Friday, 28 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.06.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२८ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या विशेष अधिवेशनात आज दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु होणार आहे. काल आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी सरकारच्या विविध योजना तसंच निर्णयांवर प्रकाश टाकला. 

****

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतील.

****

मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-एक वर छत कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी विमानतळावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. याठिकाणी बचावकार्य सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात झाली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू इथं अमरनाथ यात्रा आधार शिबिरातून यात्रेच्या पहिल्या तुकडीला रवाना केलं. 

****

जागतिक सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग अर्थात एमएसएमई दिवस काल साजरा करण्यात आला. केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या उद्यमी भारत या कार्यक्रमात एमसएमई टीम आणि यशस्वीनी या दोन नवीन योजनांची घोषणा केली.

****

सहा वर्षाखालील लहान मुले, गर्भवती, स्तनदा मातांना मिळणाऱ्या पोषण आहाराच्या मानधनात वाढ करण्याची मागणी, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात तटकरे यांनी काल दिल्लीत त्यांची भेट घेतली.

****

दोन नक्षलवादी महिलांनी काल गडचिरोली इथं पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या या दोघींवर प्रत्येकी आठ लाख रुपयांचं बक्षीस होतं. २०२२ पासून आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

****

चंद्रपूर जिल्ह्यातले काँग्रेस पक्षाचे नेते आसावरी देवतळे आणि विजय देवतळे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यानं ही कारवाई करण्यात आली.

****

No comments: