Wednesday, 26 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 26.06.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२६ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं या पदासाठी माजी अध्यक्ष ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली असून, विरोधी पक्षांकडून काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या पक्षाच्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे.

****

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल. या मतांची मोजणी एक जुलै रोजी होणार आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात आठ, कोकण पदवीधरमध्ये १३, नाशिक शिक्षकमध्ये २१ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत.

****

राजर्षी शाहू महाराज यांची १५०वी जयंती आज साजरी होत आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. त्यांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू   महाराजांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे.

कोल्हापूर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मी विलास पॅलेस इथल्या शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपासणी पथकानं बीड इथं काही जणांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजलगाव तालुक्यातल्या काही शिक्षकांचा समावेश असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात काल बैठक झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातले नेते या बैठकीला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या राज्यातल्या कामगिरीविषयी खर्गे यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आणि मतदारांचे आभार मानले.

****

No comments: