Monday, 24 July 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 24.07.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 24 July 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २४ जूलै  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमधल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करुन प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

·      नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात धोरणात्मक निर्णय-ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

·      नभोवाणीच्या विस्तारासाठी २८४ शहरात ८०८ वाहिन्यांचा लिलाव करण्याचा केंद्राचा निर्णय

·      राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये आजपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह

आणि

·      फिनलंड टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमीत नागलला विजेतेपद तर कोरिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारतीय जोडी अजिंक्य

 

सविस्तर बातम्या 

अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांमधल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल मुख्य सचिव, मदत आणि पुनर्वसन विभाग तसंच अतिवृष्टी झालेल्या क्षेत्रातले विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर, जळगाव जामोद तसंच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांतली पिकं पाण्याखाली गेली आहेत. अतिवृष्टीग्रस्त भागातल्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यावेळी दिले. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. अशा स्थानिक ग्रामस्थांच्या घरांच्या नुकसानीचेही पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

****

विदर्भात झालेल्या पावसामुळे काल विविध ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. यवतमाळ आणि लगतच्या जिल्ह्यात मोठया प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे, अप्पर वर्धा आणि गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यानं, वर्धा नदीला काल पूर आला. या नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं चंद्रपूर - तेलांगणाला जोडणाऱ्या राज्य मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरपना तालुक्यातल्या कोडशी इथले जिल्हा परिषद शाळा शिक्षक अजय विधाते पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

अकोला शहराच्या मध्यवर्ती भागातला किराणा आणि धान्याचा घाऊक बाजार, राष्ट्रीय महामार्गावर स्थलांतरीत करण्यात आला आहे. या बाजारातल्या सुमारे दीडशे दुकानांत पावसाचं पाणी शिरुन, मोठं नुकसान झाल्याचा अंदाज व्यापारी आणि प्रशासनानं वर्तवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही पावसामुळे सहा राज्यमार्ग तर १६ जिल्हामार्ग बंद करण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी विधीमंडळाच्या चालू अधिवेशनात लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यात बिलोली, देगलूर, मुखेड या भागात अतिवृष्टी झालेल्या विविध गावांना महाजन यांनी काल भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर ते बोलत होते. दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे रस्ते बंद होऊन संपर्क तुटणाऱ्या गावांची यादी करुन त्याठिकाणी नवीन पुलाच्या कामाबाबत प्राधान्याने विचार करण्याचं आश्वासन महाजन यांनी दिलं. त्यांचाहस्ते पूरग्रस्तांना प्रातिनिधीक स्वरुपात मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले.

****

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातल्या संगम, वाघबेटसह परिसरातल्या बांधांवर जाऊन गोगलगायींचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांची पाहणी केली. जिल्ह्यातल्या काही भागात सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला आहे. उत्पादनाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात येतील, असं मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

****

रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी इथलं शोधकार्य थांबवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची दुर्घटना घडून काल चार दिवस झाले. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त भागात बघ्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. या ठिकाणी बचाव पथकाखेरीज इतरांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मदतकार्यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले..

Byte…

एकूण ४३ कुटुंब होते, ४३ कुटुंबाव्यतरिक्त दोन कुटुंब जे आहेत, ते पूर्णत: उध्वस्त झालेली आहेत. ५७ लोकसंख्या जी आहे ती बेपत्ता आहे. आणि १४४ लोकं जे सध्या एका मंदीरामध्ये आपण सुरक्षित ठेवलेले आहेत, त्यांना आपण सगळ्या सुविधा निर्माण करुन देणार आहोत. आणि स्वत: मुख्यमंत्री महोदयांनी सिडकोशी चर्चा करुन हे जे पुनर्वसन कराचं आहे, त्यांना जे घरं बांधून द्यायची आहेत, ती सिडको बांधून देणार आहे, असा देखील निर्णय घेण्यात आला आहे.

 

दुर्घटनेतून १४४ स्थानिक लोक सुखरुप राहिले आहेत, यामध्ये २२ मुलं निराधार झाली असल्याचं समोर आलं आहे.

****

देशात नभोवाणीचा विस्तार व्हावा, याकरता केंद्र सरकार २८४ शहरात ८०८ नभोवाणी वाहिन्यांचा लिलाव करणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी, काल राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त नवी दिल्ली इथं, प्रादेशिक कम्युनिटी रेडियो संमेलनाच्या उद्घाटन सत्रात, ही माहिती दिली. लोकसहभाग आणि लोकचळवळीत कम्युनिटी रेडियो वाहिन्या महत्त्वाची भूमिका बजावतात, असं ते म्हणाले. गेल्या नऊ वर्षात देशभरात नवीन ४४८ कम्युनिटी रेडियो केंद्र स्थापन झाल्याबद्दल, त्यांनी समाधन व्यक्त केलं. या माध्यमात व्यवसाय सुलभता असावी यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. रेडिओ लहरी ही जनतेची मालमत्ता असून, जनतेच्या उत्थानासाठी तिचा वापर झाला पाहिजे, असं ते म्हणाले. राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ पुरस्कारांचं वितरणही ठाकूर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.

****

दरम्यान, दुसऱ्या फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या राज्य फेरीतल्या विजेत्यांचा, काल अनुराग ठाकूर यांच्या हस्ते मुंबईत सत्कार करण्यात आला. या स्पर्धेतल्या विजेत्या शाळा आणि विद्यार्थ्यांना मिळून सव्वा तीन कोटी रुपयांची बक्षिसं देण्यात येणार असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं. शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त फिटनेससाठी विविध उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत देशभरातून ७०२ जिल्ह्यातल्या १६ हजार ७०२ शाळांमधले ६१ हजार ९८१ विद्यार्थी सहभागी झाले होते.

****

राज्यातल्या सर्व प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांमध्ये, चांगल्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी शासन स्तरावर नियोजन करण्यात येत असून, यासाठी आवश्यक निधी लवकरच उभा केला जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री, हसन मुश्रीफ यांनी काल कोल्हापूर इथं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या पाहणीनंतर ही माहिती दिली. यासाठी बँकांकडून कर्ज स्वरुपात मोठ्या प्रमाणात निधी घेऊन उच्च दर्जाच्या सुविधा उभारण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.

****

चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्या सोमनाथ देवस्थान इथं, सोमनाथ सफारी पर्यटन गेटचं उद्घाटन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं. पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटन करता येणार असून, इथं तरुणांना रोजगारही मिळणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. राज्यात हॅलो फॉरेस्ट, अर्थात एक- नऊ-दोन-सहा या वन विभागाच्या मदत वाहिनी दूरध्वनी क्रमांकावर, अवैध वृक्षतोड, अवैध शिकार तसंच कामचुकार वन कर्मचाऱ्यांची तक्रार दाखल करता येते, याबाबत त्यांनी माहिती दिली.

****

भारतीय शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल करणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला, २९ जुलैला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगानं राज्यातल्या सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये, आजपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयं तसंच स्वायत्त महाविद्यालयातही, २९ जुलै पर्यंत, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात येणार असल्याची माहिती, विद्यापीठाच्या जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे. यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शनपर व्याख्यानं, विविध स्पर्धा, कार्यशाळा, प्रदर्शनं आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

****

औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं जुन्या आणि विस्तारीत शहराचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी कार्यालयात विभागप्रमुखांची बैठक काल घेण्यात आली, यावेळी श्रीकांत यांनी विकास आराखड्याच्या कामाचा आढावा घेतला. नागरिकांना सोयी, सुविधा पुरवण्याच्या अनुषंगानं विविध योजना राबवण्यासाठी लागणाऱ्या जागा आरक्षित करण्याच्या दृष्टीनं, डीपी युनिटप्रमुख यांच्याकडे विभागप्रमुखांनी तातडीनं प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

****

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्याचं नियोजन करण्यात येत असून, या अनुषंगानं कार्यक्रमांची रुपरेषा ठरवण्यासाठी, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल उस्मानाबाद इथं, मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव समिती सदस्य आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांच्यात बैठक झाली. यानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. बोरी नदीच्या किनाऱ्यावर किल्ल्यालगत स्मारक उभारण्याचं प्रस्तावित करण्यात आलं, तसंच ज्या १२ गावांमध्ये स्मारके आहेत, त्या ठिकाणी चित्र प्रदर्शन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. निजाम राजवटीतली काही गावं सोलापूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. अशा ५२ गावामध्ये देखील मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं, या बैठकीत सांगण्यात आलं.

****

मणिपूरमध्ये घडलेली घटना ही आपल्या देशासाठी कलंक आहे. सरकारने या घटनेतल्या आरोपींना कठोर शासन करावं, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केली आहे. राज्यातल्या राजकीय परिस्थितीवरही हजारे यांनी काल भाष्य केलं. भ्रष्ट लोकांना आपल्या सोबत घेत आहात, हे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी भारतीय जनता पक्षावर केली.

****

दरम्यान, मणीपूर घटनेच्या निषेधार्थ उस्मानाबाद इथं काल सकाळी मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसंच पत्रकार या आंदोलनात सहभागी झाले होते.

****

भारतीय टेनिसपटू सुमीत नागल यानं, फिनलंड एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम लढतीत सुमीतनं झेक रिपब्लिकच्या डॅलिबोर स्वर्सिना याला सहा-चार, सात-पाच अशा सरळ सेटमध्ये नमवत हे यश संपादन केलं.

****

कोरिया खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम लढतीत भारतीय जोडीनं इंडोनेशियायी जोडीचा १७-२१, २१-१३, २१-१४ असा पराभव केला. पहिला गेम गमावल्यावर भारतीय जोडीनं तडाखेबंद खेळ करत, पुढचे दोन्ही गेम जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. सात्विक आणि चिराग जोडीचं या वर्षातलं हे चौथं विजेतेपद आहे. चालू वर्षात त्यांनी याआधी स्विस खुली स्पर्धा, इंडोनेशिया खुली स्पर्धा तसंच आशियायी बॅटमिंटन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे.

****

झेक प्रजासत्ताक मधल्या पिलसेन इथं सुरू असलेल्या जागतिक दिव्यांग धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत, भारतीय संघानं एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य, अशी एकूण तीन पदकं पटकावली आहे. या कामगिरीमुळे पुढील वर्षी पॅरिस इथं होणाऱ्या दिव्यांग ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीसाठी, सहा भारतीय तिरंदाज पात्र ठरले आहे.

****

त्रिनिदाद इथं सुरु असलेला दुसरा कसोटी क्रिकेट सामना जिंकण्यासाठी भारताला आज पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजचे आठ गडी बाद करणं आवश्यक आहे, तर वेस्ट इंडिजला २८९ धावांची आवश्यकता आहे. सामन्याच्या कालच्या चौथ्या दिवस अखेर वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात दोन बाद ७६ धावा झाल्या. तत्पूर्वी भारतानं काल दुसरा डाव दोन बाद १८१ धावांवर घोषित केला.

त्याआधी मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव २५५ धावांवर संपुष्टात आला. सिराजनं पाच बळी घेतले. 

****

ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना ३५वा पुण्यभूषण पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. पुण्यात झालेल्या या समारंभात ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर आणि प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं. सोन्याच्या नांगरानं भूमी नांगरणारे बाल शिवाजी यांचं शिल्प असणारं पुण्यभूषण सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

औरंगाबाद इथल्या श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कारासाठी, सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातले जीवन संभाजीराव इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. देशपांडे यांच्या स्मरणार्थ 'संडे क्लब' आणि देशपांडे परिवारातर्फे हा पुरस्कार दिला जातो. अकरा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १३ ऑगस्टला औरंगाबाद इथं पुरस्कार वितरण होणार आहे. इंगळे हे गेल्या १३ वर्षांपासून सायकलवर फिरतं ग्रंथालय चालवून वाचन चळवळ रुजवण्यासाठी मोलाचं योगदान देत आहेत.

****

डॉ़. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या मियावाकी घनवन प्रकल्पाचं उद्घाटन, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते काल झालं. विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि 'कलेक्टिव्ह गुड फाउंडेशन आणि बजाज इलेक्ट्रिकल फाऊंडेशन यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत विधी विभागात नव्यानं ५०० रोपटयांची लागवड करण्यात आली आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या ढोरेगाव इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायतीनं काल गावात प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवली. यावेळी संपूर्ण गावातून जनजागृती फेरी काढून रस्त्यावर आणि इतरत्र पडलेलं प्लास्टिक गोळा करून एकत्रित साठवून ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना प्लास्टिक निर्मूलनाचं महत्त्व पटवून दिलं. ग्रामफेरीत विद्यार्थ्यांनी प्लास्टिक निर्मूलनाच्या प्रबोधनपर घोषणा देत ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतलं.

****

येत्या दोन दिवसात, कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments: