Thursday, 1 August 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.08.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 01 August 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२ दुपारी १.०० वा.

****

अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात राज्य सरकारांना उपप्रवर्ग पाडता येऊ शकतील, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठानं २००४ साली ईव्ही चिनैया प्रकरणात पाच न्यायाधीशांच्या पीठानं दिलेला निर्णय रद्दबातल ठरवत, आज हा निर्णय दिला. या निर्णयाचा पंजाबातल्या काही जातींना लाभ होणार आहे.

****

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेल्वेसाठी अर्थसंकल्पात पुरेशा निधीची तरतूद केल्याबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे आभार मानले आहेत. ते आज लोकसभेत चालू आर्थिक वर्षाच्या रेल्वे अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर देत होते. रेल्वेच्या परिचालनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १२ लाखांवर रेल्वे कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.

****

विमान प्रवासात छायाचित्रासह ओळखपत्र तपासलं जात असून, बोर्डिंग पासवरील नाव आधार कार्डशी पडताळून घेतलं जात असल्याचं, नागरी उड्डयन मंत्री के राममोहन नायडू यांनी सांगितलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. प्रवाशाचं नाव आणि चेहरा याची पडताळणी झाल्यावरच त्याला प्रवासाची परवानगी दिली जात असल्याचं, नायडू यांनी सांगितलं.

****

 

 

हिंदकेसरी ठरलेल्या मल्लांना राज्य सरकारचं अनुदान गेल्या ११ वर्षांपासून मिळालेलं नाही, या मुद्याकडे राज्यसभेत शून्यकाळात खासदार रजनी पाटील यांनी लक्ष वेधलं. कोणताही खेळाडू असो, त्याचं वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करावं, यासाठी विशेष नियामक मंडळ स्थापन करावं, अशी मागणी रजनी पाटील यांनी केली.

****

देशात निवडणूक लढवण्यासाठी किमान वयाची अट २५ वर्षांवरून २१ वर्ष करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांनी केली आहे. शून्यकाळात बोलतांना चढ्ढा यांनी, तरुणांनी सक्रीय राजकारणात येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा बदल करावा, असं म्हटलं आहे.

****

थोर स्वातंत्र्यसेनानी, लेखक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवनात लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, कक्ष अधिकारी संभाजी जाधव आणि मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेघदूत या शासकीय निवासस्थानी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

 

छत्रपती संभाजीनगर इथं अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात येत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अण्णा भाऊच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास आज सकाळ पासून सामाजिक, शैक्षणिक संघटनेच्या वतीने पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. अण्णाभाऊंच्या कार्याची महती विशद करणाऱ्या गीतांचं सादरीकरण स्थानिक कलामंचावरून करण्यात आलं.

 

नांदेड इथं माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, शहरात जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज सहाव्या दिवशी महिला आणि पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्निल कुसळे ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या अंतिम फेरीत आज खेळणार आहे. भारतीय हॉकी संघाची आज गतविजेता बेल्जियमसोबत उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. बॅडमिंटनमध्येही एच.एस.प्रणॉय आणि पी.व्ही.सिंधू यांचे सामने होणार आहेत. तर पुरुष दुहेरीत सात्विक आणि चिरागची जोडी उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळतील. यासोबतच तिरंदाजी, नौकानयन, नेमबाजी गोल्फ या क्रीडा प्रकारतही भारतीय खेळाडूंचे आज सामने होणार आहेत.

****

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातले ७५ बंधारे पाण्याखाली असून, २३ मार्ग बंद आहेत. सांगली जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयर्विन पुलाजवळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.

****

No comments: