Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 25 June
2024
Time: 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· देश चालवण्यासाठी एकमताची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांचं प्रतिपादन
· १८ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला प्रारंभ-नवनिर्वाचित
खासदारांना सदस्यत्वाची शपथ
· गव्हाचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारकडून साठवणुकीवर
मर्यादा
· नीट प्रकरणात लातूरच्या जलील पठाण याला दोन जुलैपर्यंत
पोलिस कोठडी
· पुणे शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर कारवाईचे
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
आणि
· ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताचा टी-ट्वेंटी क्रिकेट
विश्वचषक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत प्रवेश
सविस्तर बातम्या
सरकार चालवण्यासाठी बहुमत
लागतं मात्र देश चालवण्यासाठी एकमताची गरज असते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. १८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला, त्यापूर्वी
संसद भवन परिसरात ते बोलत होते. देशात चांगल्या आणि योग्य विरोधी पक्षाची आवश्यकता
असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
दरम्यान, लोकसभेचं
सत्र सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी
मेहताब यांना लोकसभेचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून शपथ दिली. त्यानंतर मेहताब यांनी पंतप्रधानांसह
केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली. महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात समावेश
असलेले प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, तसंच रक्षा खडसे यांनी मराठीतून
शपथ घेतली. भाजप खासदार राधामोहनसिंह तसंच फग्गनसिंह कुलस्ते यांना तालिका अध्यक्ष
म्हणून शपथ देण्यात आली. तीन जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी
उद्या २६ जून रोजी निवडणूक होणार असून, परवा २७ तारखेपासून राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार
आहे.
****
दरम्यान, विरोधी
पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार काल लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले. काँग्रेस, तृणमूल
काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, यांच्यासह इतर पक्षाच्या खासदारांनी संविधानाची प्रत
हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
****
गव्हाचे दर स्थिर राखण्याच्या
दृष्टीनं साठेबाजी रोखण्याकरता केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या
आहेत. व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी ही मर्यादा तीन हजार टन, किरकोळ
विक्रेत्यांसाठी १० टन, तर मोठ्या साखळी समूहांच्या प्रत्येक दुकानाकरता १०
टन आणि त्यांच्या आगारांकरता ३ हजार टन इतकी ही मर्यादा आहे. सर्व राज्यं आणि केंद्रशासित
प्रदेशांमधल्या सर्व व्यापारी आणि दुकानदारांसाठी येत्या ३१ मार्च २०२५ पर्यंत ही मर्यादा
लागू राहणार आहे.
****
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या
प्रवेश पात्रतेसाठीच्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. विविध
यंत्रणांनी विविध राज्यांतून अनेक संशयितांना ताब्यात घेतलं असून, त्यांची
चौकशी सुरु आहे. दरम्यान, अतिरिक्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी ८१३ विद्यार्थ्यांनी
फेरपरीक्षा दिल्याची, तर साडेसातशे विद्यार्थी या फेरपरीक्षेला गैरहजर राहिल्याची
माहिती, राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिली आहे. या प्रकरणात लातूर इथून अटक करण्यात
आलेल्या जलील पठाण यांना दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून, अन्य दोन
शिक्षक सोलापूर जिल्हा परिषद शाळेतले संजय जाधव आणि धाराशिव जिल्ह्यात उमरगा इथले ईरण्णा
कोनगुलवार यांची कसून चौकशी सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं
आहे.
****
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन
परवा गुरुवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम
गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली काल आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी तयारीचा
आढावा घेत, आवश्यक सूचना केल्या. प्रत्येक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिवेशनासंदर्भात
केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विद्यमान १४व्या विधानसभेचं हे अखेरचं अधिवेशन
आहे.
****
राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं
कर्ज सरसकट माफ करावं, आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत, अशी मागणी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. तेलंगणा
राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं सरसकट दोन लाख रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. या पार्श्वभूमीवर
येत्या २७ तारखेला सुरु होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्ज
माफीची घोषणा करावी, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
****
पुणे शहराला अंमली पदार्थमुक्त
करण्यासाठी बेकायदेशीर पब्जवर कठोर कारवाई करावी, तसंच अमली पदार्थांशी निगडित
अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
दिले आहेत. काल यासंदर्भात आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश
कुमार यांना हे निर्देश दिले.
दरम्यान, या प्रकरणात
आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आठ जणांना अटक करण्यात आली
आहे. दोन अधिकारी आणि दोन अमलदारांवरही या प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती पुण्याचे
पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली. अंमली पदार्थ सेवनाबाबतच्या चित्रफितीत दिसणाऱ्या
मुलांचाही शोध सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
ऑनलाइन फसवणुकीच्या एका प्रकरणात
रत्नागिरी पोलिसांनी एका आरोपीला चंदिगढ मधून अटक केली. व्हॉट्सअॅप वर संदेश पाठवून, गुंतवणुकीवर
जास्त रकमेचा परतावा देण्याचं आमिष दाखवून रत्नागिरी जिल्ह्यात खेड इथल्या एका व्यक्तीची
तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. सदर आरोपीला न्यायालयानं २५
जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत काल भारताने ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला.
सेंट लुसिया इथं झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात पाच
बाद २०५ धावा केल्या. रोहित शर्मा ९२, सूर्यकुमार यादव ३१, तर शिवम दुबेनं २८ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकात सात बाद १८१ धावाच करु
शकला. कर्णधाराला साजेशी खेळी करणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला.
काल अन्य एका सामन्यात दक्षिण
आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा पराभव करत उपान्त्य फेरी गाठली.
या स्पर्धेत सध्या अफगाणिस्तान
आणि बांग्लादेश दरम्यान सामना सुरु आहे.
****
जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये होणाऱ्या
दहावी तसंच बारावी पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्यात आली
आहे. एक जुलैपर्यंत ५० रुपये प्रतिदिन अतिविलंब शुल्क, आठ जुलैपर्यंत १०० रुपये प्रतिदिन
विशेष अतिविलंब शुल्क, तर १५ जुलैपर्यत २०० रुपये प्रतिदिन अति विशेष अतिविलंब
शुल्कासह अर्ज दाखल करता येणार आहेत.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्ष
नेते अंबादास दानवे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली.
यावेळी जन सुविधा, पर्यटन, सिंचन, आरोग्य, जलयुक्त शिवार आणि शाळेच्या खोल्यांचं बांधकाम या कामांचा त्यांनी आढावा घेतला.
यात अपुरी राहिलेली कामं तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दानवे यांनी दिल्या.
****
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका
हद्दीतील अनाधिकृत भूखंड तसंच बांधकाम नियमित करण्यासाठी ३१ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ
देण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार हा निर्णय
घेण्यात आला.
दरम्यान, पावसाळ्यात
येणाऱ्या अडचणीसंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी महापालिकेनं संगणकीय प्रणाली विकसित केली
आहे. यासाठी क्यू आर कोड उपलब्ध करून दिला असून, तो स्कॅन करून गूगल अर्जावर
ही तक्रार नोंदवता येणार आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावरही हा अर्ज उपलब्ध आहे.
****
बीड जिल्ह्यात शेतात आढळणाऱ्या
गोगलगायींच्या नियंत्रणासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज असून, जिल्ह्यासाठी
चार हजार १५० किलो मेटाल्डीहाईड या कीटकनाशकाचा साठा राज्यस्तरावरून प्राप्त झाला आहे.
तालुका कृषी अधिकारी, तालुका बीज गुणन केंद्र आणि शासकीय फळरोपवाटिका याठिकाणी
हे कीटकनाशक उपलब्ध असल्याचं, कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
लातूर इथं काल रोजगाराच्या
संधींबाबत युवक-युवतींसाठी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर
घेण्यात आलं. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या या शिबिराचं शिक्षक
आमदार विक्रम काळे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं.
अडीच हजार युवक-युवतींनी या शिबीरात सहभागी होत, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ
मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
परभणी इथंही छत्रपती शाहू
महाराज युवाशक्ती करियर शिबीराला युवकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. खासदार
फौजिया खान यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिबीरात प्राचार्य विकास आडे यांच्यासह
मान्यवरांनी मार्गदर्शन केलं.
धाराशिव इथं झालेल्या या मेळाव्याला
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन
केलं. दोन हजारावर युवक-युवतींनी या मेळाव्याचा लाभ घेतला. यानिमित्ताने घेतलेल्या
रोजगार मेळाव्यात १४ कंपन्यांनी सहभाग नोंदवला, यातून ५०५ उमेदवारांची प्राथमिक
निवड करण्यात आली. युवकांना स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासासह विविध शासकीय योजनांची
माहिती देण्यासाठी १३ स्टॉल लावण्यात आले होते.
****
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या
मुलांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण महामंडळामार्फत संत भगवान बाबा ऊसतोड मुलांचं
शासकीय वसतीगृह नाळवंडी नाका इथं कार्यरत आहे. या वसतीगृहात प्रवेशाची प्रक्रिया सुरु
झाली असून, यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क करून प्रवेश अर्ज घ्यावे, असं आवाहन
बीडचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त आणि संत भगवान बाबा वसतीगृहाचे गृहपाल यांनी केलं
आहे.
****
राजर्षी छत्रपती शाहू महाराज
यांचा जन्मदिन २६ जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा होतो, यानिमित्त
नांदेड शहरात उद्या समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment