Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
· अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी
ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड
· राज्य विधीमंडळाचं उद्यापासून
पावसाळी अधिवेशन-सरकारी चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
· राजर्षी शाहू महाराज यांना
शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन
आणि
· टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या
उपांत्य फेरीत उद्या भारताचा इंग्लंडशी तर दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानशी सामना
****
अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून
भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड झाली. लोकसभेत आज कामकाज सुरु होताच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १२ घटक पक्षाच्या नेत्यांनी
बिर्ला यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडला. तर विरोधी पक्षांकडून समाजवादी
पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काँग्रेसचे के सुरेश
यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.
बिर्ला यांच्या निवडीनंतर पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत
नेलं. उभय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
पुढच्या पाच वर्षात बिर्ला हे सदनाला
मार्गदर्शन आणि सहकार्य करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या
पाच वर्षात १७व्या लोकसभेनं बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक ऐतिहासिक कायदे पारित
केल्याचं त्यांनी नमूद केलं.
अध्यक्ष ओम बिर्ला विरोधकांना बोलण्याची, मत मांडण्याची संधी देतील अशी अपेक्षा
विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली. सत्ताधारी तसंच विरोधी पक्षांच्या
अनेक सदस्यांनी अध्यक्षांचं अभिनंदन केलं.
दरम्यान, दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून
सेवेची संधी दिल्याबद्दल ओम बिर्ला यांनी सदनाचे आभार मानले. आपल्या या भाषणात अध्यक्षांनी
आणिबाणीचा उल्लेख करत, १९७५ साली आजच्या दिवशी देशावर लादलेल्या आणिबाणीची हे
सदन निंदा करत असल्याचं, नमूद केलं. अध्यक्षांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची सभागृहाला ओळख करून दिली. त्यानंतर सदनाचं
कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
राज्यसभेचं अधिवेशन उद्यापासून सुरु
होणार असून, दोन्ही सदनांच्या संयुक्त
बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. दरम्यान, संसद भवनाच्या बाहेर सत्ताधारी खासदारांनी
आणिबाणीविरोधात फलक झळकावत निदर्शनं केली.
****
महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी
अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. १२ जुलैपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात राज्याचा
अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी मांडण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
आज संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या चहापानाचा कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह
मंत्रिमंडळातले सन्माननीय सदस्य, दोन्ही सदनांचे आमदार, तसंच वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित
होते. या चहापानानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.
दरम्यान, सरकारच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार
टाकला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप
केला. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व
कायदा-सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी-एनआरसी हे दोन्ही कायदे महाराष्ट्रात लागू
होऊ देणार नसल्याचं, वडेट्टीवार यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी
आणि वीज बिल माफी करावी अशी मागणी या अधिवेशनात करणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते
अंबादास दानवे यांनी यावेळी बोलतांना, नीट प्रमाणेच इतर परीझा आणि भरती प्रक्रियेतही गैरप्रकार
सुरू असल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या जीएसटी परिषदेच्या
बैठकीला अनुपस्थितीवरूनही दानवे यांनी टीका केली.
****
विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण
पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान झालं. दुपारी तीन वाजेपर्यंत
मुंबई पदवीधर मतदार संघात सुमारे ४६ टक्के, मुंबई शिक्षक मतदार संघात ६१ पूर्णांक
४४ शतांश, कोकण पदवीधर मतदार संघात ४८
टक्के, तर नाशिक शिक्षक मतदार संघात
सरासरी ६४ पूर्णांक ४१ शतांश टक्के मतदान झालं. मतमोजणी एक जुलैला होणार आहे.
दरम्यान, विधान परिषदेतला कार्यकाळ पूर्ण
होणाऱ्या सदस्यांना उद्या दुपारी ३ वाजता विधिमंडळातील मध्यवर्ती सभागृहात छोटेखानी
समारंभात निरोप दिला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन
विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी प्रभारी विभागीय आयुक्त जगदिश मिनीयार यांच्याकडून
पदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी, उपायुक्त जगदिश मिनीयार यांनी
गावडे यांचं पुष्पगुच्छ देवून स्वागत केलं.
दरम्यान, बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ
मुंडे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अविनाश पाठक यांची बीडचे जिल्हाधिकारी
म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राजर्षी शाहू महाराज यांची शतकोत्तर
सुवर्णमहोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार
करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि
मोफत केलं होतं. त्यांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त
राज्यात विविध कार्यक्रमांतून शाहूमहाराजांना अभिवादन करण्यात आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका
ट्विट संदेशातून शाहू महाराजांना आदरांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात
तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान भवनातील शाहू महाराजांच्या
पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
कोल्हापूर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ
यांनी लक्ष्मी विलास पॅलेस इथल्या शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केलं. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रा आणि समता दिंडीत नागरिक मोठ्या
संख्येने सहभागी झाले.
छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त
कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
नांदेड शहरातून आज समता दिंडी काढण्यात
आली. शहरातल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन निघालेल्या
या समता दिंडीत आबालवृद्धांनी सहभाग घेतला.
लातूर इथंही समाज कल्याण विभागाच्यावतीनं
आज समता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा
दाखवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक इथून या दिंडीला सुरुवात झाली. या माध्यमातून
सामाजिक न्यायाचा संदेश देत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
****
एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत” ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील
चोपडा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला ५० लाख रुपयांचं
बक्षीस मिळालं आहे. ‘ब’ वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बसस्थानकाचा राज्यात
पहिला क्रमांक आला असून, या बसस्थानकाला २५ लाख रुपयांचं बक्षीस मिळाले आहे. ‘क’ वर्गामध्ये राज्यात सातारा जिल्ह्यातील
मेढा बसस्थानकाचा प्रथम क्रमांक आला असून, या बसस्थानकाला दहा लाख रुपयांचं
बक्षीस मिळालं आहे.
या स्पर्धेसाठी विभागनिहायही बक्षीसं
जाहीर झाली असून, तब्बल अडीच कोटी रूपयाची बक्षीसं देण्यात येणार आहेत.
येत्या १५ ऑगस्टला बक्षीस पात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
****
किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक समानतेबद्दल
जागरुकता निर्माण करण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासन आणि युनिसेफने लैंगिक समानता परिवर्तन
कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ.मैनाक घोष, एसईआरटीच्या उपसंचालक डॉ.नेहा
बेलसरे आणि शिक्षणाधिकारी अशोक पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून या बाबतच्या प्रयत्नांचं
विशेष कौतुक केलं.
पहिल्या टप्प्यामध्ये ८-१६ वर्षे
वयोगटातील मुलांसाठी खेळ-आधारित लैंगिक समानता परिवर्तनात्मक कार्यक्रम राबवण्यात आला.
तर दुसऱ्या टप्प्याचा प्राथमिक भर हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये “मीना
राजू मंच” कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या वर्गांवर लक्ष केंद्रीत करण्यावर असणार आहे.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
उद्या दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान तसंच भारत आणि इंग्लंड दरम्यान उपांत्य सामना
होणार आहे. त्रिनिदाद इथं सकाळी सहा वाजता दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात
सामना होणार आहे. तर रात्री आठ वाजता गयाना इथं भारत आणि इंग्लंड दरम्यान सामना होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment