Thursday, 25 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक 25.07.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 25 July 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०

****

·      छत्रपती संभाजीनगरसह नाशिक आणि सोलापूर इथं कांदा बॅंक सुरू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·      राज्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत-प्रशासकीय यंत्रणेला समन्वयातून नियंत्रणाच्या सूचना

·      ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं निधन

आणि

·      पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात भारताच्या महिला तीरंदाज उपांत्यपूर्व फेरीत दाखल

****

राज्यात नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि सोलापूर इथं तातडीने कांदा बॅंक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कांद्याची नासाडी रोखतानाच त्याच्या साठवणुकीसाठी राज्यात अणुऊर्जा आधारीत कांदा महाबॅंक प्रकल्प सुरू होत आहे, या प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. या बँकांच्या उभारणीसाठी औद्योगिक विकास महामंडळ, पणन विभाग, तसंच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपलब्ध जागांचा वापर करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या बैठकीला पणनमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथं, हिंदुस्थान ग्रो संस्थेच्या माध्यमातून कांदा महाबँकेला सुरुवात होत आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गालगत सुमारे १० ठिकाणी कांदा बॅंक प्रस्तावित असून त्याच्या कामाला गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

****

राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत, महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम, तसंच ‘व्हॉट नाऊ संस्थेच्या हेल्पलाईनचं उद्घाटन, सौनिक यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी एक नऊ तीन शून्य क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे. तसंच व्हॉट नाऊ संस्थेनं देखील नव्वद एकोणीस-एकशे पंधरा-एकशे पंधरा ही हेल्पलाईन सुरू केली आहे. ऑनलाईन व्यवहारात फसवणूक या हेल्पलाईनवर तक्रार करावी तसंच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी, असं आवाहन सौनिक यांनी केलं आहे.

****

राज्यात विविध भागात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि पुण्याला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे.

पुणे शहरात मुसळधार पावसामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहकार्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसामुळे कल्याण-मुरबाड रस्ता, तसंच उल्हास नदीवरचा रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. जिल्ह्यातले ६५ मार्ग आणि ८१ बंधाऱ्यांवर पुराचं पाणी आल्यानं निम्म्या जिल्ह्यातली वाहतूक ठप्प जाली आहे.

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महाड, रोहा, पाली, नागोठणे इथं पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोणावळ्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने खोपोली, खालापूर परिसर जलमय झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात अनेक नदी, नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात आज पर्यंत सरासरी ३९५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हा पाऊस खरीप पिकांना लाभदायक असून जिल्ह्याची पाणी पातळी उंचावण्यास उपयुक्त ठरणार आहे.

 

नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी प्रकल्प ८३ टक्के भरला आहे. बंधाऱ्याचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल, त्यामुळे संबंधित गावांनी सतर्क राहण्याचा इशारा नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

****

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथले बचाव कार्य वेगानं सुरु असून, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असेल तरच, घराच्या बाहेर पडावं असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असल्याचं, विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

****

शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना राज्य मार्ग परिवहन महामंडळ-एसटीचे पास हे थेट शाळेत वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत ४ लाख ३ हजार २९४ पास वितरित करण्यात आले आहेत. महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी ही माहिती दिली.

****

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दहावे सामुदायिक रेडिओ पुरस्कार आज जाहीर केले. यामध्ये सांगलीच्या येरलावाणी केंद्राच्या कहाणी सुनंदाची या कार्यक्रमानं मोस्ट इनोव्हेटिव प्रकारात पहिला पुरस्कार पटकावला आहे.

****

धाराशिव इथं झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं आज पहाटे वसई इथं निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. दिब्रिटो यांची आनंदाचे अंतरंग, ओॲसिसच्या शोधात, तेजाची पावले, सृजनाचा मोहोर, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केलं. आज सायंकाळी वसईत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

 

दिब्रिटो यांच्या निधनानं सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण आणि अध्यात्मिक क्षेत्राला जोडणारा दुवा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तर दिब्रिटो यांच्या निधनानं पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शोकभावना व्यक्त केल्या.

****

शासनाच्या आनंदाचा शिधा योजनेचा जवळच्या तीन ठेकेदारांना लाभ व्हावा या हेतूने निविदा तयार केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यासंदर्भात एक पत्र दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे, शासनाची फसवणूक होणार नाही, याकरीता आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, अशी विनंती दानवे यांनी पत्राद्वारे केली आहे.

****

परभणी पोलीस दलाच्या मोटार विभागाच्या वतीने SHE VAN तयार करण्यात आली आहे. या आधुनिक वाहनात पोलिस दलातल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आज या व्हॅनचं उद्‌घाटन केल्यानंतर याबाबत अधिक माहिती दिली

ही व्हॅन ही आमच्या महिला अधिकारी आणि अंमलदार भगिनींसाठी तयार करण्यात आलेली आहे. आमच्या महिलांना जेव्हा बाहेर बंदोबस्तासाठी जातात तेव्हा त्यांना स्वच्छतागृहाची उपलब्धता नसते. अतिशय त्यांचे हाल होतात. आणि ते पाहून या समस्येवर उपाय म्हणून आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी यावर विचारमंथन करून आणि संशोधन करून ही व्हॅन बनवली आहे. ही प्रत्येक बंदोबस्ताला आमच्या महिला अंमलदारांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी पुरवली जाईल. यात सर्व सुविधा आहेत. आणि ही जिल्ह्यात सगळीकडे जाऊ शकते अशा प्रकारे याची निर्मिती करण्यात आलेली आहे. 

****

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात भारताच्या महिला तिरंदाजांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. या स्पर्धेच्या पुढच्या फेऱ्या अठ्ठावीस जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. दरम्यान, ऑलिम्पिकचं औपचारिक उद्‌घाटन उद्या होणार आहे. ऑलिम्पिकसाठी भारताकडून ११७ खेळाडू सहभागी झाले आहेत. यात ऍथलेटिक्समध्ये सर्वाधिक २९, नेमबाजीत २१, बॅडमिंटनमध्ये ७, तिरंदाजी आणि कुस्तीत प्रत्येकी सहा अशा प्रमुख क्रीडापटूंचा समावेश आहे. यापैकी स्टीपलचेसमध्ये बीडचा अविनाश साबळे, तिरंदाजीत प्रवीण जाधव, बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी, नेमबाजीत स्वप्नील कुसळे, उंच उडीत सर्वेश कुशारे या महाराष्ट्रातील पाच खेळाडूंचा समावेश आहे.

****

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी नोंदणी करण्यास इच्छुक पात्र नागरिकांना ऑनलाईन अर्ज तसंच ऑफलाईन अर्ज करता येणार आहेत. अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधितांनी आवश्यक कागदपत्रांसह सेतू सुविधा केंद्रात संपर्क करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयातर्फे करण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्हा गृहरक्षक दल-होमगार्डमधील रिक्त १४३ जागा भरण्यासाठी २६ जुलै ते १६ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

****

No comments: