आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ सप्टेंबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
·
सायबर दहशतवाद आणि आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक
कायदेशीर चौकट तयार करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
·
नागपूर
शहरात मुसळधार पावसाने महापूर;मराठवाड्यातही सर्वत्र पावसाची संततधार
·
'मेरी माटी मेरा देश"
अभियानांतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माती संकलन
आणि
·
उदगीर
इथं आज राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचं आयोजन
****
सायबर दहशतवाद आणि आर्थिक
गैरव्यवहार रोखण्यासाठी जागतिक कायदेशीर चौकट तयार करण्याचं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं काल दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय
वकील परिषदेचं उद्घाटन
केल्यानंतर ते बोलत होते. सायबर दहशतवाद, आर्थिक गैरव्यवहार,
कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर या समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक
चौकटीची गरज आहे, हे एकट्या दुकट्या सरकारचं काम नसून,
विविध देशांच्या कायदेतज्ज्ञांनी यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी
नमूद केली.
****
खेळांप्रती दृष्टीकोनात दिवसोंदिवस बदल होत असून त्याचं
प्रतिबिंब भारताच्या क्रीडा कामगिरीत पहायला मिळत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशात वारणसी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट
संकुलाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते काल झाली, त्यावेळी
ते बोलत होते. क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून इतर देशांशी
संबंध वृद्धिंगत होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. क्रीडा
क्षेत्रात भारतात विपुल गुणवत्ता असून, त्याला वाव
देण्यासाठी केंद्रसरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
क्रीडासंकुल उभारलं की आसपासच्या परिसराचा आर्थिक विकास वेगाने होतो,
याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी
आदित्यनाथ, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर,
यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
****
दरम्यान, पंतप्रधान आज आकाशवाणीवरून
प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून
देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मासिक कार्यक्रमाचा हा १०५
वा भाग असून, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यावरून सकाळी
११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. आकाशवाणीचं संकेतस्थळ तसंच
न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
एक देश एक निवडणूक समितीची पहिली बैठक काल नवी दिल्लीत
झाली. केंद्र सरकारने माजी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या आठ सदस्यीय समितीची स्थापना केली
आहे. लोकसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत
चाचपणी करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. देशाची राज्यघटना आणि इतर संवैधानिक तरतुदींच्या
आधारावर ही समिती आपल्या शिफारसी सादर करणार आहे.
****
ठाणे जिह्यातल्या उल्हासनगर शहाड गावठाण इथल्या सेंच्युरी
रेयॉन कंपनीत काल दुपारी झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला, तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल एक
दिवसीय दौऱ्यासाठी मुंबईत आले होते. शहा यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी
स्थापन श्रीगणेशाचं दर्शन घेतलं. भारतीय जनता पक्षाचे
मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणेश मंडळालाही शहा यांनी भेट दिली. लालबाग इथं जाऊन लालबागच्या राजाचंही शहा यांनी दर्शन घेतलं.
****
यवतमाळ जिल्ह्यात ‘मेरी माटी, मेरा देश’
या अभियानाचा दुसरा टप्पा मोठ्या उत्साहात राबवण्यात येत आहे. या
अंतर्गत प्रत्येक गावात ‘अमृत कलश यात्रा’ काढली जात असून, जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ५ हजार
कुटुंबांकडून माती, तांदुळाचं संकलन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजी नगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं काल 'मेरी माटी मेरा देश" या अभियानांतर्गत अमृतकलशात माती संकलन करण्यात आलं. विद्यापीठाचे प्र- कुलगुरू
डॉ श्याम शिरसाठ यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात कुलसचिव, डॉ.भगवान साखळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप,
संचालक डॉ मुस्तजीब खान, रासेयो संचालक डॉ सोनाली
क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
नागपूर आणि परिसरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसात
दोन महिलांचा मृत्यू झाला असून १४ जनावरंही दगावली आहेत. सुमारे चार तासांत १००
मिलीमीटर पावसाची नोंद झाली. चारशे नागरिकांना सुरक्षितस्थिळी हलवण्यात आलं आहे. कुणीही
अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे. अमरावती जिल्ह्यातही गेल्या ४८ तासापासून होत असलेल्या
पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, दर्यापूर
तालुक्यात एक युवक नदीपात्रात वाहून गेल्याचं वृत्त आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी
दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक
त्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान नागपूर परिसरात पुढचा आठवडाभर जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं
वर्तवला आहे.
****
मराठवाड्यातही काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये गंगापूर आणि खुलताबाद
तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, म्हैसमाळकडे जाणारा रस्ता या पावसामुळे
खचला आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन आणि जाफराबाद तालुका वगळता
सर्वच तालुक्यात काल पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात मोठ्या खंडानंतर
गेल्या ३ दिवसांपासून पाऊस होत आहे,
नांदेड जिल्ह्यातही अनेक दिवसांच्या खंडानंतर पाऊस झाला. हिंगोली शहरासह जिल्ह्यात गेल्या २ दिवसात चांगला
पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातही बहुतांश भागात काल पाऊस झाला.
बीड जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस झाला, अंबाजोगाई
इथं विद्युत तारांवर झाड पडल्याने, शहरातला विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता.
आष्टी तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात पांगरा शिंदे
शिवारात वीज पडून सात शेळ्या दगावल्या. मारुती जोगदंड या शेळी पालकाच्या शेळ्या दगावल्यानं मोठं नुकसान झालं
आहे.
****
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ९८ टक्के
पाणीसाठा झाल्यानं काल रात्री १ हजार १३६ दशलक्ष घनफूट प्रति सेकंद या वेगानं विसर्ग
करण्यात आला. दारणा धरणातून ३ हजार
५१२, नागमठाण धरणातून १३ हजार ५२० तर नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून
आठ हजार ७३१ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगानं विसर्ग सुरु आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी धरणाचा पाणी साठा सुमारे ३७ टक्क्यांपर्यंत पोहोचला
आहे.
****
गणेशोत्सवात काल पाच दिवसाचे गणपती तसंच गौरी विसर्जनाचा
सोहळा साजरा झाला. बीड जिल्ह्यातल्या राजुरी इथल्या गणेशोत्सवाची आणि अखंड हरिनाम सप्ताहाची काल सांगता झाली. राज्यभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लिंबागणेश इथल्या एक गाव एक गणपती उपक्रमातील मयुरेश्वर गणपतीचं काल पाचव्या दिवशी विसर्जन करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात उदगीर इथं आज राज्यस्तरीय शालेय कुस्ती
स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पोस्ते पोदार लर्न स्कूल इथं आज सकाळी
नऊ वाजता क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होईल. या स्पर्धेत राज्यातल्या आठ विभागांमधून १४
वर्षाखालील ८० मुलं आणि ८० मुली असे एकूण १६० स्पर्धक सहभागी होत आहेत.
****
बीड जिल्ह्यातल्या यश बालासाहेब जाधव या रग्बी खेळाडूची १८
वर्षाखालील भारतीय रग्बी संघात निवड झाली आहे. आशियायी रग्बी स्पर्धा तैवानच्या
तैपेयी इथं येत्या ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान खेळल्या जाणार आहेत.
दरम्यान, बीड जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कार्याध्यक्षपदी डॉ. योगेश
क्षीरसागर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड बीडवासियांसाठी
अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा एकदिवसीय क्रिकेट
सामना आज इंदूर इथं खेळवला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला प्रारंभ होईल. तीन सामन्यांच्या
मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यने आघाडीवर आहे.
****
लातूर जिल्ह्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या
९२५ वर पोहोचली आहे. यामध्ये ३९३ रुग्ण
लातूर शहरातले तर ५३३ रुग्ण शहराबाहेरचे आहे.
****
No comments:
Post a Comment