Saturday, 1 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 01.06.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar

Date: 01 June 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास २६ टक्के मतदान झालं. हिमाचल प्रदेशात सरासरी ३२ टक्के, झारखंड २९, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात सरासरी २८, बिहार २४, चंदीगढ २५, पंजाब २४, तर ओडिशामध्ये सरासरी २३ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे.

****

पुणे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. याप्रकरणात कोणतीही लपवाछपवी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होत नसून, ही घटना घडल्यापासून आजपर्यंत चौकशीत जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप पवार यांनी फेटाळून लावले.

दरम्यान, या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले असून, शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी संबंधित डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप आहे. तर आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि वडील विशाल अगरवाल यांना न्यायालयानं काल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

****

सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख २५ हजार १०१ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. गुजरातमध्ये गेलेल्या एकूण गुंतवणुकीच्या दुपटीपेक्षा अधिक तसंच गुजरात आणि कर्नाटकमध्ये गेलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक ही गुंतवणूक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागानं ही आकडेवारी प्रसिद्ध केल्याचं ते म्हणाले. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण एक लाख १८ हजार ४२२ कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली होती.

****

विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी काल पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. कोपरगाव इथले भाजपचे विवेक कोल्हे यांच्यासह अहमदनगर इथले छगन पानसरे यांनी अर्ज दाखल केले.

****

दहावी आणि बारावीनंतर व्यवसायिक शिक्षण घेतल्यास रोजगाराच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत, त्यासाठी बारावीनंतर २७ हजार आणि दहावी नंतर १६ हजार विभागीय व्यवसाय शिक्षणाच्या जागा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशा करता खुल्या असल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधावा आणि तिथल्या समुपदेशन केंद्राची मदत घेऊन आपल्या शंकांचं निरसन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधल्या ५० विद्यार्थ्यांचा संच भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोला शैक्षणिक भेट देण्यासाठी घेऊन जाण्याचं नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाश विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण व्हावं, तसंच बालवयातच अवकाश संशोधनाची गोडी लागावी यासाठी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड करुन इस्रोला भेट देणं तसंच शंभर शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारणीसाठी नियोजन केलं जात असल्याचं शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितलं.

****

बुलडाणा जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजनेत वैयक्तिक घटकांचे ४३७ लक्षांक प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३९१ लक्षांक साध्य झालं असून, यात ३९१ लाभार्थींना १३ कोटी ५० लाख रुपयांचं अनुदान कृषि विभागामार्फत वितरीत करण्यात आलं आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३९१ उद्योग सुरु झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली अअहे.

****

राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं ७१वी राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धा पुण्यात होणार आहे. वरिष्ठ पुरुष गटाची स्पर्धा १३ ते १६ जुलै तर आणि महिला गटाची स्पर्धा १७ जुलै ते २० जुलै या कालावधीत बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. यामध्ये ३१ संघ सहभागी होणार असून, या स्पर्धा मॅटवर होणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी दिली.

****

No comments: