Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 June
2024
Time: 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· चालू आर्थिक वर्षाचा अतिरिक्त
अर्थसंकल्प विधीमंडळात सादर-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ‘अन्नपूर्णा योजना’ बळीराजा सवलत योजना तसंच युवा कार्यप्रशिक्षण
योजनेची घोषणा
· जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर
दोन कारच्या अपघातात सात जणांचा मृत्यू
· संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
आणि
· महिला कसोटी क्रिकेटमध्ये
भारताचा एकाच दिवसात ५२५ धावा करण्याचा विक्रम
सविस्तर बातम्या
चालू
आर्थिक वर्षासाठीचा सुमारे २० हजार कोटी रुपये तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे
वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. या अतिरिक्त अर्थसंकल्पात
महसूली जमा चार लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये, तर महसुली खर्च पाच लाख १९ हजार ५१४ कोटी रुपये अंदाजित
करण्यात आला आहे. महसुली तूट २० हजार ५१ कोटी रुपये तर, राजकोषीय तूट एक लाख १० हजार ३५५ कोटी रुपये इतकी
आहे.
वय
वर्ष २१ ते ६० या वयोगटातल्या पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण
योजना’, महिलांना
रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, ५२ लाख कुटुंबांना वर्षाला
तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, महिला लघुउद्योजकांसाठी
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, सरकारनं घोषित केली आहे.
वारकरी
बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळा‘ची घोषणा करण्यात आली. यावर्षीपासून
वारीतल्या मुख्य पालख्यांतल्या दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपयांचं अर्थसहाय्य दिलं
जाणार आहे.
पंढरपूरच्या
वारीसह, कोकणातली
कातळशिल्पे, दहीहंडी
उत्सव आणि गणेशोत्सवाचा प्रस्ताव जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे पाठवणार असल्याचं
पवार यांनी जाहीर केलं.
राज्यातल्या
दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन
देणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा काल करण्यात आली.
‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत
योजनेंअंतर्गत ४४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या साडे सात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या
शेतीपंपांना पूर्णत: मोफत वीज तसंच 'मागेल त्याला सौरउर्जा पंप' देण्याची योजनाही सरकारनं
जाहीर केली. नागपूर विभागात प्रायोगिक तत्वावर घेतलेली नुकसान पंचनामा प्रणाली संपूर्ण
राज्यभरात लागू करत असल्याचं पवार यांनी जाहीर केलं
या
अर्थसंकल्पात राज्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान, पाच केंद्रीय सशस्त्र दलातल्या
जवानांना व्यवसाय करातून सूट, दिव्यांग व्यक्तींसाठीच्या ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजने’च्या
पहिल्या टप्प्यात ३४ हजार ४०० घरकुलांचं बांधकाम, दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रीक वाहनांचं वाटप, गाव तिथं गोदाम योजनेच्या
पहिल्या टप्प्यात १०० नवीन गोदामांचं बांधकाम, बारी समाजासाठी ‘संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास
महामंडळा’ची स्थापना, अटल बांबू समृद्धी योजनेतून १० हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर
बांबू लागवड, किल्ले
रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन, आदी घोषणा करण्यात आल्या आहेत. संजय गांधी निराधार
अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून आता दरमहा एक हजार ऐवजी
दीड हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचं या अर्थसंकल्पातून प्रस्तावित आहे.
****
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प सर्वजनहिताय सर्वजनसुखाय असल्याचं सांगत, अजित पवार यांचं अभिनंदन केलं. माजी मुख्यमंत्री अशोक
चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा असल्याचं
सांगितलं.
काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या अर्थसंकल्पातल्या घोषणा फसव्या असल्याची टीका केली, तर माजी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी, गेल्या
दोन वर्षांत राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांची चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर
करावी, अशी
महाविकास आघाडीची मागणी असल्याचं सांगितलं...
Byte…
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले. आपल्या सरकारने आर्थिक तरतूद करूनच
सर्व योजना राबवल्याचं सांगत, आजवर राबवलेल्या योजनांची पडताळणी करून घेण्याचं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं..
Byte…
****
मराठवाडा
असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - मसिआ संघटनेचे अध्यक्ष चेतन
राऊत यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. यामध्ये जाहीर केलेल्या मुख्यमंत्री युवा
कार्यप्रशिक्षण योजनेमुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला...
Byte…
****
या बातम्या आकाशवाणीच्याs छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि
दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
राष्ट्रीय
परीक्षा परिषद - एनटीएनं रद्द आणि स्थगित केलेल्या परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा
केली आहे. यूजीसी नेट जून २०२४ परीक्षा आता २१ ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान होणार
आहे. तर संयुक्त सीएसआयआर यूजीसी नेट २०२४ परीक्षा २५ ते २७ जुलै दरम्यान होणार आहे.
****
नागपूर
- मुंबई समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात कडवंची गावाजवळ दोन कारच्या अपघातात सात
जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. काल रात्रीच्या सुमारास झालेल्या
या भीषण अपघातात दोन्ही गाड्या महामार्गाचे कठडे तोडून खाली पडल्या. अपघातातल्या जखमींना
जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
संत
एकनाथ महाराजांच्या पालखीने काल आषाढी वारीसाठी पैठणहून पंढरपूरकडे प्रस्थान केलं.
बीड, अहमदनगर
आणि सोलापूर जिल्ह्यातून मार्गस्थ होत, ही पालखी १६ जुलैला पंढरपुरात दाखल होईल.
देहू
इथल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीनेही काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. संत ज्ञानेश्वर
महाराजांची पालखी आज आळंदीहून प्रस्थान ठेवणार आहे.
दरम्यान, मुक्ताईनगरहून निघालेली
संत मुक्ताबाईंची पालखी आज जालना इथल्या पांजरपोळ गोशाळेतला मुक्काम आटोपून तर शेगावच्या
संत गजानन महाराजांची पालखी आज परभणी जिल्ह्यातल्या दैठणा मुक्कामाहून पंढरपूरकडे मार्गस्थ
होईल.
****
महिला
क्रिकेटमध्ये, भारत
आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चेन्नईत सुरु झालेल्या कसोटी सामन्याच्या कालच्या पहिल्या
दिवशी भारतानं, एकाच
दिवसात ५२५ धावा करण्याचा विक्रम नोंदवला. स्मृती मंधानानं शतक, तर शेफाली वर्मानं द्विशतक
झळकावलं. कालचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या ४ बाद ५२५ धावा झाल्या होत्या. कर्णधार
हरमनप्रीत ४२, तर
रिचा घोष ४३ धावांवर खेळत होत्या.
दरम्यान, टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सामना होणार आहे. भारतीय
वेळेनुसार रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
धाराशिव
इथं येत्या दहा ते अकरा जुलै दरम्यान जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा
आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागासाठी जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त शाळा
आणि महाविद्यालयांच्या संघांनी येत्या आठ जुलैपर्यंत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या
संकेतस्थळावर अर्ज करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
अखिल
भारतीय किसान सभा या संघटनेनं काल बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
केलं. रब्बी आणि खरीप पिकांचा पीक विमा त्वरित वितरित करण्यात यावा आणि विनाअट संपूर्ण
कर्जमाफी करावी, या मागण्यांसाठी हे आंदोलन केल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
धाराशिव
नगरपालिकेतल्या विविध विकासकामांच्या अंमलबजावणीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित
घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथक - एस आय टी मार्फत चौकशीचे आदेश शासनानं दिले आहेत.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या
उत्तरात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
****
अविनाश
पाठक यांनी काल बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडून
स्वीकारला. पाठक यांच्याकड असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार
संगीता देवी पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
****
महाराजस्व
अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या जानवळ इथल्या जनार्धनराव राजेमाने
आश्रमशाळेत शैक्षणिक प्रमाणपत्राचं काल वाटप करण्यात आलं. तहसीलदार नरसिंग जाधव यांच्या
उपस्थितीत १५० विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेचे विविध ग्रंथ पुरस्कार आज वितरित करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर
इथं परिषदेच्या सभागृहात संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
No comments:
Post a Comment