Friday, 28 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.06.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 28 June 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २८ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेसासाठीच्या नीट परिक्षेतल्या गैरव्यवहाराच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परिक्षेप्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढील कामकाज पुकारल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.

राज्यसभेतही विरोधकांनी नीट प्रकरणी चर्चेची मागणी लाऊन धरली. काही सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केल्यानं सभापती जगदीप धनखड यांनी सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु झाली.  

****

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलै पर्यंत मदत देऊ असं आश्वासन राज्य सरकारने आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. अवकाळीमुळे राज्यातल्या दोन लाख ९१ हजाराहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देणार याचा आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर उपग्रहाद्वारे पाहणी करण्याऱ्या एन डी व्ही आय प्रणालीद्वारे नुकसानीचं मोजमाप होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी मागणी करतील तेवढा निधी मंजूर केला जाईल, असं आश्वासन पाटील यांनी दिलं.

 

पुणे पोर्शे काल अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांची आणि पुण्यात इतर पब्जवर केलेल्या कारवाईची त्यांनी माहिती दिली. अंमली पदार्थांच्या सुळसुळाटामुळे पुण्याचं नाव खराब होत असून, याप्रकरणी पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणाल्या दोषी पोलिसांना निलंबित केलं असून, पोलिस आयुक्तांनी अतिशय कार्यक्षमतेने कारवाई केल्याचं सांगत ही मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.

दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

****

राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भरत गोगावले, संजय गायकवाड यांच्यासह इतर आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याला उत्तर म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार रवींद्र धंगेकर, जितेंद्र आव्हाड यांनीही घोषणा देत सरकारचा निषेध केला.

****

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमिन घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयानं जामिन मंजूर केला आहे. सोरेन यांना सक्तवसुली संचालनालयानं गेल्या ३१ जानेवारीला अटक केली होती.

****

मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-एक वर छत कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेनंतर दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एक वर आगमन सेवा सुरु असून, तिथून होणारी उड्डाणे आज दुपारी दोन वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

****

नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणी लातूर पोलिस दोन फरार आरोपींच्या शोधात आहेत. इरन्ना कोनगुलवार आणि दिल्लीतून सूत्र हलवणारा गंगाधर यांच्या माध्यमातूनच गुणवाढी संदर्भात आर्थिक व्यवहार केले जात होते अशी माहिती, याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी संजय जाधव याने चौकशीदरम्यान दिली. त्याचबरोबर प्रवेशपत्र सापडलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आर्थिक व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही आता कसून चौकशी केली जात आहे.

****

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पारंपरिक पद्धतीनं मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा पार पडली. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर प्रस्थान सोहळा सुरू होईल.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहोळा उद्या अलंकापुरीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

****

नांदेड महापालिकेने प्लास्टिक बंदी मोहीमेअंतर्गत काल दोन क्विंटल प्लास्टिक जप्त केलं, तर ६० हजार रुपये दंड वसूल केला. महापालिकेच्या विशेष पथकाने जुना मोंढा परिसरात ही कारवाई केली.

****

टी -ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. बर्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. 

****

No comments: