Thursday, 20 February 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.02.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 February 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.

****

·      छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचाण्णवावी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी, १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी नामांकित

·      राज्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

·      ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची माहिती

आणि

·      आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-बांग्लादेश लढत

****

छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचाण्णवावी जयंती काल सर्वत्र साजरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली अर्पण केली.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवनात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. मुंबईतल्या विविध कार्यक्रमांमध्ये राज्यपाल सहभागी झाले होते.

****

शिवजयंतीचा मुख्य सोहळा पुण्यात साजरा झाला. किल्ले शिवनेरीवर झालेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरता मंदिरांपेक्षाही मोठे असून, त्यांच्या जतन आणि संवर्धनाचं काम राज्य शासनाच्या वतीनं सातत्यानं सुरू असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केलं. तर, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

****

पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, काल केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात, छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले असून, त्यांना लवकरच मंजुरी मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. ते म्हणाले...

‘‘देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनोस्कोच्या जागतिक वारसाकरता त्याठिकाणी नॉमीनेट केलेले आहेत. लवकरच त्याची परिषद होणार आहे. आमचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पहिल्या टप्प्यामध्ये युनोस्कोला पॅरीसला जाऊन यासंर्भातलं एक सादरीकरण करणार आहेत. आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवरायांचे किल्ले हा खरोखरच जागतिक वारसा म्हणून याठिकाणी युनोस्कोही स्विकारेल.’’

 

राज्यात सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी जय शिवाजी जय भारत पदयात्रा काल काढण्यात आली. पुण्यात केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली. कोल्हापूरच्या ऐतिहासिक पन्हाळगडावरही सुमारे तीन हजार शिवप्रेमींच्या उपस्थितीसह ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. मराठवाड्यातही या पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

‘‘छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, यांच्या हस्ते शिव प्रतिमेचं पूजन करुन ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पारंपरिक वेषभुषा केलेले शेकडो विद्यार्थी आणि नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले.

**

जालन्यात काढण्यात आलेल्या जय शिवाजी जय भारत पदयात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विविध क्षेत्रातले मान्यवर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

**

बीड इथं जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ‘जय शिवाजी- जय भारत’ पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

**

परभणी या पदयात्रेला विविध मान्यवर, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. पारंपारिक वेशभूषेतली मुलं आणि साहसी खेळांच्या सादरीकरणाने या यात्रेने सर्वांची मनं जिंकून घेतली.

**

हिंगोली इथे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं.

**

नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह शेकडो विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले.

**

धाराशिव इथं पदयात्रा उत्साहपूर्ण वातारणात पार पडली. शहरातल्या विविध शिक्षण संस्थांमधले सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी या पदयात्रेत सहभागी झाले.

**

लातूर इथे जय शिवाजी, जय भारत पदयात्रेत विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या लेझीम आणि झांज पथकांनी ढोल-ताशांच्या तालावर केलेल्या सादरीकरणांनी उपस्थितांची मनं जिंकली.’’

****

शिवजयंतीच्या निमित्तानं काल तुळजापूर इथं श्रीतुळजाभवानी देवीची 'भवानी तलवार अलंकार' महापूजा करण्यात आली. शिवाजी महाराजांना देवीनं भवानी तलवार दिली होती, अशी मान्यता आहे, त्याची आठवण म्हणून ही पूजा मांडली जाते.

****

अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काल उत्तरप्रदेशात आग्रा इथं लाल किल्ला परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आग्य्रातल्या ज्या कोठीत शिवाजी महाराजांना बंदी ठेवण्यात आलं होतं, त्याठिकाणी भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिव जयंतीनिमित्त राजकीय भाष्यकार आणि ’सकलजनवादी शिवराय’ या ग्रंथाचे लेखक डॉक्टर प्रकाश पवार यांचं व्याख्यान झालं, शिवरायांचा सकलजनवाद हाच खरा महाराष्ट्रधर्म असल्याचं प्रतिपादन पवार यांनी यावेळी केलं.

****

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आयोजित पुणे ते दिल्ली ‌‘मराठी साहित्ययात्री संमेलनाला’ कालपासून प्रारंभ झाला. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान धावत्या रेल्वेत हे संमेलन होत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनीही या विशेष रेल्वेत साहित्यिकांसोबत प्रवास केला.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक औद्योगिक वसाहतीसाठी जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. ऑरिक सिटी सभागृहात उद्योजकांच्या संघटनाशी गोयल यांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शेंद्रा आणि बिडकीन उद्योग वसाहतीमध्ये उद्योगांना जास्तीत जास्त सुविधा देण्यास सरकार इच्छुक असून, शून्य भ्रष्टाचार आणि शून्य विलंब पद्धतीचा अवलंब करून सर्व पूर्तता करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं. उद्योग लवकरात लवकर कार्यान्वित करून गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीस प्राधान्य द्यावं, असं आवाहन त्यांनी उद्योजकांना यावेळी केलं. उद्योग क्षेत्रासाठी सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची गोयल यांनी माहिती दिली.

****

नवव्या आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. दुबईत होत असलेला हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होईल.

दरम्यान, या स्पर्धेत काल सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने यजमान पाकिस्तानचा ६० धावांनी पराभव केला.

****

मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि मार्गदर्शक मिलिंद रेगे यांचं काल हृदयविकाराच्या झटक्यानं मुंबईच्या खासगी रुग्णालयात निधन झालं, ते ७६ वर्षांचे होते. मुंबई संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून मिलिंद रेगे यांची ओळख होती.

****

धाराशिव तालुक्यात आळणी इथले ज्येष्ठ गांधीवादी नेते चंद्रकांतराव वीर यांचं काल निधन झालं, ते ९१ वर्षांचे होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले वीर यांनी, जिल्हा होमगार्डचे समादेशक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसंच काँग्रेस समीतीचे धाराशिव शहराध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...