Thursday, 27 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 27.06.2024 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 27 June 2024

Time: 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या 

·      राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात 

·      राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल - मुख्यमंत्र्यांचं सुतोवाच, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

·      विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणारं शुल्क कमी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      छत्रपती संभाजीनगर इथं स्थापन अल्पसंख्याक आयुक्तालयाचं, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते उद्घाटन

आणि

·      टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपान्त्य फेरीत आज भारताची इंग्लंडशी लढत

सविस्तर बातम्या

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात पाच विधेयकं प्रस्तावित असून, उद्या २८ जून रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. दोन अध्यादेशही सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार आहेत. गेल्या अधिवेशनात विधान परिषदेत एक प्रलंबित विधेयक तसंच संयुक्त समितीकडे सहा विधेयकं प्रलंबित असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्याचा आगामी अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवक यांच्यासह सर्व जनतेच्या भल्याचा असेल, असं सुतोवाच केलं.  राज्यातल्या सर्व मुद्द्यांवर सरकार विरोधकांशी चर्चेला तयार आहे. पण विरोधकांना फक्त जनतेची दिशाभूल करायची असल्याने, ते चर्चेला तयार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाडा वॉटर ग्रीड तसंच जलयुक्त शिवार या दोन्ही योजना पुन्हा सुरू करण्यासह, गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधानांविरोधात खोटं नॅरेटिव्ह तयार करूनही काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत देशभरातून शंभर जागाही मिळवता आल्या नसल्याचं सांगत, खोटी आकडेवारी देऊन क्षणिक आनंद मिळू शकेल, मात्र जनतेची फसवणूक करता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

दरम्यान, सरकारच्या कालच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी बोलतांना, नीट प्रमाणेच इतर परीक्षा आणि भरती प्रक्रियेतही गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप केला. जीएसटी परिषदेच्या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीवरूनही दानवे यांनी टीका केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल माफी करावी अशी मागणी या अधिवेशनात करणार असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

****

विधवा महिलांना वारसा प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणारं शुल्क कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. पतीच्या मृत्यपश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून घ्याव्या लागणाऱ्या वारसा प्रमाणपत्रासाठी आकारण्यात येणारं ७५ हजार रुपयांचं शुल्क कमी करून आता ते १० हजार रुपये करण्यात येणार आहे. सर्वच उत्पन्न गटातल्या महिलांना ही सवलत लागू होईल.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्पात तीन हजार ९०९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून ३१० मिलियन डॉलर्सचं कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १० हजार किलोमीटर रस्त्यांचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे.

पुणे रिंग रोड पूर्व प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी पाच हजार ५०० कोटी हडकोकडून कर्जरुपाने घेण्यास मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. या प्रकल्पासाठी आतापर्यंत ५३५ हेक्टरहून अधिक जमिनीचं भूसंपादन झालं आहे.

****

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी काल मतदान झालं. मुंबई पदवीधर मतदार संघात ५६ टक्के, मुंबई शिक्षक मतदार संघात ७५ टक्के, कोकण पदवीधर मतदार संघात ६३ टक्के, तर नाशिक शिक्षक मतदार संघात सरासरी ९३ पूर्णांक ४८ शतांश टक्के मतदान झालं. मतमोजणी एक जुलैला होणार आहे.

दरम्यान, विधान परिषदेतला कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या सदस्यांना आज दुपारी विधिमंडळातल्या मध्यवर्ती सभागृहात समारंभपूवर्क निरोप दिला जाणार आहे.

****

संसदेच्या दोन्ही सदनांच्या संयुक्त बैठकीसमोर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे. राज्यसभेच्या चालू अधिवेशनातल्या सत्रालाही आजपासून प्रारंभ होत आहे.

दरम्यान, अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची काल आवाजी मतदानाने निवड झाली. बिर्ला यांच्या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना अध्यक्षांच्या आसनापर्यंत नेलं. उभय नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष म्हणून सेवेची संधी दिल्याबद्दल ओम बिर्ला यांनी सदनाचे आभार मानले.

****

छत्रपती संभाजीनगर इथं स्थापन अल्पसंख्याक आयुक्तालयाचं, अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. देशात पहिलंच असलेलं हे आयुक्तालय अल्पसंख्यांक समाजातल्या व्यक्तींच्या शिक्षण, रोजगारासह सर्वांगिण विकासासाठी कार्य करेल, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. समाजाच्या विविध घटकातल्या लोकांसाठी विविध विकास योजनांची अंमलबजावणी तसंच पाठपुरावा करणं यामुळे सुलभ होणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, हज हाऊस परिसरात हे आयुक्तालय स्थापन करू नये, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या लातूर इथल्या दोन आरोपी शिक्षकांकडे ज्या १२ विद्यार्थ्यांची हॉलतिकीट सापडली आहेत, त्यातल्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या आमिषाला बळी पडत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरोपींसोबत आर्थिक व्यवहार केल्याची माहितीही समोर येत आहे.

दरम्यान, या प्रकरणातले चार पैकी दोन संशयित आरोपी अद्यापही फरार आहेत. दिल्ली इथल्या गंगाधर नामक संशयितांच्या शोधासाठी लातूर पोलिसांचं एक पथक उत्तराखंड मधील देहराडून इथं गेलं आहे. 

या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी कातपुर इथल्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक जलीलखान पठाण याला, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी निलंबित केलं आहे.

****

नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपासणी पथकानं बीड इथं काही जणांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजलगाव तालुक्यातल्या काही शिक्षकांचा समावेश असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राजर्षी शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती, काल विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी झाली.

छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

नांदेड तसंच लातूर शहरातून समाज कल्याण विभागाच्यावतीनं समता दिंडी काढण्यात आली.

धाराशिव इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा दिला. तसंच शहरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीच्या वतीने रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम घेण्यात आले.

****

आषाढी वारीसाठी शेगाव इथून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी काल परभणी जिल्ह्यात दाखल झाली. या पालखी सोहळ्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. आज सकाळी पालखी परभणी शहराकडे प्रस्थान करणार असून, शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे.

****

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात काल तीन महिलांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. चकलांबा परिसरात सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत एक महिला गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****

टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत त्रिनिदाद इथं सुरु असलेल्या पहिल्या उपान्त्य सामन्यात अफगाणिस्तानचा संघ अवघ्या ५६ धावात सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी ५७ धावांची आवश्यकता आहे.

दरम्यान, या स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. गयाना इथं होणाऱ्या या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरुवात होणार आहे.

****

किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक समानतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी धाराशिव जिल्हा प्रशासन आणि युनिसेफने लैंगिक समानता परिवर्तन कार्यक्रमाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात ८ ते १६ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी खेळ-आधारित लैंगिक समानता परिवर्तनात्मक कार्यक्रम राबवण्यात आला. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये, “मीना राजू मंच” कार्यक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतच्या वर्गांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

****

जप्त केलेला ट्रॅक्टर सोडण्यासाठी १५ हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराला धाराशिव जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल अटक केली. प्रकाश चाफेकर असं या हवालदाराचं नाव असून, तो येरमाळा पोलीस ठाण्यात नियुक्त आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...