Monday, 24 June 2024

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:24.06.2024 रोजीचे दुपारी: 01.00, वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 24 June 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २४ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आज नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीनं सुरु झालं. लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी माहताब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाजप खासदार भर्तृहरी माहताब यांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. तीन जुलै पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात लोकसभा अध्यक्षपदासाठी परवा २६ जून रोजी निवडणूक होणार असून, २७ तारखेला राज्यसभेचं अधिवेशन सुरु होणार आहे.

****

दरम्यान, विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे खासदार आज संसदेत संविधानाची प्रत घेऊन आले. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रविड मुनेत्र कळघम, यांच्यासह इतर पक्षाच्या खासदारांनी संविधानाची प्रत हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

****

सरकार चालवण्यासाठी बहुमत लागतं मात्र देश चालवण्यासाठी एकतेची गरज असते, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. ते आज अधिवेशनापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या १० वर्षात आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले. जगातली सर्वात मोठी निवडणूक शानदार झाली, ही गौरवाची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. देशात चांगल्या आणि योग्य विरोधी पक्षाची आवश्यकता असून, यापुढेही सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला काम करायचं असल्याचं, पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

यंदाच्या हज यात्रेदरमयान तेराशे यात्रेकरुंचा उष्णतेच्या संबंधीत विविध कारणांने मृत्यू झाल्याचं, सौदी अरेबियानं सांगितलं आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक लोक वयोवृद्ध तसंच सहव्याधी असलेले होते, मात्र बहुतांश मृत्यू उष्णतेच्या लाटेमुळेच झाले असल्याचं, त्यांच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे.

****

सौरउर्जा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यानं साखर कारखान्यांनी सौरउर्जा निर्मिती प्रकल्प राबवण्याबाबत विचार करण्यासंबंधीच्या सूचना, साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागातले साखर कारखाने हरित उर्जा तयार करणारे मोठे स्त्रोत आहेत, हरित हायड्रोजन निर्मितीसाठी कारखान्यांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. हरित उर्जा, सौर उर्जेद्वारे तयार केल्यास ती वर्षभर मिळू शकते, असंही खेमनार यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या मधुमित्र पुरस्कारासाठी, अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातल्या अंबड इथले शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशापालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून, मधमाशांची भुमिका महत्वाची असल्यानं, या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावं हा या पुरस्काराचा प्रमुख उद्देश आहे. उद्या २५ जूनला पुण्यात या पुरस्काराचं वितरण होणार आहे.

****

विधवा महिलांना सन्मान दिला पाहिजे, तसंच महिलांनी स्वावलंबी होऊन कुटुंबाला देखील आधार दिला पाहिजे, असं मत काल नाशिक इथं आयोजित विधवा मेळाव्यात व्यक्त करण्यात आलं. जागतिक विधवा महिला दिनाच्या निमित्तानं नाशिकच्या रुंग्टा महाविद्यालयात हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विधवा महिलांच्या विविध प्रश्न आणि समस्यांवर मंथन करण्यात येऊन त्यातून मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक विधवा महिलांनी आपल्या समस्या मांडल्या.

****


छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी समांतर जल वाहिनी च्या कामाचा राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी काल प्रत्यक्ष कामाचा ठिकाणी जाऊन आढावा घेतला. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सुचना सावे यांनी संबंघित अधिकाऱ्यांना दिल्या.

****

टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर एट फेरीच्या गट एकमध्ये गुणांकनानुसार पहिल्या स्थावर असलेल्या भारताचा आज ऑस्ट्रेलियासोबत सामना होणार आहे. सेंट लुसिया इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल.

दरम्यान, या स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे तीन गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या संघानं निर्धारित षटकात आठ बाद १३५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे १७ षटकात १२४ धावांचं आव्हान देण्यात आलं, ते या संघाने पाच चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं.

****

धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातल्या चिमठाणे आणि दुसाणे मंडळात काल रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे या मंडळातल्या अनेक गावांमध्ये शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं. अनेक ठिकाणी पशुधन दगावल्याचं देखील वृत्त आहे. दराणे, रोहाणे गावातून वाहनाऱ्या पाटली नाल्याला मोठा पूर आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

No comments: