Saturday, 1 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 01.06.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

०१ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या काळात प्राप्तीकर विभागानं एक हजार १०० कोटी रुपयांची रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत. २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी ३९० कोटी रुपये जप्त केले होते. त्या तुलनेत हे प्रमाण १८२ टक्क्यांनी जास्त असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

देशाचा स्थिर मूल्याधारित जीडीपी वाढीचा दर २०२३- २४ या वर्षात ८ पूर्णांक २ दशांश टक्के राहिला. केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय़ाने काल जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती देण्यात आली. २०२३- २४ या वर्षात स्थिर मूल्याधारित जीडीपी १७३ लाख कोटी रुपयांच्या वर जाईल असा अंदाज आहे.

****

पुण्यातल्या कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले असून, शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी संबंधित डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप आहे.

दरम्यान, याप्रकरणी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि वडील विशाल अग्रवाल यांना न्यायालयानं काल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

****

 

पाचगणी नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकिया प्रकल्पाला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळालं आहे. असं मानांकन मिळवणारी राज्यातली ही पहिलीच नगरपरिषद आहे. आरोग्य विभाग आणि स्वच्छ भारत पॉईंट इथल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पामध्ये राबवलेल्या उत्कृष्ट कार्यप्रणालीसाठी हे प्रमाणपत्र देण्यात आलं आहे.

****

दक्षिणेतल्या बेंगलोर रोझ कांद्यावरचं ४० टक्के शुल्क हटवल्यानं नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथल्या खाजगी बाजार समितीत काल कांद्याच्या बाजार भावात २०० रुपयांची घसरण झाल्यानं, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव काही काळासाठी बंद पाडले. या वेळी ५५० मेट्रिक टन मूल्य आणि ४० टक्के कांद्यावरचं शुल्क हटवण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली.

****

No comments: