Monday, 24 June 2024

TEXT-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.06.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 June 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ जून २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      १८ व्या लोकसभेच्या अधिवेशनाला प्रारंभ-नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ

·      देश चालवण्यासाठी एकमताची गरज असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      गव्हाचे दर स्थिर राखण्यासाठी केंद्र सरकारकडून साठवणुकीवर मर्यादा

·      पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

आणि

·      टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना

****

१८ व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनं सुरु झालं. लोकसभेचे कार्यवाहक अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

एच. डी. कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, धर्मेंद्र प्रधान, जुएल ओराम, सर्वानंद सोनोवाल, के. राम मोहन नायडू, जी किशन रेड्डी, सी आर पाटील, डॉ. जितेन्‍द्र सिंह, सुरेश गोपी, सुकांता मुजूमदार आदी मान्यवरांनी आपापल्या मातृभाषेतून, दुर्गादास उके तसंच बासुरी स्वराज यांनी संस्कृतमधून सदस्यत्वाची शपथ घेतली.

महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात समावेश असलेले प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, तसंच रक्षा खडसे यांनी मराठीतून शपथ घेतली.

भाजप खासदार राधामोहनसिंह तसंच फग्गनसिंह कुलस्ते यांना तालिका अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली.

 

दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजपचे ज्येष्ठ खासदार भर्तृहरी मेहताब यांना लोकसभेचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून शपथ दिली. तीन जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा २६ जून रोजी निवडणूक होणार असून, २७ तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे.

****

दरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार आज लोकसभेत संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम यांच्यासह इतर पक्षाच्या खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

****

सरकार चालवण्यासाठी बहुमत लागतं मात्र देश चालवण्यासाठी एकमताची गरज असते, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या १० वर्षात आपल्या सरकारने सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चांगल्या आणि योग्य विरोधी पक्षाची आवश्यकता असून, यापुढेही सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं असल्याचं, पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

****

गव्हाचे दर स्थिर राखण्याच्या दृष्टीनं साठेबाजी रोखण्याकरता केंद्र सरकारनं गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घातल्या आहेत. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव संजीव चोप्रा यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. त्यानुसार व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांसाठी ही मर्यादा ३ हजार टन, किरकोळ विक्रेत्यांसाठी १० टन, तर मोठ्या साखळी समूहांच्या प्रत्येक दुकानाकरता १० टन आणि त्यांच्या आगारांकरता ३ हजार टन इतकी ही मर्यादा आहे. सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या सर्व व्यापारी आणि दुकानदारांसाठी येत्या ३१ मार्च २०२५ पर्यंत ही मर्यादा लागू राहील, असं चोप्रा यांनी सांगितलं. गव्हाचे दर स्थिर रहावेत यासाठी सरकार गरजेनुसार या साठा मर्यादेचा आढावा घेईल, असं ते यावेळी म्हणाले.

****

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेसाठीच्या नीट-यूजी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. विविध यंत्रणांनी विविध राज्यांतून अनेक संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. यामध्ये लातूर इथून अटक केलेल्या दोन शिक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, अतिरिक्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल झाली. एकंदर ८१३ विद्यार्थ्यांनी ही फेरपरीक्षा दिल्याची, तर साडेसातशे विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिली आहे.

****

१२व्या पारपत्र दिनानिमित्त परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पारपत्र कार्यालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागरिकांना पारपत्र सेवा विश्वासार्ह आणि वक्तशीर मिळावी याकरता पारपत्र कार्यालयं करत असलेल्या प्रयत्नांचं त्यांनी कौतूक केलं. नागरिकांना देशात आणि देशाबाहेरही सुलभपणे पारपत्रं मिळावी याकरता डिजीलॉकर, पासपोर्ट पोलीस ॲप अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचंही जयशंकर यांनी सांगितलं.

****

यंदाच्या हज यात्रेदरम्यान तेराशे यात्रेकरुंचा उष्णतेच्या संबंधीत विविध कारणांनी मृत्यू झाला. सौदी अरबस्तानाकडून ही माहिती देण्यात आली. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक लोक वयोवृद्ध तसंच सहव्याधी असलेले होते, मात्र बहुतांश मृत्यू उष्णतेमुळेच झाल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.

****

पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ८ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित चित्रफितीत दिसणाऱ्या मुलांचा पुणे पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन अंमलदारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पुण्याचे पोलिस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणी राज्यसरकार तसंच पोलिस प्रशासनावर टीका केली आहे. गेली काही वर्षे पुण्यात गुन्हेगारीने उच्चांक गाठल्याचं, त्यांनी सामाजिक माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सेंट लूसिया इथल्या डॅरेन सॅमी मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ८ वाजता हा सामना सुरू होईल. सुपर ८ मध्ये भारतानं आत्तापर्यंत अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांचा पराभव केला आहे. दरम्यान, आज सकाळी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुइस पद्धतीनं दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडीजवर मात केली.

****

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. यावेळी जन सुविधा, पर्यटन, सिंचन, आरोग्य, जलयुक्त शिवार आणि शाळेच्या खोल्यांचे बांधकाम या कामांचा त्यांनी आढावा घेतला. यात अपुरी राहिलेली कामं तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दानवे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नगरपरिषदांच्या मुख्य अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या बैठकीत बोलतांना, नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ग्रामपंचायती आणि नगरपरिषदेचं उत्पन्न वाढवावं, तसंच पावसाळा लक्षात घेऊन वृक्ष लागवडीवर भर द्यावा अशा सूचनाही यावेळी स्वामी यांनी केल्या. या बैठकीला वैजापूर, सिल्लोड, कन्नड, पैठण, गंगापूर, खुलताबाद या नगरपरिषदेचे तसंच फुलंब्री, सोयगाव या नगर पंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

****

बीड जिल्ह्यात शेतात आढळणाऱ्या गोगलगायींच्या नियंत्रणासाठी जिल्हा कृषी विभाग सज्ज असून जिल्ह्यासाठी ४ हजार १५० किलो मेटाल्डीहाईड या कीटकनाशकाचा साठा राज्यस्तरावरून प्राप्त झाला आहे. गरजू शेतकऱ्यांसाठी सदरील कीटकनाशक संबंधित तालुका कृषी अधिकारी तसंच नजीकचे तालुका बीज गुणन केंद्र आणि शासकीय फळरोपवाटिका याठिकाणी उपलब्ध असल्याचं, कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

****

लातुर इथं आज, भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत युवक-युवतींना मार्गदर्शन करण्यासाठी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबीर घेण्यात आलं. यावेळी या शिबिरात सहभाग नोंदवलेल्या अंदाजे अडीच हजार युवक-युवतींना विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दहावी बारावी नंतर प्रत्येकानं आपल्यातील क्षमता ओळखून आपल्या ध्येयाकडं आत्मविश्वासानं वाटचाल करावी, असं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केलं. तर या शिबीराची विद्यार्थ्यांना आपल्या भविष्यातील योग्य करिअरची दिशा निवडण्यासाठी मदत होईल, असं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण महामंडळामार्फत संत भगवान बाबा ऊसतोड मुलांचे शासकीय वसतीगृह नाळवंडी नाका इथं कार्यरत आहे. या वसतीगृहात प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली असून यासाठी इच्छुकांनी त्वरित संपर्क करून प्रवेश अर्ज घ्यावे, असं आवाहन बीडचे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त आणि संत भगवान बाबा वसतीगृहाचे गृहपाल यांनी केलं आहे.

****

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जून या सामाजिक न्याय दिनानिमित्त नांदेड शहरात समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे.

**** 

No comments: