Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
· चालू आर्थिक वर्षासाठीचा सुमारे
२० हजार कोटी रुपये तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्यविधीमंडळात सादर
· मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ‘अन्नपूर्णा योजना’ बळीराजा सवलत योजना तसंच युवा कार्यप्रशिक्षण योजनेची
घोषणा
· सरकारच्या विविध योजनांच्या
अंमलबजावणीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करण्याची महाविकास आघाडीची मागणी
· धाराशिव नगरपालिका घोटाळ्याप्रकरणी
एस आय टी चौकशीचे राज्यशासनाचे आदेश
आणि
· जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या
पालखीचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
****
चालू आर्थिक वर्षासाठीचा सुमारे
२० हजार कोटी रुपये तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि
नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण
खर्चासाठी सहा लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, महसूली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी
रुपये तर महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी रुपये अंदाजित
करण्यात आला आहे. महसुली तूट २० हजार ५१ कोटी रुपये तर, राजकोषीय तूट १ लाख १० हजार ३५५
कोटी रुपये इतकी आहे.
वय वर्षे २१ ते ६० वयोगटातल्या पात्र महिलांना
प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक
मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, ५२ लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी
‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’, महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप
योजना’, लघुउद्योजक महिलांना पंधरा
लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजाचा परतावा देण्याची योजना सरकारनं घोषित केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित
कर राज्यभरात समान करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई तसंच ठाणे महानगरपालिका
क्षेत्रातले सर्वसामान्य नागरिक तसंच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार
आहे.
वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री
वारकरी संप्रदाय महामंडळा’ची घोषणा यात करण्यात आली. तसंच, जागतिक नामांकनासाठी पंढरपूरच्या
वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्याची घोषणाही यात करण्यात आली आहे.
राज्यातल्या दहा लाख युवकांना प्रत्यक्ष
कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या ‘मुख्यमंत्री
युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा करण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनें’
अंतर्गत राज्यातल्या ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा आणि दूधउत्पादक शेतकऱ्यांना
प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची तरतूद केल्याचं पवार यांनीं सांगितलं.
नागपूर विभागात प्रायोगिक तत्वावर
घेतलेली पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यभरात लागू करत असल्याचं अजित पवार यांनी जाहीर
केलं –
राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ तर १,०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश
परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, तिथे विविध सवलती लागू करण्यात
आल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागामध्ये घेतली
गेलेली पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ती प्रणाली आता संपूर्ण राज्यात लागू
करण्यात येणार आहे.
अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात
पाच केंद्रीय सशस्त्र दलातल्या जवानांना व्यवसाय करातून सूट दिली आहे. अंदाजे बारा
हजार जवानांना या निर्णयाचा लाभ होईल.
दिव्यांग व्यक्तींसाठीच्या ‘धर्मवीर
आनंद दिघे घरकुल योजने’च्या पहिल्या टप्प्यात ३४ हजार ४०० घरकुल बांधण्याची तसंच दिव्यांग
व्यक्तींना इलेक्ट्रीक वाहनांचं वाटप करण्याची घोषणा यात करण्यात आली आहे.
बारी समाजासाठी ‘संत श्री रूपलाल
महाराज आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करण्याची तसंच स्वराज्याची राजधानी किल्ले
रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात
आली आहे.
दरम्यान, या योजनांसाठी पुढच्या महिन्यात
पुरवणी मागण्यांमध्येही तरतुदी केल्या जातील, असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत
सांगितलं. राज्याच्या वस्तु आणि सेवा कर वसुलीत यंदा सुमारे सोळा टक्के वाढ झाली, त्यामुळे केंद्राकडून मिळणाऱ्या
राज्याच्या कर हिश्श्यातही वाढ होण्याची अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
या अर्थसंकल्पाचं स्वागत करत, अजित पवार यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले –
अतिशय प्रगतीशील, सर्वसमावेशक, सर्वजन हिताय, सर्वजन
सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे. आणि विशेषतः शेतकरी, महिला,
युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी
हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा असल्याची
प्रतिक्रिया दिली आहे.
या अर्थसंकल्पातल्या घोषणा फसव्या
असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा महापूर असल्याची टीका केली. सरकारने गेल्या दोन वर्षांत जाहीर
केलेल्या योजनांची चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी महाविकास आघाडीची मागणी असल्याचं
त्यांनी सांगितलं –
अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही
तसा उल्लेख नाहीये. माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे,
की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या, गेल्या दोन वर्षात, त्यापैकी खरोखर किती
अंमलात आल्या, याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका
जाहीर करावी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र
सर्व आरोप फेटाळून लावत, आर्थिक तरतूद करूनच सर्व योजना राबवल्याचं, तसंच आजवर राबवलेल्या योजनांची पडताळणी
करून घेण्याचं आवाहन विरोधकांना केलं –
हे सरकार दिलेला शब्द पाळणारं आहे. आतापर्यंत हे सरकार
जे जे बोललं, ते ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात पैशाची
तरतूद करून या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील. आणि शेतकऱ्यांना
काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो पंचेचाळीस हजार कोटी रूपये शेतकऱ्यांना
देणारं हे आमचं सरकार आहे. हिशोब पाहिजे तर त्यांनी घ्यावा आणि टॅली करावा.
****
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल
इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - मसिआ संघटनेचे अध्यक्ष चेतन राऊत यांनी या अर्थसंकल्पाचं
स्वागत केलं. यामध्ये जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’मुळे उद्योगांना
कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला –
स्कील डेव्हलपमेंटसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण
योजना जी आहे, चांगली योजना आहे. दरवर्षी दहा लाख लोकांना ते प्रशिक्षण देणार आणि महिन्याला
दहा हजार रूपये पर पर्सन ते मानधन देणार आहेत. ती एक योजना चांगली आहे. त्यामुळे स्कील
फुल वर्कफोर्स थोडाफार इंडस्ट्रीला ॲव्हेलेबल होईल. तो एक फायदा आहे.
****
कुठल्याही पब मध्ये वय न तपासता
प्रवेश दिला तर पबचा परवाना रद्द करण्यासोबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची
माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज विधान परिषदेत
आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. पुण्यातल्या, अशा अटींचं उल्लंघन केलेल्या पबचा
परवाना रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धाराशिव नगरपालिकेतल्या विविध विकासकामांच्या
अंमलबजावणीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथक - एस
आय टी स्थापन करून प्रकरणांचा तपास करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र शासनानं पोलीस
महासंचालकांना दिले आहेत. या संदर्भात विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात
तारांकित प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी
दिलेल्या आश्वासनानुसार हे आदेश शासनानं दिले आहेत.
****
देहू इथल्या संत तुकाराम महाराजांच्या
पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलं. पालखीचा मुक्काम आज देहूतल्या
इनामदार वाड्यात राहणार आहे. या पालखीसाठी हजारोंच्या संख्येनं दाखल झालेल्या भाविकांच्या
ग्यानबा तुकाराम गजरानं अवघी देहू नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. तुकोबांच्या वारीचं
यंदाचं हे तीनशे एकोणचाळीसावं वर्ष आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी
उद्या आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
****
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून
निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी आणि पालखीचं आज नाशिक जिल्ह्यातून
अहमदनगर जिल्ह्यात आगमन झालं.
****
No comments:
Post a Comment