Tuesday, 25 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.06.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 June 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीएकडून भाजप खासदार ओम बिर्ला यांनी, तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केलं. अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी एनडीच्या आज दिल्लीत झालेल्या बैठकीत बिर्ला यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, विरोधी पक्षांनी लोकसभेत उपाध्यक्ष पदाची मागणी केली आहे. परंपरेनुसार उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिलं पाहिजे, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

****

अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित संभासदांचा शपथविधी आजही सुरू आहे. राज्यातल्या खसदारांना आज शपथ देण्यात आली असून, बहुतांश सदस्यांनी मराठीतून शपथ घेतली. प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या खसदारांनी हातात संविधानाची प्रत घेऊन शपथ घेतली. तर ओडिशातले भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. काल सभागृहात २६६ सदस्यांना शपथ देण्यात आली होती.

****

आणीबाणीचा विरोध आणि प्रतिकार करणार्या सर्व महान स्त्री - पुरुषांना आंदरांजली वाहण्याचा आजचा दिवस असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशावर आणीबाणी लादून काँग्रेस पक्षाने मुलभूत स्वातंत्र्यांना तसंच प्रत्येक भारतीयात आदराचं स्थान असलेल्या भारतीय संविधानाला पायदळी तुडवलं, अशा भावना पंतप्रधानांनी आणीबाणीच्या आठवणी जागवताना समाज माध्यमावरच्या संदेशात व्यक्त केल्या आहेत. २५ जून १९७५ रोजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती.

****

राज्य विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीसाठी अधिसूचना आज जारी झाली. या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, मतदान आणि मतमोजणी १२ जुलै रोजी होणार आहे.  

****

माजी केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सुर्यकांता पाटील यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका हद्दीतील अनाधिकृत भूखंड तसंच बांधकाम नियमित करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, पावसाळ्यात येणाऱ्या अडचणीसंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी महापालिकेनं संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. यासाठी क्यू आर कोड उपलब्ध करून दिला असून, तो स्कॅन करून गूगल अर्जावर ही तक्रार नोंदवता येणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरही हा अर्ज उपलब्ध आहे.

****

नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या माथाडी कामगारांनी काल नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला होता. कांदा-बटाटा मार्केटच्या इमारतीचा पाणीपुरवठा खंडीत केल्याच्या विरोधात हा मोर्चा होता. अतिधोकादायक गाळ्यांमध्ये दुर्घटना झाली तर जबाबदारी घेऊ, असं हमीपत्र लिहून पालिकेला द्यावं अशी सूचना महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी आंदोलकांना केली. हे हमीपत्र मिळाल्यानंतर मार्केटमधील पाणी पुरवठा सुरू केला जाईल, असं आश्वासन आयुक्तांनी दिलं होतं.

****

नाशिक-गुजरात सीमेवर लाकडांची तस्करी करणाऱ्या तस्कराला नाशिकच्या वन विभागाच्या पथकानं काल अटक केली. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या पेठ, सुरगाणा, हरसुल, त्र्यंबकेश्वर या भागातल्या जंगलात खैर, साग या झाडांची तस्करी होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

****

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्ताननं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सुपर एट मधल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं बांग्लादेशचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे आठ धावांनी पराभव केला. अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात पाच बाद ११५ धावा केल्या. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यानं बांग्लादेशच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे १९ षटकात ११४ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. हा संघ १०५ धावांवर सर्वबाद झाला.  

अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. आता भारतासह दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे संघ उपान्त्य फेरीत खेळणार आहेत. या फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हे सामने येत्या गुरुवारी २७ तारखेला होणार आहेत. या सामन्यांमधल्या विजेत्या संघांमध्ये येत्या २९ तारखेला अंतिम सामना होईल.

****

राज्यात येत्या ३६ तासांत मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, अकोला, अमरावती, बुलडाणा, आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...