Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 24 July 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २४ जूलै
२०२३ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे
दोन्ही सदनांचं कामकाज आज सलग तिसर्या दिवशी बाधित झालं.
लोकसभेत आज कामकाज सुरु होताच काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, संयुक्त जनता दल आणि भारत राष्ट्र समितीच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी
करण्यास सुरुवात केली. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधानांनी सभागृहात निवेदन देण्याची
मागणी हे सदस्य करत होते. गोंधळ सुरुच राहील्यानं लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित
झालं होतं. कामकाज पुन्हा सुरु झाल्यावर सदनात राष्ट्रीय दंत चिकित्सा आयोग विधेयक
सादर करण्यात आलं, मात्र तरीही गदारोळ सुरुच राहील्यानं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित
झालं.
राज्यसभेतही याच मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज सुरवातीला
१२ वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
दरम्यान, मणिपूर मुद्याचा वापर करुन विरोधक कामकाजापासून पळ काढत असल्याची टीका संसदीय
कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत
होते. मणिपूर हिंसाचारावर सरकार चर्चेसाठी तयार असून, विरोधी पक्षांनी यात शांततेत सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
राज्यात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या क्षेत्रात तातडीची मदत द्यावी, अशी सामूहिक
मागणी विरोधकांनी आज विधानसभेत केली. कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराचा तास बाजुला
ठेऊन पाऊस आणि शेतकर्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यात सध्या
सुरु अललेला पाऊस आणि बाधित नागरीक आणि शेतकर्यांना मदत, याविषयी
सरकारनं निवेदन देण्याची मागणी या नेत्यांनी केली. या वर्षीच्या सुरवातीला झालेल्या अवकाळी पावसाचीच
अद्याप शेतकर्यांना मदत मिळाली नसल्याचं, काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट मदत करण्याची
मागणी त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे विदर्भात झालेल्या नुकसानीचा मुद्दा अनिल देशमुख
आणि बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.
अतिवृष्टी झालेल्या भागात नागरीकांना मदत पोहोचवण्यात येत आहे. धान्य, राहण्याची
व्यवस्था, जेवण, आणि आर्थिक मदत तत्काळ देण्यात येत असून, सरकार लक्ष ठेऊन असल्याचं, मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितलं.
सरकारला परिस्थितीचं पूर्ण गांभीर्य असून, ताबडतोब मदत देण्यात येत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
आजचं कामकाज संपण्याच्या आत सरकारकडून विस्तृतपणे निवेदन दिलं जाईल, असं ते
म्हणाले.
****
विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. कामगारांसाठी असलेल्या
माध्यान्ह भोजन आणि घरासंदर्भातल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, चौकशी
करण्याची मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. कामगारांची नोंदणी करत असताना
विशिष्ट मतदार संघांमध्येच होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात चौकशीचे आदेश
देऊन अधिकार्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिलं.
****
आमदारांना समान निधी वाटप होत नसल्याचा आरोप विधान परिषदेत विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी केला. सगळ्या आमदारांना समान निधी देण्यासंदर्भात सरकारनं धोरण
आखावा, असं ते म्हणाले.
****
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, ते ८८
वर्षांचे होते. शंभराहून अधिक मराठी नाटकांत त्यांनी अजरामर भूमिका केल्या होत्या, तसंच
३० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांत देखील त्यांनी काम केलं होतं. ९७ व्या अखिल भारतीय
मराठी नाट्य संमेलनाचे ते अद्यक्ष होते. अपराध मीच केला, अपूर्णांक, अलीबाबा
चाळीस चोर, अल्लादीन जादूचा दिवा, अवध्य, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात सावरकर यांनी काम केलं.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात २४ ते ३० जुलै दरम्यान देखभाल दुरुस्तीचं
काम करण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द, काही
अंशत: रद्द तर काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या
गाड्यांमध्ये, काचीगुडा - निझामाबाद विशेष रेल्वे, आणि नांदेड - निजामाबाद विशेष रेल्वे
या दोन अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. तर दौंड - निजामाबाद आणि निजामाबाद - पंढरपूर
रेल्वे तीस जुलैपर्यंत निजामाबाद - मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
****
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ८२ बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा
नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.
दरम्यान, मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात पडलेली दरड हटवण्यासाठी हा मार्ग
दोन तास बंद ठेवण्यात आला आहे. मुंबईकडे जाणार्या तिनही मार्गिका दुपारी दोन वजोपर्यंत
बंद असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment