Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
· चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पन्न सात पूर्णांक आठ शतांश टक्के
· येत्या अठरा ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन
· देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचं महत्त्वाचं योगदान-केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
· विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तसंच सत्ताधारी एनडीएची मुंबईत बैठक
· ईएसआयसीच्या रुग्णालयांमध्ये कर्करोगावरील केमोथेरपी सेवेला कालपासून प्रारंभ
· मराठवाडा मुक्तिसंग्रामानिमित्त १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन;केंद्रीय गृहमंत्र्यांना निमंत्रण
आणि
· आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेकडून बांग्लादेशचा पाच गडी राखून पराभव
****
२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पन्न जीडीपी सात पूर्णांक आठ शतांश टक्के नोंदवला गेला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. कारखानदारी क्षेत्रानं चार पूर्णांक सात दशांश टक्के, कृषी क्षेत्रानं तीन पूर्णांक पाच दशांश टक्के तर सेवा क्षेत्रानं नऊ पूर्णांक दोन दशांश टक्के वाढ नोंदवली आहे. जीडीपी मधली ही वाढ म्हणजे देशाच्या निरंतर आर्थिक प्रगतीमधला आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी प्रतिक्रिया माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
****
येत्या अठरा ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. संसदीय कामकाजासंदर्भात स्थापन मंत्रिमंडळ समितीनं हे अधिवेशन बोलावल्याचं, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. या अधिवेशनामध्ये पाच बैठका होणार आहेत. अमृत काळादरम्यानच्या या अधिवेशनात फलदायी चर्चा आणि सकारात्मक संवादाची अपेक्षा असल्याचं जोशी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचं महत्त्वाचं योगदान असून, यामध्ये महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीचं अमूल्य योगदान असल्याचं, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. अहमगनगर जिल्ह्यात प्रवरानगर इथं सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्कारांचं वितरण काल राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यावेळी उपस्थित होते. यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातले जेष्ठ विचारवंत आणि समिक्षक निशिकांत ठकार यांना, राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार पुणे इथल्या डॉ.शैलजा बापट यांना आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार तमाशा कलावंत वसंत अवसरीकर यांना यावेळी प्रदान करण्यात आला.
****
देशातल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला काल मुंबईत सुरुवात झाली. या बैठकीला २८ पक्षांचे ६३ प्रतिनिधी उपस्थित आहेत. आज बैठकीच्या दुसऱ्या दिवशी इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण करण्यात येणार असून, त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेनं बैठकीची सांगता होणार आहे.
दरम्यान, या बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्योजक गौतम अदानींच्या संदर्भात केंद्र सरकारवर टीका केली. अदानींसोबतच्या व्यवहारांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचं उत्तर द्यावं, अशी मागणी केली आहे.
****
इंडिया आघाडीच्या बैठकीनिमित्तानं एकत्र आलेल्या पक्षांसमोर कोणताही अजेंडा नसल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही आघाडी झाली असल्याची टीका फडणवीस यांनी केली. ते म्हणाले,
‘‘हे जे इंडिया अलायन्स तयार झालेलं आहे, या इंडिया अलायन्सला कुठलाही अजेंडा नाही, या ज्या काही या ठिकाणी पार्ट्या एकत्रित आल्या आहेत, त्या देशाचा विचार करण्याकरता नाही, आपली राजकारणातली दुकानं बंद होत आहे, ही दुकानं कशी वाचवायची या करता हे सगळे एकत्र आले आहेत, आणि आजच आपण बघा आतापर्यंत पाच पार्ट्यांनी पंतप्रधान पदावर दावा ठोकलेला आहे. हे पतंप्रधान पदाचा उमेदवार ठरवू शकत नाहीत, आणि यांनी कितीही ठरवला तरी जनतेला पटला पाहिजे ना.’’
****
मुंबईमध्ये काल सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत रिपब्लिकन पक्ष आठवले गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, आदी मित्र पक्ष सहभागी झाले. आघाडीच्या पुढल्या धोरणांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
****
देशभरातल्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ-ईएसआयसीच्या ३० रुग्णालयांमध्ये, केमोथेरपी सेवेला कालपासून प्रारंभ झाला. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल नवी दिल्लीतील्या, ईएसआयसी मुख्यालयात या सेवेचं उद्घाटन केलं. या सेवेमुळे विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावरील अवलंबित कुटुंबीयांना, कर्करोगावर अधिक चांगले उपचार घेणं सुलभ होणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनी ईएसआयसीच्या डॅशबोर्डसह नियंत्रण कक्षाचंही उद्घाटन केलं.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्याच्या निमित्तानं मुक्तिसंग्रामाचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उत्सव ‘लोकोत्सव’ करावा, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. औरंगाबाद इथं काल मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यासंदर्भात मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. १५ ते १७ सप्टेंबर दरम्यान औरंगाबाद शहरात मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे विविध कार्यक्रम होणार असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. ते म्हणाले,
‘‘१५, १६, १७ या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या मुक्तिसंग्रामामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, त्या सर्वांचं स्मरण करत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन सोळा तारखेला चार वाजता करण्यात आलं आहे. त्यासाठी देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा साहेबांना या बाबतीतलं निमंत्रण मी स्वतःही दिलंय. आणि मुख्यमंत्री महोदयांनी भेट देऊन हे निमंत्रण दिलेलं आहे.’’
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाची माहिती देणारं भव्य स्मारक औरंगाबाद इथं उभारलं जाणार असून, त्यासाठी १०० कोटी रुपये निधी यापूर्वीच मंजूर केल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. ते म्हणाले,
‘‘हे स्मारक हे फक्त दगडाभिंतीचा असता कामा नये, हे ज्ञानवर्धक असावं, यादृष्टीने त्याला शंभर कोटी दिले, त्यापेक्षा जास्त निधी लागायचा असेल तर तेही देण्याचा प्रयत्न करू, त्याची जागा निश्चित केली, साडे चार एकर जागा आता निश्चित झाली असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची जागा ही त्यामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. त्याचं डिझाईन करताना हे या देशातलं उत्तम व्हावं, हा त्या मागचा भाव आहे.’’
****
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद इथं होणार असून, या बैठकीत जिल्ह्यात राबवावयाच्या विविध विकास योजनांचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तयार करुन तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे, असे निर्देश पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.
दरम्यान, औरंगाबाद जिल्हा परिषदेअंतर्गत रबावण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या १०६ अंगणवाडी मदतनिसांना भुमरे यांच्या हस्ते काल नियुक्ती पत्राचं वितरण करण्यात आलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे येत्या चार सप्टेंबर पासून राज्याचा दौरा करणार आहेत. १२ जिल्हयात ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचं त्या दर्शन घेणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या घृष्णेश्वर इथल्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन त्यांच्या या दौऱ्याला सुरवात होणार असून, समारोप ११ तारखेला परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री होणार आहे. पंकजा मुंडे या दौर्यादरम्यान चार हजार किलोमीटरचा प्रवास करणार असून, ठिकठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सोयीसुविधांची कामं विहीत कालमर्यादेत पूर्ण करून जनतेच्या सेवेत रूजू करण्याचे निर्देश, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. मुंबईत काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेची कार्ड ई केवायसी पूर्ण करून तयार करावे, आरोग्य विमा कवच दीड लाख रूपयांवरून पाच लाख रूपये करण्यात आलं असून, याबाबत तातडीने कारवाई पूर्ण करण्याचे निर्देशही सावंत यांनी यावेळी दिले.
****
उस्मानाबाद कलाविष्कारचे डॉ. पद्मसिंह पाटील पुरस्कृत श.मा.पाटील आणि त्रिंबकदादा शेळके स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार घोषित करण्यात आले. श.मा.पाटील स्मृती पुरस्कार सोलापूरचे डॉ शिवाजी शिंदे लिखित 'अंतस्थ हुंकार ' काव्यसंग्रहास घोषित करण्यात आला आहे. त्रिंबकदादा शेळके स्मृती पुरस्कार यंदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजनाची सोय करणा-या उस्मानाबादच्या अन्नपूर्णा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला जाहीर झाला आहे. पुरस्कारांचं वितरण लवकरच समारंभपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती कलाविष्कार अकादमीचे अध्यक्ष युवराज नळे यांनी दिली आहे.
****
लातूर इथल्या `ग्रीन लातूर वृक्ष टीम` या सामाजिक संघटनेनं यंदा तुळशीच्या बियांच्या राख्या तयार करुन रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यासंदर्भात संघटनेचे समन्वयक डॉ पवन लड्डा यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
‘‘राखी पोर्णिमेचा सण आम्ही वेगळ्या पद्धतीने साजरा केला. पारंपारिक राख्यांसोबत आम्ही तुळसी बियांपासून बनवलेल्या आकर्षक राख्या तयार केल्या. यामध्ये शंभर एक तुळशी बिया कागदाच्या पुड्यामध्ये बांधून त्यांला मोळी बांधली. आणि सुंदर अशी राखी तयार केली. शेवटचा उद्देश हा होता की जेव्हा ही राखी मातीमध्ये, कुंड्यामध्ये टाकल्या जातील सोबत बियासुद्धा पडल्या जातील त्याच्या. आणि त्यानंतर त्याच्यातून जी तुळशीची रोपं उगवतील, प्रत्येक घरामध्ये या पद्धतीनं दोन, तीन, चार तुळशीची रोपं उगवायला लागतील. पर्यावरणाच्या जवळ जाण्याचा हा छोटासा प्रयत्न ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून केला आहे.’’
****
लातूर जिल्ह्यात एकूण ६० महसूल मंडळांपैकी ३१ मंडळांमध्ये पावसाचा खंड पडल्यानं, त्याचा परिणाम पीक वाढीवर झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या आदेशानुसार हंगाम मध्य परिस्थितीचं सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात उत्पादनात ५० टक्के पेक्षा अधिक घट झाल्याचं दिसून आल्यास, विम्याची २५ टक्के अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्याबाबत विमा कंपनीला कळवण्यात येईल, असं जिल्हास्तरीय आढावा समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकार्यांनी कळवलं आहे.
****
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एबडन पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत. काल झालेल्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाचे अलेक्जांडर बुकीक आणि क्रिस्तोफर ओकोनेल यांच्या जोडीला पहिल्या फेरीत ६-४, ६-२ असं पराभूत केलं.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल ब गटातल्या सामन्यात श्रीलंकेनं बांग्लादेशचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशचा संघ ४२ षटकं चार चेंडूत १६४ धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेच्या संघानं हे आव्हान ३९व्या षटकात पाच गडी गमावत पूर्ण केलं. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना उद्या पाकिस्तानसोबत होणार आहे.
****
नियोजित वर्धा - यवतमाळ - नांदेड रेल्वे मार्गाच्या वर्धा ते देवळी या पहिल्या टप्प्याची तांत्रिक तपासणी काल करण्यात आली. दोन इंजिनसह आठ डब्यांची गाडी ११० किलोमीटर प्रतितास या वेगानं ही चाचणी घेण्यात आली.
****
व्हॉईस ऑफ मिडीया या देशपातळीवरच्या पत्रकारांच्या संघटनेच्या हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीनं काल पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. ज्या पत्रकारांना पत्रकारितेत दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना अधिस्वीकृती पत्र देण्यात यावं, यासह विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन केलं. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पक्षाच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अतुल गावंडे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं यासंदर्भातलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
****
लखनौ विभागात वाराणसी रेल्वे स्थानकावर तांत्रिक काम करण्याकरता `लाईन ब्लॉक` घेण्यात आला आहे. यामुळे जालना-छपरा-जालना ही विशेष रेल्वे २० आणि २७ सप्टेंबर रोजी,तर छपरा ते जालना ही रेल्वे २२ आणि २९ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
कृषी विभागाच्या पुरस्कारांसाठी लातूर जिल्ह्यात अर्ज मागवण्यात आले आहेत. शेतकरी, गट, संस्था आणि व्यक्ती यांनी या संदर्भात आपले प्रस्ताव नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे दहा सप्टेंबर पर्यंत सादर करावेत, असं आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक एस. व्ही. लाडके यांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment