Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 20 February 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
छत्रपती संभाजीनगर मधल्या ऑरिक सिटीला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून, येणार्या काळात मराठवाडा सर्वात मोठं औद्योगिक हब
बनेल, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ऑरिक सिटीत काल उद्योजकांशी झालेल्या चर्चेविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. ऑरिक सिटीत जवळपास सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, याठिकाणी नागरीक आणि कामगारांसाठी घरे, रुग्णालय, विद्यापीठ यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. या औद्योगिक क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र तसंच स्टार्ट अप
इन्क्यूबेशन हब बनवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठवाड्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, हा वारसा विकासाशी जोडण्याचं काम महायुती सरकार करत असल्याचं, गोयल म्हणाले.
****
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
म्हणून रेखा गुप्ता आज शपथ घेणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली विधीमंडळ पक्षाची काल बैठक झाली, त्यात रेखा गुप्ता यांच्या नावाची पक्ष नेता म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांची भेट घेऊन, सरकारस्थापनेचा दावा केला. आज दिल्लीतल्या रामलीला मैदानावर शपथग्रहण होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री
राजनाथ सिंग यांच्यासह २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर अनेक मान्यवर या
समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा
आहे.
****
भारत अनेक क्षेत्रात आघाडीवरचा
देश असून, विविध क्षेत्रात नेतृत्व प्रदान
करत तसंच नवनवीन उपक्रम राबवून जागतिक
स्तरावर मानदंड प्रस्थापित करत असल्याचं प्रतिपादन विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री
डॉ. जितेंद्र सिंग यांनी केलं आहे.
काल एका मुलाखतीत भारताच्या अवकाश क्षेत्राविषयी बोलताना त्यांनी, देशाने या क्षेत्रात
अभूतपूर्व परिवर्तन केलं असून, महत्त्वकांक्षी
मोहिमा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यातही वाढ
झाली असल्याचं सांगितलं. अंतराळ संशोधनात देशाच्या वाढत्या वर्चस्वाला अधोरेखित करणाऱ्या टप्प्यात, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरून
येणाऱ्या निष्कर्षांची वाट पाहात असल्याचंही सिंग यांनी सांगितलं.
****
रेल्वेच्या विभागीय परीक्षांशी
संबंधित घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय
अन्वेषण विभागानं पश्चिम रेल्वेच्या पाच
अधिकाऱ्यांना अटक केली. बडोदा आणि अमदाबादमधून
प्रत्येकी २ आणि मुंबईतून एकाला अटक झाली
आहे. रेल्वेच्या कार्मिक विभागातल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. याप्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी बडोद्यात ११ ठिकाणी छापे
घातले. त्यात ६५० ग्रॅम सोने आणि ५
लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली.
****
मध्यप्रदेशातल्या बालाघाट
जिल्ह्यात पोलिसांसोबत काल झालेल्या
चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडच्या
सीमेवर ही चकमक झाली. यात काही नक्षलवादी जखमी झाले, मात्र ते पळ काढण्यात यशस्वी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात
शस्रास्त्र जप्त करण्यात आली.
****
यवतमाळ पोलिसांच्या स्थानिक
गुन्हे शाखेनं झारखंडमधल्या नक्षलवादी
कमांडरला अटक केली. तुलसी उर्फ दिलिप महातो नावाच्या या नक्षलवाद्यावर १९९३ ते १९९७ या
काळातल्या नक्षली हल्ल्यांचे सहा गुन्हे दाखल आहेत.
****
राज्य सरकारनं विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि ग्रामीण रुग्णालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. त्यासाठी उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालय स्तरावर एकूण दोन हजार ७०
पदनिर्मितीसाठी शासनानं मान्यता दिली असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. टप्याटप्यानं सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी सांगितलं.
****
राज्य परिवहन विभागात दरवर्षी
पाच हजार बसेस याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार नवीन बसेस खरेदी करणार असल्याचं, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते काल सोलापूर इथं बोलत होते. राज्यातल्या सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून
देण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पदस्पर्शाने पावन झालेला नाशिक जिल्ह्यातला साल्हेर किल्ला पर्यटन स्थळ म्हणून
विकसित होण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचं
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं
आहे. साल्हेर इथं काल शिवजयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते
बोलत होते. साल्हेरच्या विकासाच्या दृष्टीनं आदिवासी
संग्रहालय आणि शिवसृष्टीसाठी दीडशे कोटीचा
आराखडा प्रस्तावित असून, पहिल्या
टप्प्यासाठी ७५ कोटींची शासकीय मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती आमदार दिलीप
बोरसे यांनी यावेळी दिली.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी
तालुक्यातल्या पारा गावामध्ये कालच्या शिवजयंती रॅलीत फटाके उडवताना स्फोट
झाल्याची घटना घडली. शिवजयंतीनिमित्त
काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दगडी तोफेतून आवाजाची दारू उडवताना स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
****
नवव्या आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज
भारताचा सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. दुबईत होत असलेला हा
सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होईल.
****
No comments:
Post a Comment