Saturday, 29 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.06.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 29 June 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २९ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

अंधेरी इथल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा १२५ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला असून, या संपूर्ण  प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडलेल्या मुद्यावर ते बोलत होते. हा प्रश्न अतिशय गंभीर असून सरकारने त्यावर योग्य उपाययोजना करावी, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी यावेळी केली.

नीट परीक्षेत झालेला घोटाळा, बनावट विद्यार्थी इत्यादी विषय देखील वडेट्टीवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांनी आज सभागृहात मांडले आणि असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, यासंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या कायद्याच्या आधारे पुढील कारवाई करू, असं आश्वासन दिलं.

कामगारांना दिल्या जाणाऱ्या जेवणावरून उपस्थित केलेल्या मुद्द्याला उत्तर देताना कामगार मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करून विरोधकांनी विधानसभेत गदारोळ केला. सभागृहाचे दस्तऐवज तपासून त्यात काही असंसदीय आढळून आल्यास तो भाग वगळला जाईल, असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. मात्र, या प्रकारचा निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला.

****

जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातल्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थीत केली, त्याला उत्तर देताना मंत्री बोलत होते.

दरम्यान, राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यावर निदर्शनं केली.

****

विधानपरिषदेच्या जागांसाठी आपल्या लेटरहेड सोबत खोडसाळपणा करून कोणीतरी भाजप उमेदवारांची यादी बनवली असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. भाजप केंद्रीय संसदीय मंडळाने ठरवलेली नावं विधान परिषदेच्या जागांसाठी पाठवले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

नाशिक जिल्ह्यात कश्यपी धरणातून गंगापूर धरणासाठी विसर्ग करण्यास प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या विरोध मावळला असून, आजपासून पुन्हा ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं गंगापूर धरणासाठी विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  गंगापूर धरणामध्ये कश्यपी धरणातून पाणी सोडण्यास कश्यपी इथल्या ग्रामस्थांनी, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास विरोध केला होता. यासंदर्भात काल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ग्रामस्थांची बैठक घेतल्यानंतर ग्रामस्थांनी पाणी सोडण्यास सहमती दर्शवली.

****

लातूर जिल्हा कारागृहातल्या बंदीजनांना पुनर्वसनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उपहारगृह आणि लाँड्री सुरू करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या सहयोगातून उभारण्यात आलेल्या या उपाहारगृह तसंच लाँड्रीचं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं.

****


धाराशिव जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २५ जून पासून सुरू झाला असून, २४ जुलै पर्यंत नागरिकांनी मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. २० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं काही रेल्वेगाड्यांना येत्या सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामध्ये हैदराबाद-जयपूर, नांदेड-एरोड आणि जालना-छपरा या गाड्यांचा समावेश आहे.

दरम्यान, जालना-छपरा या गाडीच्या मार्गात येत्या चोवीस जुलैपर्यंत तात्पुरता बदल केल्याचंही दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.

****

युएस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत मालविकाने स्कॉटलंडच्या खेळाडुचा १० - २१, २१ - १५, २१ - १० असा पराभव केला.

पुरुष एकेरीत उपान्त्यपूर्व फेरीत भारताच्या प्रियांशू राजावतला चीनच्या खेळाडुकडून पराभव पत्करावा लागला.

****

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. बार्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.

****

No comments: