Monday, 24 June 2024

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 24.06.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२४ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

१८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरु झालं. तत्पूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरी माहताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. या अधिवेशनादरम्यान आज लोकसभा अध्यक्ष नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देतील. जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा २६ जून रोजी निवडणूक होणार असून, २७ तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे.

दरम्यान, अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, जगातली सर्वात मोठी निवडणूक शांदार झाली, ही गौरवाची बाब असल्याचं नमूद केलं. देशात चांगल्या आणि योग्य विरोधी पक्षाची आवश्यकता असून, सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं असल्याचं, पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट - युजी परिक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी बिहारमध्ये १३ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणानंतर राष्ट्रीय परिक्षा संस्था - एनटीचे महानिदेशक सुबोध कुमार सिंह यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे.

****

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात कोब्रा पथकाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला. सुरक्षा दलांचे जवान सिलगेर इथल्या छावणीतून टेकलगुडेम इथल्या छावणीच्या दिशेने जात असताना दुपारी तीनच्या सुमाराला हा स्फोट झाला.

****

शेतकऱ्यांना अधिक दरानं बियाणे आणि खते विकणं, तसंच बियाणं चोरी प्रकरणी वाशीम जिल्ह्यातल्या ११ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय कृषी विभागाच्या भरारी पथकानं घेतला आहे.

****

रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून झालेल्या अपघातात, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातल्या मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी एका मुलाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.

****s

No comments: