Thursday, 27 June 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 27.06.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 June 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ जून २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      नीट परीक्षेतील गैरव्यवहारांची निःष्‍पक्ष चौकशी, संसदेच्या अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं प्रतिपादन

·      राज्यातील नीट प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग, बिहारमधून दोघांना अटक

·      राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ ७ पूर्णांक ६ दशांश टक्के राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालातील अंदाज, परकीय थेट गुंतवणूकीत महाराष्ट्र अग्रस्थानी

आणि

·      टी-ट्वेन्टी विश्वचषकात भारत-इंग्लंडदरम्यान उपांत्यफेरीची लढत, अफगाणिस्तानचा पराभव करुन दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केलं. आपल्या अभिषणात राष्ट्रपतींनी नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक, भारतीय अर्थव्यवस्थेची झेप यावर प्रकाश टाकला. सरकार लवकरच अर्थसंकल्प सादर करेल. हा अर्थसंकल्प भविष्यकालीन नियोजन आणि जलद सुधारणा यावर भर देणारा असेल, असं राष्ट्रपती म्हणाल्या.

पेपर फुटीप्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे, या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी केली जाईल, असं राष्ट्रपती म्हणाल्या. नीट परीक्षेतील अनियमिततेच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कायदा पारित केला असल्याचं सांगत त्या म्हणाल्या -

हाल ही मे कुछ परीक्षाओं मे हुई पेपर लीक की घटनाओं की निःपक्ष जांच और दोषियों को कडी से कडी सजा दिलवाने के लिये मरी सरकार प्रतिबद्ध है। इससे पहले भी हमनें देखा है की कई राज्यों मे पेपर लीक की घटनायें होती रही है। इस पर दलिया राजनीती से उपर उठकर देशव्यापी ठोस उपाय करने की जरूरत है।

 

१ जुलैपासून सुधारीत फौजदारी कायदे लागू होणार आहेत. यात दंडा ऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं जाणार आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम २०२३ अशी या कायद्याची नावं आहेत. गेल्या वर्षी पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात या कायद्यांना संसदेची मंजूरी मिळाली आहे.

दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचं आजचं कामकाज तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली. नंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेप्रकरणी सीबीआयनं आज दोघांना अटक केली आहे. या दोन्ही संशयित आरोपींना पाटणा येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यात नीट परिक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. लातूर पोलिसांनी याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक केली आहे.

****

गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ ७ पूर्णांक ६ दशांश टक्के असेल, असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात ९ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांची वाढ झाली होती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दोन्ही सभागृहांच्या पटलावर हा अहवाल मांडला. सेवा क्षेत्रात सर्वाधिक ८ पूर्णांक ८ दशांश टक्के तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी १ पूर्णांक ९ दशांश टक्के वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली. उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर ७ पूर्णांक ६ दशांश टक्के असण्याचं पूर्वानुमान आहे.

गेल्या आर्थिक वर्षात राज्याचं सांकेतिक स्थूल उत्पन्न ४० लाख ४४ हजार २५१ कोटी रुपये अपेक्षित आहे. त्या आधीच्या आर्थिक वर्षात तुलनेत त्यात सुमारे ५ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

गेल्या आर्थिक वर्षात राज्याचं दरडोई उत्पन्न २ लाख ७७ हजार ६०३ रुपये असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात २५ हजार २१४ रुपयांची वाढ झाली. इतर राज्यांच्या तुलनेत दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानी आहे. परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र गेल्या आर्थिक वर्षातही पहिल्या स्थानी राहिला आहे.

****

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, विजबिल माफी, नैसर्गिक आपत्तींची नुकसान भरपाई द्यावी आदी मुद्द्यांवर सकाळी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा देत विविध मुद्यांवरून सरकारचा निषेध केला.

राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणंघेणं नाही, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला. हे अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन ठरेल, असा दावाही त्यांनी केला.

****

विधानसभा निवडणुकीआधी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज मुंबई इथं वार्ताहरांशी बोलत होते.

राज्यात सुरु असलेल्या ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या प्रश्नांवर सर्वमान्य तोडगा निघणार असेल तर आम्ही सरकारसोबत असू, असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. शेतकरी आत्महत्या, पोलिस भरतीचा प्रश्न, अंमली पदार्थ तस्करीचं वाढतं प्रमाण या विषयांवरही ठाकरे यांनी सरकारचं लक्ष वेधलं.

****

ठाणे आणि मीरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसंच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना दिले आहेत.

पुण्यात काही तरुण-तरुणी अमली पदार्थांचे सेवन करीत असल्याचं नुकतेच निदर्शनास आलं होतं. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्तानंतर ठाणे प्रशासनालाही यासंबंधीत आदेश दिले आहेत.

****

स्मार्ट मीटर सर्व सामान्य ग्राहकांसाठी लागू करण्यात आले नसून फक्त सरकारी कार्यालयात हे मीटर बसवण्यात येणार असल्याचं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महावितरणच्या सुधारित वितरण क्षेत्राच्या योजनेमुळं राज्यातल्या ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर वाहिन्यांचे विलगीकरण, वितरण हानी कमी करणं, वितरण प्रणालीचं सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग यासारखे कार्यक्रम महावितरणनं हाती घेतले आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या रविवारी जनतेशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे.

****

दुधाला किमान ४० रुपये दर आणि अनुदान मिळावं या मागणीसाठी दुध उत्पादक शेतकरी उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. गेल्या वर्षभरापासून दुध उत्पादक शेतकरी प्रती लिटर १० ते १५ रुपयांचा तोटा सहन करत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं तोडगा काढून दिलासा द्यावा अशी दूध उत्पादक आंदोलकांची मागणी आहे.

दरम्यान, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढीसंदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक उद्या विधानभवनात होणार आहे.

****

केंद्र सरकारनं सूर्यफूल तेल, मका, मोहरीचे तेल, दूध पावडर आयात करण्यास परवानगी दिली आहे. सूर्यफूल, मोहरीच्या तेलाच्या आयातीबरोबरच दूध पावडरच्या आयातीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील फटका बसू शकतो. त्यामुळे या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही, याची हमी केंद्र सरकारनं द्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गुंठेवारी कायद्याविरोधात आज महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना निवेदन देण्यात आलं. गुंठेवारी कायद्याविरोधात शहरात आंदोलन सुरू होतं. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह नागरिकांच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्तांकडे हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली आहे. यावर योग्य तो निर्णय घेऊ असं महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलं.

****

पंढरपूरला निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचं आज जालना जिल्ह्यात आगमन झालं. या पालखीचं ठिकठिकाणी मोठ्या भक्तीभावानं स्वागत होत असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पंढरपूरला जाणारी पहिली दिंडी म्हणून मुक्ताईच्या पालखीला विशेष मानाचं स्थान आहे. जालना जिल्ह्यात ही पालखी दोन दिवस मुक्कामी राहणार आहे.

दरम्यान, शेगावच्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं आज सकाळी परभणी शहरात आगमन झालं. दिवसभर गजानन महाराजांच्या पालखीची वाजत गाजत शहरात मिरवणूक काढण्यात आली असून उद्या सकाळी या पालखीचं गंगाखेडला प्रस्थान होणार आहे.

****

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. गयाना इथं भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता हा सामना सुरु होईल. सकाळी उपांत्यफेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

****

हवामान

येत्या दोन दिवसात उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...