Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
· लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या
निवडणूक-एनडीएच्या ओम बिर्लांना काँग्रेसच्या के. सुरेश यांचं आव्हान
· विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या
११ जागांसाठी आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात
· अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना
पीक कर्ज देताना हात आखडता घेऊ नये-मुख्यमंत्र्यांची बँकांना सूचना
आणि
· टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या
उपांत्य फेरीच्या लढतींचं चित्र स्पष्ट-भारताचा इंग्लंडशी तर दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानशी
सामना
****
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी उद्या
निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं या पदासाठी माजी अध्यक्ष ओम बिर्ला यांना
पुन्हा संधी दिली आहे. आज त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. विरोधी पक्षांकडून काँग्रेस
खासदार के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत लोकसभेचे
अध्यक्ष एकमतानं नियुक्त झाले आहेत. यंदा प्रथमच या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता
आहे. सदनाचा अध्यक्ष एकमतानं निवडला जावा, यासाठी सरकारनं विरोधकांशी चर्चा
केली, मात्र विरोधकांनी उपाध्यक्षपदाच्या
उमेदवाराचं नाव जाहीर करण्याची मागणी केली. मात्र हे नाव योग्य वेळी जाहीर करू असं
सत्ताधारी पक्षानं सांगितल्यामुळे अध्यक्षपदासाठी एकमतानं निवड होऊ शकली नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात
नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ देण्याची कार्यवाही आज दुसऱ्या दिवशी पूर्ण
झाल्याचं, कार्यवाहक अध्यक्ष भर्तृहरी
मेहताब यांनी जाहीर केलं. आज महाराष्ट्रातले काँग्रेस खासदार गोवाल पाडवी, श्यामकुमार बर्वे, बळवंत वानखेडे, शोभा बच्छाव, भाजपाचे खासदार अनुप धोत्रे, स्मिता वाघ, शिवसेनेचे संदिपान भुमरे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, डॉ अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, अमर काळे, भास्कर भगरे, सुरेश म्हात्रे, नीलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांनी
आज शपथ घेतली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, काल २६६ खासदारांनी शपथ घेतली होती.
दरम्यान, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती
जगदीप धनखड यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा अजित पवार
यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
****
विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या
११ जागांसाठी आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी २ जुलैला दुपारी
४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून ३ जुलैला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी
अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जुलै पर्यंत आहे. १२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात
मतदान होणार आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता
पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. पक्षाचे नेते शरद
पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. आगामी काळात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी आपण शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं सूर्यकांता
पाटील म्हणाल्या. तर शरद पवार यांनी, यावेळी बोलतांना, पाटील यांनी सामाजिक हिताचा राजकीय
निर्णय योग्य वेळी घेतल्याची सांगितले.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
यांना जामीन देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं आज स्थगित
केला. केजरीवाल यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या याबाबतच्या निर्णयाला आव्हान देणारी
याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्थगित करत, याप्रकरणी उद्या बुधवारी सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे.
****
१९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या
राजकीय आणीबाणीविरोधात लढा देणाऱ्या सर्व नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज आदरांजली वाहिली. सर्व भारतीयांसाठी सन्माननीय असणाऱ्या संविधानाला अपमानित करत
काँग्रेसनं जनतेच्या मूलभूत स्वातंत्र्याचं हनन केलं होतं, याची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या
एका संदेशात म्हटलं आहे.
****
अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना
पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केली आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३व्या बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते.
पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना 'सिबील स्कोअर'ची सक्ती केली जाऊ नये आणि राज्यातल्या
जिल्हा सहकारी बँका तसंच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचं बळकटीकरण करण्याला प्राधान्य
दिलं जावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात
आला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज खरीप हंगामाची
आढावा बैठक घेतली. राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे
वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
****
राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण
ठरलेल्या विविध प्रकल्पांतल्या प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणं
‘आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागानं तातडीनं ताब्यात घ्यावीत, या पुनर्वसित गावठाणांच्या विकासासाठी
आवश्यक असणारा अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी केली आहे. सह्याद्री अतिथीगृहात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
दरड कोसळून तसंच भूस्खलनामुळे पूर्णपणे
गाडल्या गेलेल्या वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे आणि गावांमधल्या बाधितांनाही प्रकल्पग्रस्तांचा दर्जा
देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. याशिवाय, बीड जिल्ह्यातल्या गुणवंती पाटबंधारे
प्रकल्पातल्या सुकळी इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव, खास बाब म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत
सादर करण्याच्या निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या विभागीय
आयुक्तपदी दिलीप गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावडे २००७ च्या बॅचचे आयएएस
अधिकारी आहेत. मधुकर राजे आर्दड सेवानिवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या
उपांत्य फेरीच्या लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. परवा गुरुवारी सकाळी पहिला सामना
दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघात तर याच दिवशी रात्री दुसरा सामना भारत आणि
इंग्लंड संघात होणार आहे.
दरम्यान, आज सकाळी सेंट विन्सेंट इथं झालेल्या
अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्ताननं बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमाच्याआधारे पराभूत
केलं. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात
आलं आहे.
****
जालना जिल्हा क्रीडा संकुलात सध्या
सुरु असलेली विविध क्रीडा प्रकारांच्या पायाभूत सुविधांची कामं जलदगतीने पूर्ण करण्याचे
निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात
झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा क्रीडा संकुलातल्या विविध विकास कामांचा पालकमंत्र्यांनी
यावेळी आढावा घेतला.
****
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यातल्या
चौदा वसतिगृहांमध्ये इयत्ता अकरावीपासून पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नि:शुल्क
प्रवेश दिला जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांच्या
मुला-मुलींच्या वसतीगृहांची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना लातूरच्या जिल्हाधिकारी
वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समाज कल्याण विभागाच्या
विविध समितींच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यातले ऊसतोड कामगार आणि त्यांच्या
पाल्यांची माहिती तातडीनं संकलित करून त्यांची नोंदणी करून घ्यावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य
कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दर महिन्याच्या २५ तारखेला, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमध्ये
स्वच्छता मोहीम राबवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आज या मोहिमेचा मुख्यालयातून
शुभारंभ करण्यात आला. करनवाल यांनी यावेळी स्वत: परिसराची स्वच्छता केली.
****
आजच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना
जिल्ह्यातल्या राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविकांनी
हजेरी लावली. पोलीस प्रशासनानं मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
उद्या सव्वीस जूनला छत्रपती राजर्षी
शाहू महाराज यांची दीडशेवी जयंती आहे. या दिनाच्या औचित्यानं राष्ट्रवादी काँग्रेस
पक्ष उद्यापासून येत्या एक जुलैपर्यंत छत्रपती शाहू महाराजांचा जन्मोत्सव साजरा करणार
आहे. यामध्ये येत्या तीस तारखेला रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथे सामाजिक सलोखा परिषदेचं
आयोजन करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment