Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 27 June 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २७ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
गरीब, शेतकरी, दीनदुबळे आणि महिलांचं उत्थान झालं, तरच देश विकसित होतो, त्यामुळं या वर्गाच्या उत्थानासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.
आजपासून लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली.
तत्पूर्वी आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सदस्यांना
संबोधित केलं.
देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची जगात चर्चा
होत आहे. या निवडणुकीत महिलांचा सहभाग महत्वाचा ठरला, जम्मू काश्मिरमध्ये यंदा झालेलं विक्रमी मतदान हे देशाच्या शत्रूंना
चोख प्रत्त्यूत्तर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
देशाची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून भारत लवकरच तिसरी
मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. पेपर फुटीप्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे
आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी केली जाईल, तसंच संसदेनं पेपरफुटीसंदर्भात कायदा बनवला आहे, असही राष्ट्रपतीनं सांगितलं.
****
राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं.
तत्पूर्वी विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन केलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी
तसंच विजबिल माफी, नैसर्गिक आपत्तींची
नुकसान भरपाई द्यावी आदी मुद्दे उपस्थित करून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते पृथ्विराज चव्हाण, आमदार भाई जगताप, रवींद्र धंगेकर आणि इतरांनी विविध मुद्द्यांवरून सरकारचा निषेध
केला.
दरम्यान, राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणंघेणं नाही, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
यांनी यावेळी केला. काही बांधकाम व्यावसायिक शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत आहेत.
हा मुद्दा आम्ही सभागृहात उपस्थित करू, असंही ते म्हणाले. हे
अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन ठरेल, असा दावाही त्यांनी केला.
****
गेल्या
आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ ७ पूर्णांक ६ दशांश टक्के असेल,
असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात ९ पूर्णांक ४ दशांश
टक्क्यांची वाढ झाली होती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज
दोन्ही सभागृहांच्या पटलावर हा अहवाल मांडला. सेवा क्षेत्रात सर्वाधिक ८ पूर्णांक
८ दशांश टक्के तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी १ पूर्णांक ९ दशांश टक्के वाढ गेल्या
आर्थिक वर्षात झाली. उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर ७ पूर्णांक ६ दशांश टक्के
असण्याचं पूर्वानुमान आहे.
****
कर्जमाफीसाठी मागील चार दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यातील
ताकतोडा इथं शेतकऱ्यांचं उपोषण सुरु आहे. मात्र प्रशासनानं या उपोषणाची दखल न घेतल्यामुळं
राज्य सरकारच्या निषेधार्थ एका शेतकऱ्यानं आज सकाळी आपली दुचाकी जाळली. २०१९ मध्ये
ताकतोडा हे गाव कर्जमाफीसाठी विक्रीस काढण्यात आलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे सरकारकडून
राज्यात कर्जमाफी करण्यात आली होती. शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करावा, वंचित सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा तसंच
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागण्यांसाठी सेनगावच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना
निवेदन पाठवून काही शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केलं आहे.
****
श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज सकाळी परभणी
शहरात आगमन झालं. ही पालखी परभणीत आज मुक्कामी राहणार असून उद्या ही पालखी गंगाखेडकडं
मार्गस्थ होईल. दरम्यान, राज्य शासनाच्या वतीनं आरोग्य वारी, पंढरीच्या दारी या अभिनव उपक्रमातर्गंत परभणी आरोग्य विभागाच्या
वतीनं पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची तपासणी करून उपचार केले जात आहेत. नागरिकांनी या
दिंडीत सहभागी होऊन आरोग्य सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. राहुल गित्ते आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लाखामवार यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात, जमिनीत ओल धरून ठेवेल असा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळं
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. मुबलक पाऊस
झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला त्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिला आहे.
****
येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच
ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस
पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला दुसरा उपांत्य
सामना आज भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. गयाना इथं भारतीय वेळेनुसार रात्री आठ
वाजता सामना सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment