Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 19 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी भव्य मिरवणूका, शोभायात्रा, व्याख्यानं, आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराज यांच्या कार्यातून एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी समाजिक माध्यमावरच्या संदेशातून व्यक्त केली आहे.
राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.
****
शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते.
****
शिवजयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा काढण्यात येत आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय तसंच महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौक परिसरातून ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांच्या हस्ते शिव प्रतिमेचं पूजन करुन यात्रेला सुरुवात करण्यात आली.
नांदेडमध्ये "जय शिवाजी जय भारत" पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं समूहवाचन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासोबत करण्यात आलं. शेकडो विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यवतमाळ तसंच वाशिम इथं काढलेल्या पदयात्रेत नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
राज्यात ठिकठिकाणी शिवजंती उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे.
बीड इथं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आज सकाळी शिवजयंतीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यावेळी उपस्थित होते.
इथं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आयोजित जयंती उत्सवात विविध कार्यक्रम होत आहेत.
गेवराई इथं शिवशाही या ऐतिहासिक महानाट्याचे तीन प्रयोग शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित केले असून, शिवप्रेमी नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं आहे.
बीड शहरात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण इथं आज संध्याकाळी ४५० ढोलताशांचे 'करवीर नाद' पथकाचं सादरीकरण, लाईट आणि लेजर शो चं आयोजन करण्यात आलं आहे.
सोलापूर शहरातल्या शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर लाखो महिलांच्या साक्षीने शिवजयंती निमित्त पाळणा गायन करण्यात आलं. लाखो शिवभक्त यावेळी उपस्थित होते.
****
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी आज पदभार स्वीकारला. राजीव कुमार यांचा निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. ज्ञानेश कुमार यांनी यापूर्वी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती.
****
दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. सर्व नवनिर्वाचित भाजप आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या चर्चेत सहभागी होतील. या बैठकीत दिल्लीच्या पुढील मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
****
गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत शहरी भागातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या बेरोजगारीच्या दरात ६ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांची घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत बेरोजगारीचा दर ६ पूर्णांक ५ दशांश टक्के होता.
****
नांदेड जिल्ह्यात दोन मार्चच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे, जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी हा आदेश दिला.
परभणी इथं कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातून रूट मार्च काढण्यात आला. पोलिस दलातली सुसज्ज वाहनं, पोलिस अधिकारी अणि कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते.
****
नवव्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि दुबईत या स्पर्धेतले सामने होणार असून, आज पहिला सामना कराची इथं पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघादरम्यान होणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. रोहीत शर्माच्या नेतृत्वातल्या भारतीय संघाचा पहिला सामना उद्या दुबईत बांग्लादेशविरुद्ध होणार आहे.
****
No comments:
Post a Comment