मदत होईल. केंद्र सरकारनं पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या आधारे
वर्ष २०२१ ते २०२५ या कालावधीसाठीच्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीसाठी एक लाख २८ हजार १२२ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
****
राज्याच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी मुख्यमंत्री
वसंतराव नाईक यांची जयंती काल कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांना
अभिवादन केलं असून, शेतकऱ्यांना कृषी
दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.
नीलम गोऱ्हे यांनी विधान भवन परिसरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. नवी
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त राजेश आडपावार यांनी वसंतराव नाईक
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
****
शेतीचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी
गावातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शक म्हणून सेवा प्रदान कराव्या असं आवाहन महाराष्ट्र राज्य वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्राध्यापक
जयसिंग जाधव यांनी केलं आहे. अकोला इथं
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात वसंतराव
नाईक यांच्या एकशे दहाव्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून काल ते बोलत होते. राज्यातील कृषी विद्यापीठांनी वसंतराव नाईक यांच्या कृषी शिक्षण, संशोधन
आणि विस्तार कार्याच्या चतु:सूत्रीचा वापर केला असल्याचं मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.
शरद गडाख यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
महाराष्ट्राच्या
मातीला सुजलाम-सुफलाम करण्यासाठी कृषी शिक्षण आणि तंत्रज्ञानाची जोड देण्याची
दूरदृष्टी वसंतराव नाईक यांच्याकडे होती, असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.अशोक
ढवण यांनी केलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जयंती तथा कृषी दिनानिमित्त काल
झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. नाईक यांचा कार्यकाळ संपून चार
दशकं झाली, तरी त्यांचा प्रभाव अद्यापही कायम असल्याचं
डॉ ढवण म्हणाले. विविध स्पर्धांचं पारितोषिक वितरण यावेळी डॉ. ढवण आणि कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
औरंगाबाद इथं पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात
हिंदी विभागाच्या वतीनं काल वसंतराव नाईक यांच्या
जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला.
****
सर्वच शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीच्या
शेती औजारं आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून जास्तीत जास्त उत्पादन वाढवावं असं आवाहन
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी काल कृषीदिनानिमित्त
झालेल्या कार्यक्रमात केलं. आपल्या परिसरात पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे पाण्याचं
योग्य ते नियोजन करून ठिबक आणि तुषार सिंचन यांचा वापर करावा. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करून पेरणी करुन उत्पादन
घेतल्यास रोगराई आणि किडींचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात होईल असं त्यांनी यावेळी
सांगितलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेत काल कृषी विभाग,
जिल्हा परिषद, प्रकल्प संचालक आणि पंचायत
समिती यांच्या संयुक्त विद्यमानं कृषीदिन साजरा करण्यात आला.
विद्यापीठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद पांडागळे यांनी खरीप पीक
लागवडबाबत यावेळी मार्गदर्शन केलं. जिल्हा परिषदेमार्फत दोन आत्महत्याग्रस्त
शेतकऱ्यांच्या वारसांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्येकी दहा हजार रुपयांच्या
धनादेशाचं वाटप यावेळी करण्यात आलं.
****
केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी
तसंच सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या प्रगतीसाठी कल्याणकारी योजना
राबवत आहेत. या योजनांचा लाभ घरा-घरापर्यंत पोहोचवावा, असं आवाहन भारतीय जनता पक्षाचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केलं आहे. भाजपच्या महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत
ते काल जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी इथं जाहीर सभेत बोलत होते. जाती-धर्माचं राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनतेनं
आगामी निवडणुकीत हद्दपार करावं असं आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केलं. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री
रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते.
****
शासनाच्या
सर्व योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी योजनांची प्रभावीपणे
अंमलबजावणी करावी अशा सूचना राज्याचे महसुल, पशुसंवर्धन,
दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. काल झालेल्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते
बोलत होते. जलजीवन मिशन योजनेसाठी जिल्ह्याला चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर
झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सॅफ फुटबॉल स्पर्धेत भारतानं
काल लेबनॉनचा उपान्त्य फेरीच्या लढतीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. कालच्या
या सामन्यात भारतानं लेबनॉनला पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-२ अशा फरकानं पराभूत केलं. गुरप्रीतसिंग
संधूच्या प्रभावी गोलरक्षणामुळे हा सामना भारतानं जिंकला. जागतिक क्रमवारीत भारत शंभराव्या
तर लेबनॉन एकशे दोनाव्या क्रमांकावर आहे. आता भारताची अंतिम लढत कुवेतविरुद्ध होईल.
****
औरंगाबाद शहरातल्या नवाबपूरा
भागातून गुन्हे शाखेचं पथक आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांनी काल छापा टाकून अकरा लाख
रूपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला.
उस्मानाबाद पोलिसांनी कर्नाटकातून बीडकडे जाणाऱ्या
एका टॅम्पोमधून ४१ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला काल जप्त केला आहे.
****
नंदुरबार जिल्हा स्थापनेला काल २५ वर्ष पूर्ण झाले. या रौप्य महोत्सवानिमित्तानं वनविभागाच्या २५ हजार झाडं लावण्याच्या मोहिमेचा नवापूर तालुक्यातील
खांडबारा गावालगत पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला. गावित यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रितिनिधी तसंच प्रमुख प्रशासकीय अधिकारी यावेळी
उपस्थित होते.
****
वृक्ष लागवड
करून त्याचं संवर्धन करणं तसंच प्रदूषण दूर करून पर्यावरणाचे जतन करणं ही काळाची
गरज असल्याचं नांदेड-वाघाळा महापालिकेचे उपायुक्त निलेश सुंकेवार यांनी म्हटलं
आहे. कृषि दिन आणि डॉक्टर डे निमित्त आयोजित कार्यक्रमात काल ते बोलत होते.
यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं.
****
औरंगाबाद इथं
सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविदयालयात आज शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं
आहे.
****
No comments:
Post a Comment