Wednesday, 26 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.06.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 June 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड झाली. लोकसभेत आज कामकाज सुरु होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १२ घटक पक्षाच्या नेत्यांनी बिर्ला यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडला. तर विरोधी पक्षांकडून समाजवादी पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काँग्रेसचे के सुरेश यांच्या बाजुने प्रस्ताव मांडला.

पुढच्या पाच वर्षात बिर्ला हे सदनाला मार्गदर्शन आणि सहकार्य करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या पाच वर्षात १७व्या लोकसभेनं बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक ऐतिहासिक कायदे पारित केल्याचं त्यांनी नमूद केलं.

अध्यक्ष अमो बिर्ला विरोधकांना बोलण्याची, मत मांडण्याची संधी देतील अशी अपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.

समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रविड मुनेत्र कळघमचे टी आर बालू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्यासह अनेक सदस्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं.

दरम्यान, राज्यसभेचं अधिवेशन उद्यापासून सुरु होणार असून, दोन्ही सभागृहासमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे.

****


स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला असल्याचं, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रह्लाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते. ऊसापासून साखर तर त्याच्या मळीपासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ञांना यावेळी केलं.

****

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार असून, मतमोजणी एक जुलै रोजी होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात २७, मुंबई शिक्षक मतदारसंघात १८ पूर्णांक ३१, कोकण पदवीधर मतदारसंघात २० पूर्णांक १५, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात २३ पूर्णांक १६ टक्के मतदान झालं.

****

राजर्षी शाहू महाराज यांची १५०वी जयंती आज साजरी होत आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. त्यांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

कोल्हापूर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मी विलास पॅलेस इथल्या शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रा आणि समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.

नांदेड शहरात आज समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन या दिंडीची सुरवात झाली.

लातूर इथंही समाज कल्याण विभागाच्यावतीनं आज समता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक इथून या दिंडीला सुरुवात झाली. या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपासणी पथकानं बीड इथं काही जणांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजलगाव तालुक्यातल्या काही शिक्षकांचा समावेश असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

येत्या एक जुलैला कृषीदिनी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा तसंच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

****

टेक्सास इथं सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ अमेरिका खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या कृष्ण प्रसाद गरागा आणि साई प्रतीक या जोडीने दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात त्यांनी आलर्यंडच्या जोडीचा पराभव केला.

****

No comments: