Sunday, 30 June 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ३० जून २०२४ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 June 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      दक्षिण अफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत जगज्जेता-विराट कोहली आणि रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त 

·      ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ

आणि  

·      बंदीजनांना पुनर्वसनाची संधी देण्यासाठी लातूर जिल्हा कारागृहाचा अभिनव उपक्रम

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेवर मात्र सात धावांनी रोमहर्षक विजय मिळवत भारत जगज्जेता ठरला आहे. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने विराट कोहलीच्या ७६ आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या जोरावर सात बाद १७६ धावा केल्या. आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात आपला पहिलाच अंतिम सामना खेळत असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ मात्र, निर्धारित षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १६९ धावाच करू शकला. अखेरच्या षटकापर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवनं डेव्हीड मिलरला सीमारेषेवर झेलबाद करत भारताचा विजय निश्चित केला. हार्दिकनं तीन, जसप्रीत बुमराह तसंच अर्शदीपसिंगने प्रत्येकी दोन तर अक्षर पटेलने एक बळी घेतला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जय शहा यांच्या उपस्थितीत भारतीय संघाला विश्वचषक प्रदान करण्यात आला. विराट कोहली सामनावीर तर जसप्रीत बुमराह मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. 

या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

दरम्यान, या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना' सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी, लवकरच नियमावली तयार करून इच्छुकांकडून ऑनलाईन अर्ज मागवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यात केवळ मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर जिथे जिथे ड्रग्ज विकले जाते त्या सर्व ठिकाणी कारवाई सुरु असून, जो पर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं.

****

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकांकडून शाडूची माती मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली.

अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या लाडकी बहीण या योजनेचा शासननिर्णय काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उद्या एक जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान, अर्थसंकल्पात विविध निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रात कार्यरत महिलांनी काल विधीमंडळ परिसरात मुख्यमंत्र्यांना ओवाळून राखी बांधत, आभार मानले.

****

विरोधकांनी मात्र हा शासन निर्णय म्हणजे सार्वभौम सदनाचा हक्कभंग असल्याचा आरोप केला. अर्थसंकल्पाला प्रथम विधीमंडळाची आणि त्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळते. त्यानंतर अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यास मान्यता मिळते. परंतु ही प्रक्रिया डावलून सदरील शासन निर्णय काढत, सरकारने महिलांची फसवणूक केली, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

****

राज्यातल्या विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश देण्याच्या परंपरेला छेद गेल्याचा आरोप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. काल विधान परिषदेत याविषयावर बोलतांना दानवे यांनी, शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेल्यावरही सुमारे ४५ लाख विद्यार्थी गणवेशाविना वंचित असल्याकडे लक्ष वेधलं. येत्या १५ ऑगस्टपर्यंत गणवेश मिळतील, अशी माहिती शासनाने दिल्याचं दानवे यांनी सांगितलं.

****

विशेष सहाय्य योजनांचा निधी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली. राष्ट्रीय-तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पात्र खेळाडू शासकीय नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी निकषांमध्ये बदल करण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

दरम्यान, पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल, असं पवार यांनी सांगितलं.

****

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी राज्यात काही ठिकाणी सेवा केंद्रचालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाहून अधिक रक्कम अवैधरित्या वसूल करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास, कठोर कारवाईचा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. याबाबत कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 98-22-44-66-55 यावर थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी काल आळंदी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या सोहळ्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक अलकापुरीत दाखल झाले आहेत. काल रात्री पालखीचा मुक्काम आळंदीतच माऊलीच्या आजोळघरी होता. आज सकाळी हा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होत आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आपेगाव इथूनही संत ज्ञानेश्वरांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल देहूतल्या इनामदार वाड्यातून पुण्याकडे मार्गस्थ झाला.

****

नांदेड जिल्ह्यात कंधार इथून श्री संत साधू महाराज संस्थानच्या पायी दिंडीचं काल पंढरपूरकडे प्रस्थान झालं, या दिंडीला तीन शतकांची परंपरा आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या शिरूर शहरात काल बंद पाळण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची वादग्रतस्त ध्वनीफित व्हायरल झाल्यानंतर ओबीसी समाजाच्या वतीने या बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, दरम्यान, पक्षविरोधी कार्य केल्यामुळे शिवसेना बीड जिल्हाप्रमुख पदावरून कुंडलीक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  

****

लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..

जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून हे उपाहारगृह तसंच लाँड्री उभारण्यात आली आहे. प्रशस्त बैठक व्यवस्था, बांबूपासून साकारलेले बैठक कक्ष हे वैशिष्ट्य असलेल्या या या उपहारगृहासोबतच इथल्या लाँड्रीची पूर्ण व्यवस्था शिक्षेचा कालावधीत पूर्ण होत आलेले खुल्या कारागृहातले कैदी पाहणार आहेत आहे. लाँड्रीची सुविधाही अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून इथं काम करणाऱ्या बंद्यांना वेतन दिलं जाणार आहे.

आकाशवाणी बातम्यांसाठी शशिकांत पाटील, लातूर

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी गुरुकुलात प्रातिग्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या ख्याल गायक पद्मा तळवलकर, ओडिशी नृत्यांगना पद्मश्री कुमकुम मोहंती, तसंच उत्तराखंडच्या लोककलाकार पद्मश्री बसंती बिष्ट यांनी आपापल्या सादरीकरणातून या कलाप्रकारांच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. 

****

चेन्नईच्या एम ए चिदंबरम्मैदानावर सुरू असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघ आणि दक्षिण अफ्रिका महिला क्रिकेट संघादरम्यान एकमेव क्रिकेट कसोटी सामन्यात काल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकन महिला संघाच्या चार बाद २३६ धावा झाल्या आहेत. भारताच्या स्नेह राणानं सर्वाधिक तीन खेळाडू बाद केले. त्याआधी सकाळी भारतीय महिला संघानं सहा बाद ६०३ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. कर्णधार हरमनप्रीत कौरनं ६९ आणि ऋचा घोषनं ८६ धावा केल्या.

****

ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या दिया चितळे आणि यशस्विनी घोरपडे या जोडीनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत या जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा ११-, ११-, ११-२ असा पराभव केला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राम कृष्ण गोदावरी सहकारी उपसा जलसिंचन योजनेतील दोन हजार शेतकऱ्यांना कर्जापोटी दिलेली रक्कम राज्य सरकारने भरावी, अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं, अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

मध्य रेल्वे विभागात रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी घेण्यात येणाऱ्या लाईन ब्लॉकमुळे दौंड निजामबाद, निजामाबाद पुणे, आणि नांदेड पुणे गाड्यांमध्ये बदल करण्यात आला होता. मात्र, हा लाईन ब्लॉक काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याने या गाड्या नियमित मार्गाने धावणार आहेत.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...