Friday, 25 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.10.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 October 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज

दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. मुंबईतल्या कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर, वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार, तर ठाणे जिल्ह्यातल्या माजिवाडा मतदारसंघातून शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे देखील आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

****

नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपलयासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी हा भावनिक क्षण असल्याचं सांगून सिद्दीकी यांनी, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार मानले.

****

निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सात उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकी यांना, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना, इस्लामपूर मधून निशिकांत पाटील, तासगाव - कवठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरी मधून सुनिल टिंगरे, तर शिरुर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसनं धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कुणाल पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे.

****

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात १३ नोव्हेंबरला, ४३ मतदारसंघांत मतदान होणार असून, आतापर्यंत ७४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

****

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला राज्य सरकारनं सुटी जाहीर केली आहे. सर्व सरकारी, खासगी, औद्योगिक आस्थापनांना या दिवशी सुटी द्यावी लागेल आणि त्या दिवसाचं वेतन संबंधित कर्मचाऱ्याला द्यावं लागेल. अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किमान दोन तास उशिरा येण्याची किंवा लवकर जाण्याची सवलत कर्मचाऱ्यांना द्यावी लागेल. या तरतुदींचं उल्लंघन करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.

****

राज्यात आचारसंहितेच्या काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कालच्या एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने मुंबई इथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असेल.

राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण १ हजार १४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ९९ टक्के म्हणजेच १ हजार १४२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.

****


बीड जिल्ह्यातल्या सहाही मतदारसंघातल्या निवडणूक प्रक्रियेतले अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  अधिक  सक्षम आणि  बिनचूकपणे जबाबदारीने त्यांच्यावर सोपवलेली कामं पार पाडावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या आहेत. विधानसभानिहाय कामकाजांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. सहाही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने प्रशाससनाने केलेली तयारी, टपाली मतपत्रिका, स्वीप कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.

गावडे यांनी काल परभणी जिल्ह्यात पाथरी इथल्या तहसील कार्यालयाला भेट देऊन निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. तसंच परभणी विधानसभा मतदारसंघ निवडणूक अंतर्गत उपविभागीय कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षांना खर्च निवडणूक निरीक्षक राहुल मिश्रा यांनी काल भेट देऊन पाहणी केली.

****

परभणी जिल्ह्यात जिंतूर इथल्या १८ वर्षीय सार्थक नवले याचा ब्रेनडेड झाल्याने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी आवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि आज सकाळी परभणी जिल्ह्यात पहिलीच अवयवदान करण्याची प्रक्रिया यशस्वी झाली. हे अवयव पोलीस बंदोबस्तात नांदेडकडे रवाना करण्यात आले.

****

अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातल्या महागाव रोडवर एका बंद पडलेल्या जिनिंग प्रेसिंगमध्ये 'ईफीड्राईन' नावाचा अमली पदार्थ बनवण्याचे मनसुबे अकोल्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावले. याप्रकरणी एका कुख्यात आरोपीसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, तब्बल दोन कोटी ३८ लाख रुपयाचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...