Saturday, 26 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक : 26.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 26 October 2024

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ ऑक्टोबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      महायुतीच्या घटकपक्षांमध्ये २७७ जागांवर एकमत तर महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार 

·      विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवसअखेर ९९१ उमेदवारांचे १ हजार २९२ अर्ज दाखल

·      नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश-लोहा मतदार संघातून उमेदवारी जाहीर

·      परभणी इथं काल अवयव दानाची पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

आणि

·      पुणे क्रिकेट कसोटीतही भारतीय फलंदाजांकडून निराशा-न्यूझीलंड संघाला दुसऱ्या डावात ३०१ धावांची आघाडी  

 

सविस्तर बातम्या

महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही माहिती दिली. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या मंजुरीनंतर जाहीर होईल. तोपर्यंत इच्छुकांनी अर्ज भरू नयेत, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, राज्यात सुमारे १३ ठिकाणी सभा होणार आहेत. सध्या मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड आणि धुळे ही ठिकाणं निश्चित झाली आहेत. उर्वरित ठिकाणं लवकरच जाहीर होतील, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख पक्ष प्रत्येकी ९० अशा एकूण २७० जागा लढवणार असून, उर्वरित १८ जागा मित्र पक्षांना दिल्या जाणार आहेत. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काल ही माहिती दिली.

दरम्यान, भाजपाचा राजीनामा दिलेले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश न केलेले राजेंद्र गावित यांना शहाद्यातून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे, यामुळे नंदुरबारमधल्या काँग्रस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचं वृत्त आहे. गावित यांच्या उमेदवारी विरोधात काँग्रेसच्या पाच इच्छुकांनी काल पत्रकार परिषद घेऊन, आपल्या भावना व्यक्त केल्या

****

विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत ९९१ उमेदवारांचे १ हजार २९२ अर्ज दाखल झाले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी तसंच औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे अतुल सावे यांनी काल अर्ज दाखल केले. दरम्यान, एमआयएमच्या वतीने औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून नासेर सिद्दिकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

 

जालना जिल्ह्यात बदनापूर इथून महाविकास आघाडीचे बबलू चौधरी यांनी, तर भोकरदन इथून महाविकास आघाडीचे चंद्रकांत दानवे यांनी अर्ज दाखल केला. घनसावंगी मतदार संघातही काल ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले.

 

हिंगोली जिल्ह्यात काल १७ जणांनी नामनिर्देशनपत्रं दाखल केली. यामध्ये कळमनुरीतून बसपाचे विजय माणिका बलखंडे, वंचित बहुजन आघाडीचे दिलीप तातेराव मस्के यांचा, तर हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे यांच्यासह आठ जणांच्या अकरा अर्जांचा समावेश आहे.

 

परभणी जिल्ह्यात काल सहा जणांनी अर्ज दाखल केले, तर बीड जिल्ह्यात काल ४३ उमेदवारांनी ४७ अर्ज दाखल केले आहेत.

 

नांदेड जिल्ह्यातल्या विविध मतदार संघात काल २२ अर्ज दाखल झाले, यामध्ये किनवट तसंच देगलूरमधून पाच अर्ज, नांदेड दक्षिण, भोकर, नायगाव तसंच हदगावमधून प्रत्येकी ३ अर्ज तर लोहा मतदार संघातल्या दोन अर्जांचा समावेश आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत सात अर्ज दाखल झाले आहेत.

 

लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघात काल ४२ उमेदवारांनी ५५ नामनिर्देशन पत्रं दाखल केली. यामध्ये औसा विधानसभा मतदारसंघातले महायुतीतील भाजपचे अधिकृत उमेदवार अभिमन्यू पवार यांचा समावेश आहे.

 

धाराशिव जिल्ह्यातल्या ४ विधानसभा मतदारसंघात काल १२ उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले. यामध्ये उस्मानाबाद इथं काँग्रेसचे पांडुरंग कुंभार, शिवसेनेचे व्यंकट गुंड, बसपाचे लहू खुणे यांच्यासह दोन अपक्ष तर तुळजापूर इथल्या तीन आणि परंडा इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुल मोटे यांच्यासह चार अर्जांचा समावेश आहे.

****

नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सात उमेदवारांची दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून चिखलीकर यांना, मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दिकी, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, इस्लामपूर मधून निशिकांत पाटील,

तासगाव - कवठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरी मधून सुनिल टिंगरे, तर शिरुर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाच उमेदवारांची चौथी यादी काल जाहीर केली. यात बीड जिल्ह्याच्या केज मतदार संघातून रमेश गालफाडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

****

नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अंकुश कदम यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले कदम हे पहिलेच उमेदवार आहेत.

****

श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.

****

परभणी इथं काल अवयव दानाची पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. जिंतूर इथल्या १८ वर्षीय सार्थक नवले याला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषीत केल्यावर, त्याच्या आई वडिलांनी त्याचे अंतर्गत अवयव गरजू रुग्णांना दान करण्याचा निर्णय घेतला, काल सकाळी वैद्यकीय पथकं सार्थकचे अवयव घेऊन रवाना झाले. एक मूत्रपिंड नांदेड इथं तर एक मूत्रपिंड आणि यकृत छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णाला देण्यात आलं.

****

पुणे इथं सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या पाच बाद १९८ धावा झाल्या आहेत. भारतीय फलंदाजांनी कालही निराशा केली, भारताचा पहिला डाव अवघ्या १५६ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडनं या कसोटीत आतापर्यंत एकूण ३०१ धावांची आघाडी घेतली आहे.

****

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज अर्थात एक्झीट पोल १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहा या कालावधीत प्रसारित करण्यास प्रतिबंधित केलं आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.

****

राज्य सरकारने येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सुटी जाहीर केली आहे. सर्व खासगी तसंच औद्योगिक आस्थापनांनी या दिवशी कामगारांना पगारी सुटी जाहीर करावी, अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किमान दोन तास उशिरा येण्याची किंवा लवकर जाण्याची सवलत कर्मचाऱ्यांना द्यावी, असं यासंबंधी जारी पत्रकात म्हटलं आहे.

****

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलं आहे.

 Byte…

****

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात काल नाकाबंदी दरम्यान एका गाडीत एकशे अडोतीस कोटीं रुपयांचं सोनं आढळून आलं, मात्र ही गाडी, सोन्याची नियमित वाहतुक करणाऱ्या सिक्वेल सिक्युअर कंपनीची असल्याचं स्पष्ट झालं.

****

हिंगोलीतल्या बसस्थानक परिसरात काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वाहनांमधून १ कोटी ४० लाख रूपयांची रोख रक्कम जप्त केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

****

राज्यात १५ ते २५ ऑक्टोबरपर्यंत सी-व्हिजिल ॲपवर एकूण एक हजार दोनशे एकोणसाठ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी एक हजार २५० तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत. नांदेड विधानसभा मतदार संघात आतापर्यत सी-व्हीजील ॲपवर एकूण ३२ तक्रारी दाखल झाल्या असून यापैकी ११ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. उर्वरित २१ तक्रारी बेदखल असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी प्रशासनातर्फे वेगवेगळे प्रयोग केले जातात. काल लातूर शहरात मतदार जागृतीसाठी दयानंद महाविद्यालयात 'कॉफी विथ कलेक्टर' हा कार्यक्रम घेण्यात आला, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर शहर तसंच तालुक्यात केंद्रीय सशस्त्र दलाच्या जवानांसह, स्थानिक पोलीसांनी काल पथसंचलन केलं. गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव इथे जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून मतदान विषयक जनजागृती केली 

****

नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात कालही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

नांदेड जिल्ह्यात काल दुपारी भूकंपसदृश्य दोन सौम्य हादरे जाणवले, मुखेड तालुक्यात अंबुलगा इथं जाणवलेल्या या हादऱ्यांची तीव्रता रिक्टर स्केलवर अनुक्रमे १ पूर्णांक ५ आणि ० पूर्णांक ७ अशी नोंदवण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात पांगरा शिंदेसह काही गावातही काल रात्रीच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.

****

बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलीसठाण्याच्या हद्दीतल्या एका शेतात छापा मारून पोलिसांनी गांजाची तब्बल १२० झाडं जप्त केली. या कारवाईत जवळपास २१ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...